डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

खेळाडू आणि बुद्धिमत्ता यांचा फार जवळचा संबंध असतो. सर्वसाधारणपणे ज्याला अभ्यास जमत नाही, त्याने खेळावं, असं अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपण बोलत असतो. असं बोलणं म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखणं आहे. कोणतीही धट्टीकट्टी माणसं उत्कृष्ट खेळाडू होऊ शकत नाहीत.  बुद्धीची-मेंदूतल्या विचारप्रक्रियांची जोड असली, खेळात तर्क लढवला तरच ती व्यक्ती चांगली खेळाडू  होते.

मदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंकडे ही बुद्धिमत्ता असते. ज्यांना भरपूर ताकदीची गरज आहे. चपळता, तंदुरुस्त शरीराची जोड तर हवीच. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की, हे खेळाडूचं शरीर सामर्थ्यवान हवंच, त्याबरोबर त्याचा मेंदूही तसाच हवा. उदाहरणार्थ, समोरून येणारा बॉल कोणत्या गतीने, कोणत्या दिशेने येत आहे, याचा योग्य अंदाज घेऊन तो सीमापार टोलवायचा कसा, हा निर्णय मेंदू घेत असतो.  हात, पाय, संपूर्ण शरीर त्याची अंमलबजावणी करत असतो. कोणत्याही मदानी खेळात निर्णय घेण्याचं काम मेंदू करत असतो. तसंच गिर्यारोहक, स्कुबा डायवर्स, पॅराग्लायडर्स अशा साहसी खेळांसाठी ही याचीच गरज असते.  त्यामुळे ही विशेष बुद्धिमत्ता आहे.  या बुद्धिमत्तेच्या माणसांची दोन उदाहरणं :  किरण बेदी शालेय वयात टेनिस खेळायच्या. टेनिस खेळण्याची सोय घरापासून बरीच लांब होती. पण शाळा-अभ्यास सांभाळून टेनिसमध्ये पारितोषिकं पटकावली. ‘कॅप्टन कूल’ एम.एस.धोनी यांचं शरीर आणि बुद्धी – विशेषत: भावनांची क्षेत्रं – लिंबिक सिस्टीमवर अतिशय चांगलं नियंत्रण आहे. याचाच वापर करून ते शारीरिक चपळता तर दाखवतातच; त्याचबरोबर डावपेचही यशस्वी करून दाखवतात.

काही कलाकार- खेळाडूंमधली ही चमक लहानपणापासूनच दिसून येते. चार्ली चॅप्लिन हे अभिनयाचं विद्यापीठ. त्यांचे आई-वडील वस्तीमध्ये करमणुकीचे खेळ करायचे. एकदा त्यांची आई रंगमंचावर गात होती. त्या वेळी तिला अचानक खूप खोकला आला. मॅनेजरने तिथेच उभ्या असलेल्या चार्लीला रंगमंचावर जायची आज्ञा केली. तेव्हा केवळ पाच वर्षांच्या असलेल्या या लहान मुलाने गाणं पूर्ण केलं. कारण ही बुद्धिमत्ता त्यांच्यात होती. गायक, नर्तक, वादक, अभिनेते आणि खेळाडू या सर्वामध्ये ही वैशिष्टय़पूर्ण बुद्धिमत्ता असते.