पावसाळ्याच्या दिवसांत पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर गाडी बंद पडल्याचा अनुभव येतो. बहुधा याचे कारण आपल्या वाहनाच्या टाकीत गेलेले पाणी हे असते. कितीही काळजी घेतली, तरी कधीतरी जोरदार पाऊस कोसळतो आणि जमिनीत झिरपत गेलेले पाणी पेट्रोल पंपावरील टाकीत शिरते. ते तिथल्या तोटीतून इंधन भरताना आपल्या गाडीच्या टाकीत आलेले असते.

पेट्रोलियम इंधने आणि वंगणे ही हायड्रोकार्बन रसायनांनी बनलेली असतात आणि ती पाण्यात सहसा मिसळत नाहीत. पाण्याच्या अस्तित्वामुळे बाष्पशील इंधनाचे ज्वलन होण्यास अडथळा येतो व इंजिन बंद पडू शकते. यासाठीच इंधने पेट्रोल पंपावर वाहून आणताना, टँक-ट्रकमध्ये भरण्यापूर्वी आणि ती गाडी पंपावर खाली करण्यापूर्वी इंधनातील पाण्याची तपासणी केली जाते. पेट्रोलियम इंधन-वंगणात पाणी शिरणे म्हणजे एकप्रकारची भेसळच होय. त्यामुळे इंधनाची आवश्यक कार्यक्षमता ढासळते. इंधन-वंगणातील मुक्त पाणी इंधनटाकीच्या तळाशी बसते.

वंगणे आणि पाणी परस्परांचे एकप्रकारे शत्रू होत. वंगणामध्ये रासायनिक पुरके  असतात. पाणी अवाजवी प्रमाणात वाढले, तर त्याची त्या रसायनाशी प्रक्रिया होऊन पांढुरका अवक्षेप तयार होतो. त्यामुळे वंगणाची वंगणियता पार ढासळून ते निकामी होते. त्यासाठीच वंगणतेलांची निर्मिती करताना, त्याची साठवणूक करताना आणि वापर करण्याआधी त्यातले पाणी तपासले जाते.

वंगणतेलातील पाणी आजमाविण्याची प्राथमिक चाचणी म्हणजे ‘क्रॅकल टेस्ट’ होय. परीक्षानळीत तेलाचा नमुना घेऊन तो तापवला असता तेलात असलेले पाणी ‘टिक टिक..’ आवाज करत म्हणजे तडतडत बाहेर पडते. तेलात पाण्याचे प्रमाण जितके जास्त, तितका हा आवाज मोठा आणि जास्त वेळ येतो. पण या चाचणीने तेलातील पाण्याच्या प्रमाणाचा केवळ अंदाज घेता येतो, नेमके प्रमाण कळत नाही.

नेमके प्रमाण किंवा तेलातील पाण्याची टक्केवारी किती, हे बघायचे असेल तर ‘डीन अ‍ॅण्ड स्टार्क’चे उपकरण वापरावे लागते. या चाचणीत नमुन्याचे हलक्या द्रावणासोबत १: १  प्रमाणातले मिश्रण तापविले जाते आणि बाजूच्या प्रमाणीकरण केलेल्या तोटीत जमा होणारे पाणी मोजून त्याची नमुन्यातील टक्केवारी काढली जाते. फन्रेस ऑइलसारख्या घट्टसर काळ्या इंधनासाठी हीच पद्धत वापरतात.

प्रशीतन (रेफ्रीजरेशन)सारख्या यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या वंगणतेलात पाण्याचा अंश अजिबात चालत नाही. त्यातील पाणी पार्ट्स पर मिलियन म्हणजे एक दशलक्षांश (१/१०,००,०००) एककात मोजावे लागते. त्यासाठी ‘कार्ल-फिशर’चे उपकरण वापरतात.

जोसेफ तुस्कानो

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टी, मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

भाषा हीच अनुभूतीची दिशा

१९९९चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात निर्मल वर्मा यांनी एकूणच साहित्याच्या स्वरूपाविषयी आपले विचार व्यक्त केले आहेत. ते म्हणतात, ‘‘साहित्य हे एखाद्या बेचैन नदीप्रमाणे कडीकपारीतून, दगडधोंडय़ातून, झाडाझुडपातून निरंतर वाहत राहते. जीवनातील अर्धसत्यामधून संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी, ज्या तृष्णेतून कवितेचा, कथेचा, कादंबरीचा जन्म होतो, त्यानेच आपण आपली तहान भागवतो! या दृष्टीने साहित्य हे अन्य विद्याशाखांहून वेगळे आहे. लेखकाने शब्दांद्वारे असं एक जग निर्माण केलंय की त्या जगात प्रत्येक निराश व्यक्ती कोणत्याही देशाचा पासपोर्ट न दाखवता राहू शकते. साहित्य त्या पुराणातील वृक्षाप्रमाणे ‘ऊध्र्वमूल अधशाख’ : मुळं आकाशात फैलावून आणि फांद्या पृथ्वीच्या पोटात पसरून उभे आहे. या वृक्षाची प्रत्येक फांदी एक भाषा आहे. ज्यावर जगातील प्रत्येक संस्कृती आपल्या आठवणींचे आणि संस्कारांचे एक घरटे बनवते. .. .. आम्ही ज्या भाषेत विचार करतो, लिहितो त्यात केवळ व्यक्तिगत भावभावनाच व्यक्त करीत नाही तर त्या भाषेच्या माध्यमातून एखाद्या देशाची आणि समाजाची ओळख आपल्याला होते. लेखक कितीही स्वतंत्र असला तरी लिहिताना तो शब्दाच्या अधीन असतो. एका बिंदूनंतर स्वत: भाषा आमच्या विचारांची आणि अनुभूतीची दिशा नियंत्रित करू लागते.

आमच्यातील प्रत्येक लेखक आपापल्या भाषेत लिहितो, पण त्या कारणानेच तो आपोआप भारतीय भाषेच्या कुटुंबातील एक घटक बनतो आणि जेव्हा मी कुटुंब असा शब्द वापरतोय तेव्हा माझ्या मनात फक्त भौगोलिक संदर्भ नाही, तर तो शब्द मी सांस्कृतिक अर्थाने वापरतोय. जिथे भारतीय भाषा एकमेकांपासून भिन्न आहेत तरीही त्यातील सांस्कृतिक संदर्भ आणि स्मृतिसंकेत त्या इतिहासातून प्राप्त करतात. त्या सर्वामध्ये एकतेचं तत्त्व वास करीत असतं.

या दृष्टीने भारतीय साहित्य वेगळे आहे. इथे लेखकाला एकाच वेळी अनेक कालखंडांत आणि अनुभवांच्या वेगवेगळय़ा स्तरांवर जगावं लागतं.

कोणतीही साहित्यिक कृती केवळ भारतीय भाषेत लिहिल्याने उत्कृष्ट होत नाही तर प्रत्येक उत्कृष्ट साहित्यकृतीच्या मागे एक अखंडित परंपरा उभी असते. मला खरंच विचाराल तर हा पुरस्कार माझ्यासाठी नसून त्या पुस्तकांसाठी आहे. छ’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com