05 December 2020

News Flash

जे आले ते रमले.. : टॉम अल्टर ते टॉम अल्टर (१)

टॉम अल्टर म्हणजे थॉमस बीच अल्टरचे आईवडील हे मूळचे अमेरिकन आणि उत्तराखंडातील डेहराडूनजवळच्या राजपूर येथे स्थायिक झालेले

टॉम अल्टर

 सुनीत पोतनीस

या वर्षांच्या सुरुवातीला, जानेवारीत ‘जे आले ते रमले’ ही लेखमाला सुरू करताना हा विषय मला कसा सुचला ते मी नमूद केले होते. २९ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झालेले हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांतील अभिनेते टॉम अल्टर या कलावंताबद्दल उत्सुकता वाटली आणि मी ही लेखमाला लिहायला घेतली. आता वर्षअखेरीला या मालिकेचा समारोप करताना टॉम अल्टरवरच लेख लिहितो आहे.

‘‘टॉम अल्टर हा अमेरिकन होता, पण अनेक भारतीयांहूनही अधिक भारतीय होता!’’- हे उद्गार आहेत अनुपम खेर यांचे, टॉम अल्टरला आदरांजली वाहताना. खरोखर हा वंशाने अमेरिकन असलेला माणूस भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील लोकांमध्ये इतका मिसळला, की हा त्याचा गोरा वर्ण आणि निळे डोळे सोडले तर हा एक अभारतीय आहे असे कोणाला जाणवलेच नाही!

टॉम अल्टर म्हणजे थॉमस बीच अल्टरचे आईवडील हे मूळचे अमेरिकन आणि उत्तराखंडातील डेहराडूनजवळच्या राजपूर येथे स्थायिक झालेले. टॉमचा जन्म २२ जून १९५० चा, मसूरी इथला. टॉमचे वडील हे स्कॉटिश परंपरेचे अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी. टॉमचे आजोबा प्रथम १९१६ साली अमेरिकेतील ओहिओ येथून काही नोकरीच्या निमित्ताने भारतात मद्रास येथे येऊन राहिले. पुढे हे अल्टर कुटुंब लाहोरमध्ये काही काळ राहिले. पुढे टॉमचे वडील बीच अल्टर स्वतंत्र भारतात प्रथम अलाहाबाद येथे राहून तेथील महाविद्यालयात इतिहास आणि इंग्लिश या विषयांचे अध्यापन करीत. अलाहाबादनंतर जबलपूर आणि सहरानपूरमध्ये अध्यापकाची नोकरी केल्यावर त्यांनी उत्तराखंडात डेहराडूनजवळ राजपूर या गावात स्थायिक होऊन ख्रिस्ती मिशनचे कार्य सुरू केले. तिथे त्यांनी विशाल ध्यान केंद्र या नावाचा आश्रम सुरू केला. या आश्रमात सर्व धर्माचे लोक चिंतन, मनन आणि अध्ययन यासाठी येत असत. राजपूर जवळच्या मसूरीमध्ये टॉमचा जन्म झाला आणि मसूरीच्याच वूडस्टॉक स्कूलमध्ये टॉमचं प्राथमिक शिक्षण झालं.

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2018 2:04 am

Web Title: tom alter to tom alter
Next Stories
1 कुतूहल : ओगनेसन
2 जे आले ते रमले.. : दीदी काँन्ट्रॅक्टर यांचे स्थापत्य (२)
3 कुतूहल : टेनसीन
Just Now!
X