News Flash

नवदेशांचा उदयास्त : युक्रेन

२०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये युक्रेनने १९ पदके मिळविली आहेत.

नवदेशांचा उदयास्त : युक्रेन

‘ब्रेड बास्केट ऑफ युरोप’ किंवा ‘युरोपातील धान्याचे कोठार’ या नावाने प्रसिद्ध असलेला पूर्व युरोपातील युक्रेन हा देश बऱ्याच वेळा चर्चेत असतो ते आणखी एका कारणामुळे. ते म्हणजे युक्रेनचा एक प्रांत असलेला क्रिमिया या प्रदेशावर रशियाने आक्रमण करून दडपशाहीने त्यावर एप्रिल २०१४ मध्ये कब्जा केला. या घटनेने तेव्हा संपूर्ण जगभरात खळबळ माजवली. पुढे क्रिमिया हा रशियाचाच एक भाग बनला आहे.

२०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये युक्रेनने १९ पदके मिळविली आहेत. सहा लाख चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेला युक्रेन क्षेत्रफळाने मोठय़ा असलेल्या युरोपियन देशांमध्ये रशियानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाच्या पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया आणि हंगेरी, पूर्व आणि वायव्येस रशिया, उत्तरेस बेलारूस, नैर्ऋत्येस रोमानिया हे देश तर दक्षिणेस काळा समुद्र अशा याच्या चतु:सीमा आहेत. कीव्ह ही या देशाची राजधानी. एकेकाळी सोव्हिएत युनियनचा संस्थापक सदस्य आणि प्रमुख आधारस्तंभ असलेल्या युक्रेनच्या इतिहासात नवव्या शतकात येथे स्थापन झालेले कीव्हन रूस राज्य ही एक बलाढय़ शक्ती होती. बहुतांश लोक या राज्यात पूर्व स्लाव संस्कृतीचे होते. १३ व्या शतकात या कीव्हन राज्याचे विघटन होऊन युक्रेनमधील बळकाविता येईल तेवढा प्रदेश पोलिश, तुर्की आटोमान, ऑस्ट्रिया-हंगेरी, रशियन साम्राज्य यांनी बळकावला. परंतु पुढे या सत्तांमध्येही युक्रेनच्या स्वामित्वासाठी संघर्ष होऊन एकोणिसाव्या शतकात युक्रेनचा मोठा हिस्सा रशियन साम्राज्यात आणि बाकी लहान हिस्सा ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. या काळात रशिया आणि ऑस्ट्रियात असलेल्या युक्रेनियन प्रदेशाची स्थिती एखाद्या मागासलेल्या ग्रामीण क्षेत्रा प्रमाणे होती. या तुलनेत रशिया ऑस्ट्रियाच्या मुख्य प्रदेशात मात्र खेडय़ांचे शहरीकरण आणि आधुनिकीकरण वेगाने होत राहिले. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये बुद्धिजीवी वर्गात राष्ट्रवादाचा उदय होऊन वातावरण तापू लागले. यापूर्वी रशिया-तुर्की युद्धानंतर रशियाने युक्रेनमधील हजारो तुर्की लोकांना बाहेर काढून तिथे जर्मन लोकांना स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. आता एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस युक्रेनियन लोकांमध्ये युक्रेन सोडून रशियन साम्राज्यातील पूर्वेकडील सैबेरिया आणि मध्य आशियाई प्रदेशात स्थलांतर करण्याची लाट आली. १९०६ पर्यंत असे १६ लाख युक्रेनियन लोक दूरवरच्या पूर्वेकडील प्रदेशात स्थायिक झाले. या स्थलांतरित युक्रेनियन वस्त्यांना ग्रीन युक्रेन असे नाव दिले गेले.

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2021 2:36 am

Web Title: ukraine country profile history of ukraine country zws 70
Next Stories
1 कुतूहल –  कृतिशील गणित शिक्षण
2 नवदेशांचा उदयास्त : स्लोव्हाकिया
3 कुतूहल: असा असावा गणितशिक्षक
Just Now!
X