News Flash

मेंदूशी मैत्री : आम्हाला गणित शिकवा!

शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम व्हायचे. या उपक्रमांतून मुलांच्या एक दिवस असं लक्षात आलं की, काही गोष्टींसाठी गणित यावं लागतं.

(संग्रहित छायाचित्र)

 डॉ. श्रुती पानसे

सडबरी व्हॅली स्कूल या नावाची एक शाळा होती. (या संदर्भातील एक पुस्तक गरवारे बालभवनने काढलेलं आहे.) तिथे गणित शिकवायला एक शिक्षक होते; पण ते गणित शिकवायला कधीच आपणहून वर्गावर गेले नाहीत. शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम व्हायचे. या उपक्रमांतून मुलांच्या एक दिवस असं लक्षात आलं की, काही गोष्टींसाठी गणित यावं लागतं. आपल्याला गणित शिकण्याची गरज आहे. त्या वेळेला सर्व मुलांनी आपापसात ठरवलं आणि ते गणिताच्या शिक्षकांकडे गेले.आम्हाला गणित शिकायचं आहे, असं त्यांनी सांगितलं; परंतु गणिताच्या शिक्षकांनी त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवला नाही. तुम्हाला काय शिकायचं आहे? कशासाठी? असे प्रश्न मुलांना विचारले. यानंतर मुलांनी विचार केला. आपल्याला गणितामध्ये नेमकं काय शिकायचं आहे, हे त्यांनी ठरवलं आणि शिक्षकांकडे गेले. शिक्षकांनी लगेच मुलांना होकार दिला नाही. कधी शिकवायचं, त्याची वेळ ठरवा आणि मग मला सांगा. हे ठरवून मुलं पुन्हा शिक्षकांकडे गेली. मुलांना खरोखरच गणित शिकायचं आहे याची शंभर टक्के खात्री जेव्हा त्या शिक्षकांना पटली, त्या वेळेला शिक्षकांनी मुलांना काही अटी घातल्या. जी वेळ गणिताच्या अभ्यासासाठी ठरलेली आहे, ती वेळ पाळायची. त्यादरम्यान कोणीही गैरहजर राहायचं नाही. तासाला यायला उशीर करायचा नाही.शिक्षकांनी मुलांवर घातलेल्या त्या सर्व अटी मुलांनी ताबडतोब मान्य केल्या. कारण त्यांना गणित शिकायची घाई झाली होती. त्यांच्या मनात गणिताविषयी खरंखुरं कुतूहल निर्माण झालं होतं. यानंतर शिक्षकांनी अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात केली. मुलं अत्यंत उत्साहाने शिकत होती. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, जवळपास दोन वर्षांचा अभ्यासक्रम सहा महिन्यांतच शिकवून झाला. सर्व मुलांना गणितं कळली. याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा झाला की, मुलांना गणित विषयाची गोडी लागली.

या सगळ्याच्या मुळाशी गेलं तर काय दिसतं?

मुलांच्या मनात गणिताविषयी कुतूहल निर्माण झालं होतं हे एक. दुसरं म्हणजे गणित शिकायचं हा निर्णय त्यांनी आपण होऊन घेतलेला होता. त्यांच्यावर हा निर्णय कोणीही लादलेला नव्हता.

जी गोष्ट आपल्याला शिकायची आहे, तिकडे लक्ष एकाग्र केलं जातं. याचा अर्थ असा की, ज्या गोष्टीमध्ये कुतूहल निर्माण होईल, ती गोष्ट आपण मनापासूनच करतो.

contact@shrutipanse.co

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 12:11 am

Web Title: teach us math brain abn 97
Next Stories
1 कुतूहल : ‘रासायनिक’ किरण**
2 मेंदूशी मैत्री : जागवलेलं कु्तूहल
3 कुतूहल : ‘रासायनिक’ किरण
Just Now!
X