08 April 2020

News Flash

मनोवेध  : कल्पनादर्शन

आपण एखादे दृश्य कल्पनेने पाहतो त्या वेळीही हाच भाग सक्रिय होतो आणि त्यानुसार शरीरात रसायने पाझरतात.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

मानसिक तणावामुळे युद्धस्थितीत गेलेले शरीर पुन्हा शांतता स्थितीत आणण्याचा आणखी एक उपाय म्हणजे ‘कल्पनादर्शन’ होय. त्यासाठी एखाद्या आनंददायी प्रसंगाची वा दृश्याची कल्पना करून, ते डोळे बंद करून स्वप्न पाहतो तसे पाहायचे. आपण रसाळ, पिकलेल्या लिंबाचे असे ध्यान केले तर तोंडाला पाणी सुटते. भविष्यातील संकटाचे किंवा भूतकाळातील भांडणाच्या प्रसंगाचे स्मरण करतो त्या वेळी नकळत त्याचे कल्पनादर्शन ध्यान होत असते. त्यामुळे आपल्या शरीरात युद्धस्थितीतील रसायने पाझरतात. ही स्थिती बदलायची असेल तर आपल्या शरीरात शांतता स्थितीतील रसायने पाझरायला हवीत. त्यासाठी आपल्या मनाला शांत करणारे एखादे दृश्य किंवा ते न जमल्यास देवाचे/ गुरूचे/ आपल्या प्रिय व्यक्तीचे रूप कल्पना करून पाहायचे. मानसपूजा हेही कल्पनादर्शन आहे.

आपण एखाद्या प्रसंगाची कल्पना करतो त्यानुसार आपल्या शरीरात बदल का होतात, याचे संशोधन होत आहे. आपला मेंदू प्रत्यक्ष कृती आणि त्या कृतीची कल्पना यांमध्ये फरक करीत नाही.  ‘ईएमजी’ म्हणजे इलेक्ट्रोमायोग्राफच्या मदतीने स्नायूतील इलेक्ट्रिक हालचाल मोजता येते. प्रत्यक्ष धावताना आपल्या पायाच्या स्नायूंमध्ये इलेक्ट्रिक हालचाल वाढते. गंमत म्हणजे प्रत्यक्ष धावले नाही; पण धावत आहोत अशी फक्त कल्पना केली, तरी त्याच स्नायूंमधील इलेक्ट्रिक हालचाल वाढते. एखादी कृती करण्यासाठी आपल्या मेंदूतील जो पेशीसमूह मार्ग सक्रिय होतो, तोच मार्ग त्या कृतीच्या केवळ कल्पनेनेही सक्रिय होतो. मेंदूवर संशोधन करणारे प्रेरक वक्ते-लेखक डॉ. श्रीनिवासन पिल्ले यांच्या मते, आपल्या मेंदूतील ‘पोस्टेरिअर परायटल कॉर्टेक्स’ हा भाग ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या माहितीचा अर्थ लावतो. त्यानुसार आवश्यक कृतीची रूपरेषा इथे तयार होत असते. आपण एखादे दृश्य कल्पनेने पाहतो त्या वेळीही हाच भाग सक्रिय होतो आणि त्यानुसार शरीरात रसायने पाझरतात.

याच तंत्राचा उपयोग सत्त्वावजय चिकित्सेमध्ये त्रासदायक पूर्वस्मृती स्वच्छ करण्यासाठी केला जातो. अशा स्मृती सुप्तमनात साठलेल्या असतात, त्यांच्यामुळे शरीरात युद्धस्थिती निर्माण होत राहते. याचमुळे तणावजन्य शारीरिक आजार होऊ शकतात. ते बरे करण्यासाठी कल्पनादर्शनाचा उपयोग करून शिकवले जाणारे तंत्र परिणामकारक आहे.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 1:01 am

Web Title: visualization techniques of emg electromyography zws 70
Next Stories
1 कुतूहल : पहिले ‘वृक्ष संमेलन’
2 मनोवेध : स्नायू शिथिलीकरण
3 मनोवेध : कर्ता आणि साक्षी
Just Now!
X