मत्सराच्या मुळाशीदेखील असुरक्षितता हीच भावना असते. माझ्याकडे एखादी गोष्ट नाही म्हणजे माझ्यात काही तरी कमतरता आहे, ही ती मुळातली भावना. उदा. एखादी ठरावीक वस्तू नसेल, परीक्षेत चांगले गुण नसतील किंवा आणखी काहीही. ‘आपल्याकडे नाही’ असं वाटायला लागलं, तर ‘या टीममध्ये मी बसू शकत नाही’ असं वाटतं. या अपुरेपणा/ असुरक्षिततेच्या भावनेतून, ज्यांच्याकडे या सर्व गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल असूयेची भावना निर्माण होते.

ही भावना काही प्रमाणात नैसर्गिक आहे. ती अगदी लहानपणापासून निर्माण होते. दोन लहान मुलं एकाच खेळण्यासाठी भांडतात किंवा दोन भावंडं आईचं प्रेम माझ्यावर जास्त की तुझ्यावर, यावरून. दुसऱ्याला जास्त दिलं, दुसऱ्याचं जास्त ऐकतात, दुसऱ्याला रागावत- मारत नाहीत, असं वाटतं. असं वाटणं हेच कित्येकदा चुकीचं असतं. पण तरी ही अपुरेपणाची भावना असतेच. यातून ‘इगो’ला- अस्तित्वालाच धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण होते. स्थान डळमळीत होतं आहे असं वाटतं. सुरक्षित वाटत नाही.

या भावनेची सभ्य आणि असभ्य रूपं असतात. ती माणसागणिक बदलतात. अनेक माणसं ही मत्सर भावना फक्त स्वत:शीच ठेवतात. इतरांची तुलना केली तरी स्वत:शी तडजोड करतात. स्वत:ची समजूत घालतात. स्वत:तली मत्सरभावना जाणीवपूर्वक वाढू देत नाहीत, दाखवत नाहीत. काही लहान मुलंही अशीच समजूतदार असतात.

पण काही जण या भावना इतरांपाशी बोलून दाखवतात. अशा वेळी त्या माणसाचा मत्सरी स्वभाव दिसून येतो. या भावनेचं प्रदर्शन कोणालाच आवडत नाही. मोठी माणसंसुद्धा अनेकदा अशी वागतात. दुसऱ्याचा पगार, घर, नाती अशा कशाहीवरून मत्सरी होतात. लहान मुलांसमोर असं अनेकदा बोललं गेलं, तर काही मुलं मोठय़ा माणसांना समजावतात. अशीही उदाहरणं आहेत.

या विषयावर अनेक प्रयोग झाले तेव्हा ‘न्यूरो इमेजिंग’ तंत्रानुसार प्रयोगावेळी मेंदूत ही प्रक्रिया कुठे घडते, हे दिसून आलं आहे. ‘फ्रंटियर्स इन इकॉलॉजी अ‍ॅण्ड इव्होल्युशन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटलं आहे की, ही भावना ‘सिंग्युलर कॉर्टेक्स’ आणि ‘लॅटरल सेप्टम’ या दोन क्षेत्रांशी संबंधित आहे. कारण हे दोन्ही भाग सामाजिक बंध आणि सामाजिक दु:ख यांच्याशी संबंधित आहेत. दु:ख करायचं की बंध जपायचे, याचा निर्णय स्वत:लाच घ्यावा लागतो.

– डॉ. श्रुती पानसे  contact@shrutipanse.com