एरिक फ्रॉम हे कार्ल रॉजर्स यांचेच समकालीन होते. सुरुवातीला त्यांनी मनोविश्लेषक म्हणून काम केले; पण नंतर ‘मानवकेंद्रित मानसशास्त्रा’त मोलाची कामगिरी केली. समुपदेशनामध्ये व्यक्तीला विचार करून निर्णय घ्यायला प्रवृत्त केले जात असले; तरी सामान्य माणसासाठी ते कठीण आहे, असे त्यांचे मत होते. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य माणसाला असते हे खरे असले; तरी या स्वातंत्र्याची माणसाला भीती वाटते. कारण निर्णय घेताना त्याच्या परिणामांची निश्चिती नसते, निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता असते. त्यामुळेच निर्णय घेताना चर्चमधील फादर किंवा पुढारी यांना विचारून ते सांगतील तो पर्याय माणसे निवडतात. हे निरीक्षण फ्रॉम यांनी ‘द फीअर ऑफ फ्रीडम’ या पुस्तकात विस्ताराने मांडले आहे.

आपल्या समाजातदेखील मानसोपचारातील समुपदेशन सर्वदूर न पसरण्याचे हे एक कारण असू शकते. निर्णय घेताना माणसाला आधार हवा असतो, म्हणून देवाला कौल लावला जातो. कोकणात अजूनही काही ठिकाणी लग्न ठरवताना असा कौल लावतात आणि देवाने होकारार्थी कौल दिला तरच ते लग्न ठरते. एखादी कृती करू की नको या द्वंद्वात मन असते, त्या वेळी उलटसुलट विचार येत असतात. आपण सारे अर्जुन असतो, गोंधळून जातो. दुसऱ्या कुणी तरी सांगावे असे वाटत असते. असे असले तरी, वेळोवेळी जबाबदारीने निर्णय घेणे आणि परिणामांची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असते. अन्यथा माणसाचे मन दुबळे होत जाते. सतत आधार शोधत राहते. तो मिळाला नाही तर व्यसनात गुरफटते.

यावरील उपाय फ्रॉम यांनी ‘द आर्ट ऑफ लव्हिंग’ या त्यानंतरच्या पुस्तकात सुचवला आहे. प्रेम ही केवळ भावना नसून ती कृतीदेखील आहे. त्यामध्ये आदर, काळजी घेणे, जबाबदारी स्वीकारणे आणि ज्ञान हे घटक असतात. असे प्रेम प्रथम स्वत:च्या शरीरमनावर करायला हवे, असे फ्रॉम सुचवतात. शरीरमनाच्या कार्याविषयी माहिती घेणे, काळजी घेऊन योग्य तो आहार-विहार-विचार निवडणे, स्वत:च्या स्वास्थ्याची जबाबदारी डॉक्टरांवर न ढकलता स्वत: घेणे आणि शरीरमन जसे आहे तसा त्याचा स्वीकार करणे.. या गोष्टींचा ‘प्रेम करणे’ यामध्ये समावेश होतो. सत्त्वावजय चिकित्सेत असेच स्वत:वर प्रेम करण्याचे करुणा ध्यान शिकवले जाते. त्याची माहिती पुढील लेखांकात घेऊ या.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com