News Flash

नवदेशांचा उदयास्त : सेशल्स द्वीपसमूह

लाखभर लोकसंख्येचा हा देश जगातील छोटय़ा देशांपैकी एक आहे.

सेशल्स द्वीपसमूह

आफ्रिका खंडाच्या प्रमुख भूमीपासून दूर, सुमारे १,५०० किमी अंतरावर पूर्वेला हिंदी महासागरात ११५ लहान लहान बेटांचा हा सेशल्स देश बनला आहे. माहे हे या द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट; या बेटावरच सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया वसली आहे. पर्यटन क्षेत्रात ‘रोमँटिक’ म्हणून अत्यंत लोकप्रिय असलेल्या या द्वीपसमूहाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांचे नाव आहे- वेवेल रामकलावन! त्यांचे पूर्वज भारतातीलच होते.. बिहारमधील गोपालगंजजवळच्या परसोनी गावचे. २०१८ साली रामकलावन यांनी बिहारमधील त्यांच्या पूर्वजांच्या गावाला भेट दिली होती.

दक्षिणेला हिंदी महासागरात मादागास्कर, पश्चिमेला झांजिबार, दक्षिणेस मॉरिशस आणि रीयुनियन बेटे, नैर्ऋत्येस कोमोरोस आणि वायव्येला मालदीव अशा द्वीपराष्ट्रांचा शेजार असलेला सेशल्स हा सार्वभौम देश आफ्रिकी देशांपैकी सर्वात लहान देश आहे. लाखभर लोकसंख्येचा हा देश जगातील छोटय़ा देशांपैकी एक आहे.

१९७६ साली ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून अस्तित्वात आलेल्या सेशल्सच्या भूमीवर तेराव्या शतकात पहिले परकीय आले, ते होते अरब आणि मालदीवचे व्यापारी. जगात अनेक ठिकाणी घडले तसेच इथे घडले. युरोपीयांपैकी या देशाच्या भूमीवर पहिला प्रवेश झाला तो पोर्तुगीजांचा. त्यानंतर झालेल्या युरोपीय व्यापारी देशांच्या चढाओढीत अखेरीस टिकले ते ब्रिटिश. १५०३ साली वास्को-द-गामाच्या भारताच्या चौथ्या मोहिमेवर जाणाऱ्या जहाजांचा तांडा सेशल्सच्या बेटावर काही दिवस थांबला होता. शंभर वर्षांनी, १६०९ मध्ये येथील काही बेटांवर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे काही अधिकारी येऊन राहिले होते. परंतु पुढच्या शतकभराच्या काळात सेशल्सची बेटे ही समुद्री चाचेगिरीचे प्रमुख केंद्र बनली होती. ही बेटे आशिया-आफ्रिकेत चालणाऱ्या व्यापाराच्या जहाजांसाठी एक मध्यवर्ती थांब्याचे ठिकाण असल्यामुळे या भागात चाचेगिरी चांगलीच फोफावली होती. फ्रेंचांनी १७१५ साली मॉरिशसचा ताबा घेतला होता. त्या काळात मॉरिशसकडून भारतात कमी वेळात पोहोचणारा सागरी मार्ग शोधण्याचा फ्रेंच अधिकाऱ्यांचा निकराचा प्रयत्न चालला होता.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 12:14 am

Web Title: seychelles islands akp 94
Next Stories
1 कुतूहल : ऑयलरचा कळीचा स्थिरांक : e
2 नवदेशांचा उदयास्त : सिएरा लिओन : शेतीप्रधान हिरेनिर्यातदार!
3 कुतूहल : ऑयलरची अद्भुत रेषा
Just Now!
X