मेंदूला आव्हानात्मक काम, नवे अनुभव देत गेलं तर तो सतत तरतरीत राहतो. मुलं निसर्गत:च वेगवेगळी आव्हानं शोधत असतात. कारण त्यांना सतत शिकत राहायला आवडतं. मेंदूची मागणी पूर्ण करण्याच्या कामात ते सततच असतात.. जर मेंदूशास्त्रीयदृष्टय़ा ही गोष्ट सिद्ध झालेली असेल; तर मग- मुलं बऱ्याचदा कंटाळलेली का असतात? अभ्यास करायला कायमच नकार का असतो?

याचं कारण आपल्या अभ्यासपद्धतीत सापडतं. मुलांना नवी नवी आव्हानं स्वीकारायला आवडतं. पण त्यांच्या शालेय आयुष्यात आव्हानं असतात तरी कुठे? पुस्तकात लिहिलेलं वहीत उतरवणं, प्रश्नांची उत्तरं पुन्हा लिहिणं, पाठ करून लिहिणं, वही उतरवून काढणं,  पुन्हा पुन्हा परीक्षा देणं यात आव्हान आहे का? अभ्यासाचा विषय एकदा समजून घेणं म्हणजे नवा विषय आत्मसात करणं यात मेंदूला आव्हान मिळतं. पण त्याचं पुन्हा पुन्हा सादरीकरण करण्यातून नवी पेशीनिर्मिती होत नाही. ‘डिट्टोज डोन्ट मेक डेन्ड्राइट्स’ या नावाचं एक संशोधनात्मक काम आहे. त्यांचा हा निष्कर्ष आहे. अभ्यास अधिकाधिक पक्का होण्याचं काम यातून काही प्रमाणात होतं. पण पुढे त्यांचा चांगलाच कंटाळा येतो. मुलांकडून याच प्रकारच्या अपेक्षा सातत्याने केल्या जातात, म्हणून ते कंटाळतात. अभ्यास हा आव्हानांशी – वेगवेगळ्या उपक्रमांशी जोडला गेला तरच त्यांना त्यातून नक्कीच आनंद मिळेल. मग हे उपक्रम अवघड असतील तरी त्यात त्यांना आनंदच मिळेल.

अभ्यास आवडावा असं वाटत असेल तर काही गोष्टी करायला हव्यात. अभ्यासाचा संबंध शिक्षांशी जोडू नये, तसाच तो बक्षिसाशीही जोडू नये. आमिषं किंवा दडपणं अशी कसलीच कृत्रिमता नको, असं मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अल्फी कोहन हे त्यातले प्रमुख आहेत. ‘अभ्यास हा स्वत:साठी करायचा असतो. शिक्षकांसाठी किंवा पालकांसाठी नाही’, हे प्रथमपासूनच मनावर ठसवावं. वर्ग, पाठय़पुस्तकं, शिक्षक, फळा, गृहपाठ, टय़ूशन याच्याबाहेर शिक्षण असतं, हे वेळोवेळी दाखवून द्यावं. अभ्यासाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक संकल्पनेचा संबंध व्यावहारिक जगाशी आहे, तो संबंध दाखवून द्यावा. अभ्यासापलीकडच्या मोकळ्या जगाचा आनंददायक अनुभव मुलांना घेऊ देणं फारच आवश्यक. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात उतरवता आल्या तर  मुलांना अभ्यासाचा कंटाळा येणार नाही.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com