समजा एखाद्या प्राण्याच्या शरीराच्या तुकडय़ापासून त्याच्यासारखाच पूर्ण नवीन सजीव होऊ शकेल? नाही ना? पण असेही काही सजीव आहेत, ज्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याच्यासारखाच नवीन प्राणी निर्माण होऊ शकतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबतीत पहिले नाव येते प्लॅनेरिया या चपटय़ा कृमीचे! जिवंत प्लॅनेरियाच्या एखाद्या तुकडय़ापासून अख्खा प्लॅनेरिया तयार होतो!  म्हणजे शेपटीच्या लहान तुकडय़ापासूनदेखील डोळय़ा-डोक्यासह नवीन प्लॅनेरिया तय्यार! बरं हा तुकडा मोठाच असायला पाहिजे असे नाही. प्लॅनेरियाच्या शरीराच्या अगदी लहान तुकडय़ापासूनही नवीन प्लॅनेरिया तयार होतो. तो तुकडा किती लहान असावा, म्हणजे त्यापासून नवीन प्लॅनेरिया तयार होईल?

१८९८ मध्ये टी. एच. मॉर्गन या शास्त्रज्ञाने असे सिद्ध केले की, प्लॅनेरियाच्या शरीराचा २७७वा भाग जरी कापून घेतला तरी त्या भागापासून नवीन पूर्ण प्लॅनेरिया निर्माण होतो. म्हणजे एका प्लॅनेरियाचे २७७ सारखे तुकडे केले; तर त्यापासून २७७ नवीन प्लॅनेरिया तयार होऊ शकतात तर..! हे होते कसे?

प्लॅनेरियाच्या सर्व भागांतल्या ऊतींमध्ये ‘निओब्लास्ट’ प्रकारच्या पेशी असतात. ‘निओब्लास्ट’ पेशींचं वैशिष्टय़ म्हणजे शरीराचा भाग कापला गेला की तेथे या पेशी अतिशय वेगाने वाढायला लागतात. या पेशींपासून ज्या ऊती तयार होतात, त्या ऊतींना आद्यऊती (ब्लास्टेमा) म्हणतात.

प्लॅनेरियाच्या तुकडय़ातही अशा आद्यऊतींचा आधी एक गोलाकार तयार होतो. मग या आद्यऊतींपासून प्लॅनेरियाचे अवयव आकार घेऊ लागतात. म्हणजे काही ऊतींपासून डोळे, डोके असे अवयव होतात तर काही ऊतींपासून शेपटी तयार होते. काही आठवडय़ांतच असे सगळे अवयव वाढून पूर्ण वाढीचा नवीन प्लॅनेरिया तय्यार!

एखाद्या अवयवाच्या एका तुकडय़ापासून तो पूर्ण अवयव तयार होणे, याला पुनर्जनन म्हणतात. पुनर्जनन हा प्रजननाचा प्रकार नाही. पुनर्जनन केवळ अविकसित प्राणी गटामध्येच होणारी प्रक्रिया आहे. उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यातील प्रगत सजीवांची ही क्षमता हरवली.

केवळ पालीसारखा प्राणी शेपटाकडचा (फक्त शेपटीचाच) भाग पुनर्जनन करू शकतो आणि क्वचितप्रसंगी पाय! मानवात जखम भरून येणे, हे एक प्रकारचे पुनर्जननच आहे. 

आपल्यातही अशी- अवयवाच्या एका तुकडय़ापासून संपूर्ण अवयवाच्या पुनर्जननाची- क्षमता असती तर..?

काही मूळ पेशी ज्यांना स्तंभपेशी (स्टेमसेल) म्हणतात; अशा स्तंभपेशींमध्ये कोणताही अवयव/ ऊती यांचे पुनर्जनन करण्याची क्षमता असते. जो अवयव हवा असेल, त्याप्रमाणे स्तंभपेशीतील संबंधित जनुके उद्दीपित करून तो अवयव पूर्ण मिळवण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत. अर्थात स्तंभपेशींचा अभ्यास करताना प्लॅनेरियाच्या या गुणधर्माचा विचार करणे आलेच.

– चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All about planarian zws
First published on: 29-08-2022 at 01:44 IST