पारशी समाजातले सोहराब मोदी १९३० ते १९७० या काळातले प्रसिद्ध नाटय़-चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि मिनव्‍‌र्हा मूव्हिटोन या चित्रपट निर्मात्या कंपनीचे मालक होते. मिनव्‍‌र्हा मूव्हिटोनचे पहिले दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल कोसळल्यावर सोहराबनी ऐतिहासिक विषयांवर चित्रपट काढले. पुकार (१९३९), सिकंदर (१९४१) आणि पृथ्वी वल्लभ (१९४३) या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. सोहराबच्या या तीन ऐतिहासिक चित्रपटांचे वैशिष्टय़ असे होते की, यांचे बरेचसे चित्रीकरण कथेनुसार प्रत्यक्ष मोगलांचे महाल, किल्ले, दरबार यांच्या अवशेषातच झाले. त्यांच्या ‘सिकंदर’मुळे पृथ्वीराज कपूर यांचा चित्रपटसृष्टीत उदय झाला. ‘सिकंदर’च्या लढाईच्या दृश्यांनी तत्कालीन हॉलीवूडच्या चित्रकरणाशी बरोबरी केली, असे म्हटले जाते.

सोहराब मोदींचा धारदार आवाज आणि संवाद फेकण्याचे कौशल्य हे त्यांच्या चित्रपटांचे एक आकर्षण होते. त्यांच्या ‘शीशमहल’च्या एका प्रयोगाला मिनव्‍‌र्हा थिएटरमध्ये ते स्वत: हजर होते. त्या वेळी एक प्रेक्षक डोळे मिटून बसलेला त्यांना आढळल्यावर सोहराबनी डोअरकीपरला सांगितले की, त्या प्रेक्षकाला तिकिटाचे पैसे परत करून बाहेर काढून द्यावे. थोडय़ा वेळात डोअरकीपरने परत येऊन सांगितले की, तो प्रेक्षक अंध आहे आणि केवळ सोहराबचे संवाद ऐकण्यासाठी हा चित्रपट ‘ऐकण्यासाठी’ तिसऱ्यांदा आला आहे!

सोहराब मोदींचा ‘झांसी की रानी’ (१९५३) हा भारतातील पहिला टेक्नीकलर चित्रपट. त्यासाठी त्यांनी हॉलीवूडचे तंत्रज्ञ भारतात बोलावले. सोहराबची दुसरी पत्नी मेहताब हिची राणी लक्ष्मीबाईची भूमिका अत्यंत गाजली; परंतु चित्रपट मात्र विशेष चालला नाही. त्यांनी एकंदर २६ चित्रपट दिग्दर्शित केले आणि त्यापकी १९ चित्रपटांत त्यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यापकी खून का खून (१९३५), जेलर (१९३८), पुकार (१९३९), सिकंदर (१९४१), पृथ्वी वल्लभ (१९४३), परख (१९४४), मंजधार (१९४७), झांसी की रानी (१९५३), मिर्झा गालिब (१९५४), यहुदी (१९५८) हे चित्रपट विशेष गाजले. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचे महत्त्व ओळखून भारत सरकारने त्यांना १९८० साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला. कर्करोगाच्या आजाराने त्यांचा मृत्यू १९८० मध्ये झाला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com