मॉन्सूनचा अंदाज बांधणे, हे विज्ञानासाठी कोडे राहिलेले आहे. अंदाजासाठी किती घटक वापरले तर अचूक भाकीत करता येईल? याचे उत्तरही मजेशीर आहे. कारण एच. पी. ब्लॅनफोर्ड यांनी हिमालयातील बर्फाची पातळी हा एकमेव घटक वापरून १८८२ ते १८८५ साठी चांगला अंदाज मिळवला होता, तर गिल्बर्ट वॉकर यांनी जवळपास २०० घटक भारतीय मॉन्सूनवर परिणाम करतात, असे नमूद केले आहे. अधिक घटक वापरणे, कदाचित अंदाजाची अचूकता वाढवू शकेल; पण त्या सर्व घटकांतील परस्परसंबंध तपासणे आणि प्रत्येकाबाबत खात्रीपूर्ण आकडेवारी प्रत्यक्षात मिळवणे जिकिरीचे असते. तरी मर्यादित घटक घेऊन प्रगत गणिती प्रतिकृती आणि संगणक आधारित अनुकार पद्धती (सिम्युलेशन) वापरणे, हे धोरण सगळीकडे प्रचलित झाले आहे.
मॉन्सूनच्या दूरगामी म्हणजे जून ते सप्टेंबर कालावधीच्या अंदाजासाठी अनेक घटक वापरले जातात, पण ते पुढीलपकी एका गट-घटकात किंवा वर्गात मोडतात : * क्षेत्रीय परिस्थिती * ईएनएसओ निर्देशांक * विषुववृत्तीय-छेद प्रवाह * जागतिक/अर्ध गोलार्धातील परिस्थिती
वातावरण-समुद्र-भूमी यांचा घनिष्ठ संबंध दाखवणारे वरील गट-घटक मॉन्सून प्रक्रियेची जटिलता दाखवतात. तरी त्यांच्याबाबत उपलब्ध जुन्या आकडेवारीवर अनुभवजन्य आणि सांख्यिकी पद्धतींचा वापर करून अंदाज मांडले जातात. त्यात सामान्य सहसंबंध विश्लेषण ते प्रगत अशा प्रमाणभूत सहसंबंध विश्लेषण आणि न्यूरल जाळे प्रतिकृतींचा समावेश असतो.
अनेक अभ्यास असे दाखवतात की, ईएनएसओ निर्देशांक हा घटक अंदाज बांधण्यात कळीची भूमिका बजावतो. ईएनएसओ हा ‘एल निनो’ हा सागरी घटक आणि सदर्न ओसिलेशन हा वायूतील घटक या दोघांनी मिळून बनलेला असतो. सदर्न ओसिलेशन निर्देशांक प्रशांत महासागरातील ताहिटी आणि ऑस्ट्रेलियाजवळच्या हfxदी महासागरातील डार्वनि या भागातील प्रतलावरील वायूतील दाबामधील फरकावरून मोजला जातो. तसेच १९७१ साली शोधलेला मॅद्देन जुलियन ओसिलेशन (एमजेओ) हा वारे, समुद्र पृष्ठावरील तापमान, ढगांची घनता आणि पर्जन्यवृष्टी यातील बदल व्यक्त करणारा घटकही भारतातील मॉन्सूनवर परिणाम करतो. तरी देशात सध्या असलेल्या ८०० हवामान निरीक्षण केंद्रांची संख्या किमान ६,००० पर्यंत वाढवून त्यांचे जाळे गुंफल्यास आणि त्यांनी दिलेली आकडेवारी वेळेत विश्लेषित करण्याची संगणकीय सुविधा यांची जोड मिळाल्यास, स्थानिक पातळीवर सहसा बिनचूक अंदाज देण्यास मदत मिळेल, जे नितांत गरजेचे आहे.
डॉ. विवेक पाटकर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
वाग्देवीचे वरदवंत : तकळ्ळीं यांचे सामाजिक भान
तकळ्ळी शिवशंकर यांची ‘परमार्थगल’ (१९३६) ही दोन अनौरस मुलांच्या आईची कथा आहे. त्यातील एक मुलगा लग्नापूर्वी झालेल्या बलात्कारातून जन्म पावलेला असतो तर दुसरा लग्नानंतर. या कादंबऱ्यांचे विषय आणि तो काळ यांचा विचार करता मध्यमवर्गीय मानसिकतेवर प्रहार करणाऱ्या या सामाजिक कादंबऱ्यांमुळे समाजात खळबळ माजणं स्वाभाविकच होतं.हळूहळू राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत बदल होऊ लागले आणि सर्वसामान्य माणसांच्या समस्या साहित्यात चित्रित होऊ लागल्या. भूमिहीन, दरिद्री शेतमजूर, भंगी, कोळी या सामान्य माणसांच्या समस्या हे तकषी यांच्या कादंबऱ्यांचे विषय झाले. उदा. ‘तोट्टीयुडे माकन’ (भंग्याचे पोर), ‘रंटी टंडषी’ (दोन शेर धान्य १९४८) ‘तलयोडु’ (कपाळ- १९४८) आणि ‘तोडीवर्गय’ (भिकारी लोक १९५०) या कादंबऱ्या आणि ‘नित्यकन्निका’ (अविवाहित- १९४५), ‘चमनिकल’ (मित्र- १९४५) आणि ‘इनकलाब’ (१९५०) इ. कथासंग्रहांनी त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
‘एनिप्पडिकल’ (शिडीची पायरी १९६४) या कादंबरीत १९३०-५० च्या काळाचे त्रावणकोर या माजी संस्थानाचे चित्रण आहे. आपला स्वार्थ साधला की ज्या शिडीवरून आपण वर चढतो ती शिडीच लाथाडून देणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांचा बुरखा यात फाडलेला आहे. या कादंबरीवर १९७३ मध्ये चित्रपट तयार केला होता. ‘भंग्याचा मुलगा’- ही एलैप्पी शहरातील भंग्यांच्या शोचनीय दुर्दशेची कहाणी आहे. वास्तव जीवनातील पीडादायक अनुभव वाचताना वाचकही हेलावून जातात.
‘दोन शेर धान्य’ ही तकळ्ळींची आवडती कादंबरी आहे. याचे कथानक कुट्टनाद या गावाच्या पाश्र्वभूमीवर आहे. येथे शेतीचे काम खूप कष्टप्रद आहे. परया आणि पुलया जातीचे स्त्री-पुरुष अत्यंत अवघड परिस्थितीत हे काम करत असतात. पण काळ बदलला तसे नातेसंबंधही बदलत चालले. या तळागाळातल्या शोषित मजुरांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे अखेर ते आंदोलन छेडतात. ‘भिकारी लोक’ या कादंबरीत बेघर, निर्धन अशा दलित समाजाच्या दयनीय अवस्थेचे हृदयद्रावक चित्रण आहे. स्वातंत्र्य लढय़ामध्ये ज्या सामाजिक समस्यांकडे विशेष रूपाने लक्ष वेधले गेले होते, त्यांनाच तकळ्ळी यांनी आपल्या लेखनाचे विषय बनवले.
मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com