News Flash

वॉसा आणि लाऊफेनबुर्ग

तीन वर्षांनी ही नौका बांधून पूर्ण झाली आणि तिला जलार्पण करण्याचा समारंभ सुरू झाला.

मोजमापनातल्या चुकांमुळे काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे वॉसाचं. नौकाबांधणीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वीडनमध्ये वॉसा युद्धनौका बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १६२६ पासून सुरू होता. स्वीडनचा राजा गुस्ताव अ‍ॅडोल्फस यांच्या इच्छेनुसार या नौकेवर ७२ ब्रॉन्झ तोफा उभारण्यात आल्या होत्या.

तीन वर्षांनी ही नौका बांधून पूर्ण झाली आणि तिला जलार्पण करण्याचा समारंभ सुरू झाला. १० ऑगस्ट १६२८. फारसा वारा नव्हता. नौका पाण्यात शिरली, जेमतेम एक मल पुढे गेली आणि हळूहळू उजवीकडे कलंडत तिने ३० खलाशांसाह जलसमाधी घेतली!

या घटनेची संपूर्ण चौकशी झाली, पण कोणालाच शिक्षा झाली नाही. नंतर १९६१ मध्ये ही बुडालेली वॉसा नौका वर काढण्यात आली आणि अत्याधुनिक साधनांनी तिचं पूर्ण परीक्षण करण्यात आलं. जहाज बुडण्याचे एक आश्चर्यकारक कारण या तपासणीमध्ये मिळालं. नौकेची एक बाजू दुसऱ्या बाजूच्या तुलनेत अधिक जाडीची होती आणि या असममितीमुळे नौका कलंडून बुडाली होती. हे कसं घडलं?

तर नौकेवर एकूण चार फूटपट्टय़ा मिळाल्या. त्यातल्या दोन स्वीडिश फुटांच्या म्हणजे १२ इंचाच्या होत्या, तर दोन अ‍ॅमस्टरडॅम फुटांच्या म्हणजे ११ इंचाच्या होत्या!

दोन देशांमधल्या दोन मोजपट्टय़ांमुळे ही आफत ओढवली होती;  तर अलीकडे लाऊफेनबुर्गमध्ये समुद्राची पातळी मोजण्याच्या दोन तऱ्हांनी सगळ्यांच्या नाकीनऊ आणले होते.

२००३ मध्ये जर्मनी आणि स्वित्र्झलड यांना जोडणाऱ्या पुलाचं काम लाऊफेनबुर्ग शहरात सुरू होतं. समुद्राची पातळी मोजताना जर्मनीच्या बाजूने उत्तर समुद्राचा संदर्भ होता, तर स्वित्र्झलडच्या बाजूने भूमध्य सागराचा संदर्भ घेतला जात होता. दोन्हींमध्ये २७ सेंमीचा फरक आहे हे बांधकामावरच्या तज्ज्ञांना माहीत होतं, पण एका बाजूने २७ सेंमी वजा करण्याऐवजी कोणी तरी त्यात २७ सेंमीची भर घातली!

याचा परिणाम म्हणजे दोन्ही बाजूंनी पूल पूर्ण होत आला, तेव्हा मध्यावर पुलाच्या दोन बाजूंच्या उंचीमध्ये चक्क ५४ सेंमीचा फरक होता!  मग जर्मन बाजूचं बांधकाम ५४ सेंमीनी खाली आणून लाऊफेनबुर्ग पूल एकदाचा पूर्ण करण्यात आला.

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

लिहिणं ही गरज असल्याने..

१९८९चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर उर्दू लेखिका कुर्रतुल ऐन हैदर यांनी काही विचार मांडले. त्या म्हणाल्या, ‘मी ज्या काळात लिहायला सुरुवात केली तो काळ प्रगतीवादी लेखकांचा सुवर्णकाळ होता. माझ्या लेखनात सामाजिक जागृती नाही, असं म्हणून त्यांनी मला नाकारलं. मला त्यांच्या निर्णयाचं खूप आश्चर्य वाटलं. मी माझ्या तऱ्हेने समकालीन परिस्थितीचं, तसंच देशाच्या मानसिकतेचं चित्रण करीत होते. आपले विषय शोधण्यासाठी मला दूर कुठे जावं लागत नाही. माझ्या आसपासचं वातावरण मोठं विचारोत्तेजक आणि समृद्ध असं होतं. १९४७ मध्ये मी जेव्हा तरुण होते, तेव्हा मी माझी पहिली कादंबरी ‘मेरे भी सनमखाने’ लिहिली होती. काही समीक्षक त्या कादंबरीची गणना उर्दूतील दहा श्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये करतात. जगातले कित्येक देश ज्या भयावह स्थितीतून चालले आहेत ते कुणापासून लपून राहिलेले नाही. विभिन्न लोक एकाच प्रकारच्या भाषेचा आपल्याला अनुकूल असा उपयोग करीत आहेत..

विकसित देशांमध्ये सिनेमा तसेच ‘टीव्ही’ने रचनात्मक साहित्याला संपवलेलं नाही. पण येथील मोठय़ा प्रमाणावरील अशिक्षित लोकांपर्यंत साहित्य, केवळ इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेच पोहोचवता येईल.

भारतीय भाषांत लेखक लेखनावर आपली उपजीविका चालवू शकत नाही. कारण कित्येक भारतीय भाषांत लेखकाला रॉयल्टी देण्याची प्रथा नाही. ‘आग का दरिया’ ही कादंबरी मागच्या तीस वर्षांतील दोन्ही देशांतील सर्वाधिक खपाची कादंबरी आहे. २५ वर्षांपूर्वी दोन प्रसिद्ध प्रकाशकांनी या कादंबरीच्या अनुवादासाठी एक छोटीशी रक्कम मला भीक दिल्याप्रमाणे दिली होती. बस्स. त्यानंतर या कादंबरीसाठी मला रॉयल्टी मिळालेली नाही. दक्षिण आशियाई देशांत प्रकाशनासंबंधी कोणते कायदेच नाहीत. त्यामुळे पुस्तकांच्या चोरटय़ा आवृत्त्या छापल्या जाताहेत आणि त्याची कुणालाही चिंता नाही. तरीही आज जो कोणी लिहितो आहे, ते त्याच्यासाठी लिहिणं ही एक गरज असल्याने लिहितो आहे.

उर्दू साहित्यावर नजर टाकली तर असं लक्षात येईल की ते साहित्य लिहिणारे लेखक इमानदार होते. मनाने साफ होते.. हे फक्त एका भाषेचे लेखक. या लेखकांच्या संख्येचं भारतीय भाषांच्या संख्येशी गुणोत्तर काढून, त्यांची मानवी मूल्यांविषयीची बांधिलकी किती खोलवर आणि व्यापक आहे- कलेविषयीची निष्ठा त्यांच्यामध्ये किती आहे- हे बघावं लागेल.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 1:43 am

Web Title: vasa warship laufenburg
Next Stories
1 …आणि हवेत उडणाऱ्या एअर कॅनडाच्या फ्लाइटची इंधनटाकी रिकामी झाली!
2 कुतूहल : मापनातल्या गफलती
3 मिरचीचा तिखटपणा
Just Now!
X