भोपाळ संस्थानचा राज्यकारभार अधिकतर काळ बेगम नवाबांनी पाहिला. त्यांच्या कारभारात सॅल्व्हाडोर बोरबॉनने केलेले लष्कराचे प्रशासन, राजकीय मुत्सद्देगिरी यामुळे अनेक वेळा भोपाळचे राज्य सुखरूप, सुरक्षित राहिले. अहमदनगरची निजामशाही सुरक्षित राखणारा मलिक अंबर जसा एक परकीय आफ्रिकन हबशी तसाच भोपाळची नवाबशाही सुरक्षित राखणे हे आपले कर्तव्य समजणारा हा परकीय फ्रेंच माणूस सॅल्व्हाडोर बोरबॉन! भोपाळ नवाबशाहीचा हा तारणहार १८१६ साली मृत्यू पावल्यावर तत्कालीन नवाबाने त्याचा मुलगा बाल्तझार बोरबॉनला राज्याचे प्रधानपद देऊन प्रमुख राजकीय सल्लागारपदी नियुक्त केले. बाल्तझार हासुद्धा त्याच्या वडिलांप्रमाणेच कर्तव्यदक्ष, स्वामीनिष्ठ आणि कुशल प्रशासक निघाला.

तत्कालीन पालक कारभारी म्हणजे रिजंट, कुदसिया हिला अनेकदा कठीण प्रसंगांतून योग्य सल्ला दिल्यामुळे बाल्तझार हा तिचा सर्वाधिक भरवशाचा भोपाळ दरबारचा सरदार झाला. या बोरबॉन कुटुंबाच्या नावे बेगम नवाबने भोपाळमध्ये जहागीर आणि त्यांना त्यांची चच्रेस, शाळा आणि कब्रस्तान बांधायला परवानगी दिली. बाल्ताझारच्या भोपाळ दरबारातल्या वाढत्या प्रभावामुळे त्याचा द्वेष करणाऱ्यांनी कुदसिया बेगम आणि बाल्ताझारच्या नसलेल्या प्रेम प्रकरणांच्या अफवा पसरवल्या, त्यामुळे त्याने इसाबेला जॉन्सन या इंग्रज तरुणीशी लग्न केले. कुदसिया बेगमचे इसाबेलाशी मत्रीचे संबंध येऊन इसाबेला भोपाळची ‘सरकार दुल्हन’ झाली.वयाच्या ऐंशीव्या वर्षी तिचा मृत्यू झाला. १८३० साली बाल्ताझारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सेबॅस्टीन भोपाळच्या वजिरपदी नियुक्त झाला. पण त्याच्यात वडिलांप्रमाणे कार्यक्षमता नव्हती. बोरबॉन घराण्याच्या पुढच्या पिढय़ा भोपाळमध्येच स्थायिक होऊन संगीतकार, वकिली, वैद्यकीय, शिक्षक अशा विविध क्षेत्रांत काम करू  लागल्या.अनेक बोरबॉन पुरुषांनी स्वत:ला मुस्लीम नावेही घेतली. उदाहरणार्थ, सेबॅस्टीन-मेहेरबान मसिहा. बाल्ताझार-शाजात मसिहा. सध्याचा बोरबॉन कुटुंब प्रमुख बाल्तझार नेपोलियन हा पेशाने वकील, त्याची पत्नी एलिशा आणि तीन मुले असे कुटुंब आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com