अनेक विद्यांमध्ये पारंगत असलेले, तुर्की वंशात जन्मलेल्या अमीर खुसरोंचे साहित्य आणि संगीतातही मोठं योगदान आहे. साहित्याप्रमाणेच अमीर खुसरोंच्या संगीताचा गाभाही सूफी तसव्वूफ म्हणजे तत्त्वज्ञान होता. संगीतज्ज्ञ म्हणून अमीर खुसरोंची योग्यता मोठी आहे. अमीर इराणी संगीताचे जाणकार होते. त्या काळात इराणमधून भारतात आलेलं सेहतार हे तीन तारा असलेलं वाद्य ते उत्तमरीत्या वाजवीत असत. तेच वाद्य विकसित करून अमीर खुसरोंनी सतार बनवली असं काही जाणकार मानतात. तत्कालीन प्रचलित संगीतानुसार अमीर खुसरोंनीदेखील ध्रुपद गायकीचा सखोल अभ्यास केला होता. ध्रुपदचे ते विद्वान गायक समजले जात होतेच, परंतु अनेक वाद्यं वाजवण्यातही ते निपुण होते.

काव्य आणि संगीत क्षेत्रात मोठी प्रतिष्ठा लाभल्यामुळे शाही दरबारातील नायकिणी, नर्तिका आणि तवायफांना गाणं शिकवण्याची जबाबदारी खुसरोंवर सोपवण्यात येई. खुसरोंनी त्यांच्यासाठी गायकीत सुलभता आणली. या नव्या, सुलभ स्वरूपातल्या गायकीलाच पुढे ख्याल गायकी असे नाव झाले असे म्हटले जाते. त्यामुळे ख्याल गायकीचं जनकत्व अमीर खुसरोंकडेच जाते.

अमीर खुसरोंपूर्वी सुमारे शंभर वर्षे हिंदुस्थानात आलेले मोईनोद्दीन चिस्ती हे सूफी संत उत्तम गायक होते. ते वेगवेगळ्या सूफी पंथीयांची वचनं म्हणजे ‘कौल’ उद्धृत करताना भजन म्हणत. अमीर खुसरो चिस्तींच्या भजनांनी प्रभावित झाले होते. अमीर यांनी मोईनोद्दीन यांच्या भजनांच्या पद्धतीत थोडा बदल केला. त्यांनी दस्तके-बा-असूल म्हणजे योग्य वजनात हाताने टाळी वाजवून ताल धरत सूफी भजन करण्याची पद्धत रूढ केली. सूफी संप्रदायाचे लोक सूफी संतांची वचनं म्हणजे कौल ठरावीक ठिकाणी टाळी वाजवत गाऊन दाखवू लागले. पुढे कौल कथन करणारा तो ‘कव्वाल’ आणि त्या गायन प्रकाराला ‘कव्वाली’ हे शब्द रूढ झाले. कालांतराने कव्वालीत परमेश्वराची आराधना, अध्यात्म याशिवाय इतर विषयही गायले जाऊ लागले. त्यामुळे अमीर खुसरोंना कव्वालीचे जनक म्हटले जाते. इ.स. १३२५ मध्ये अमीर खुसरो यांचे निधन झाले.

sunitpotnis@rediffmail.com