अनेकांचा गरसमज असतो की, समुपदेशन म्हणजे फक्त ऐकून घ्यायचे. सजगतेने ऐकणे हा समुपदेशनातील महत्त्वाचा भाग असला, तरी तेवढेच पुरेसे नसते. मन मोकळे केले की माणसाला बरे वाटते, हे खरे आहे. समुपदेशनाचा एक उद्देश मात्र ‘दुसऱ्या व्यक्तीकडे मन मोकळे करण्याची गरजच निर्माण होऊ नये असे कौशल्य शिकवणे’ हे आहे. मन मोकळे केल्याने बरे वाटणे हे पित्त झाल्यानंतर उलटी करून पित्त काढून टाकण्यासारखे समजू.. असे वारंवार पित्त काढावे लागत असेल तर ते योग्य नाही; पित्त वाढते त्याची कारणे दूर करणे, त्यासाठी औषधे घेणे आवश्यक असते. तसेच मनात सतत अस्वस्थता निर्माण होत असेल आणि ती व्यक्त केली नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीर/मनावर जाणवू लागत असतील, तर या अस्वस्थतेची कारणे दूर करायला हवीत. त्यासाठी आपण बदलवू शकतो असे कोणते घटक आहेत आणि आपले नियंत्रण नसलेले कोणते घटक आहेत, याचा विचार करायला हवा. असा विचार करण्याचे कौशल्य विकसित करणे हे समुपदेशनाचे एक उद्दिष्ट असते. त्यासाठी ‘विचार येणे’ आणि ‘विचार करणे’ यांमधील फरक समजून घ्यावा लागतो. मनात विचार सतत येत असतात. या विचारांच्या समुद्रात कसे तरंगत राहायचे, हे कौशल्य आहे. मनात येणाऱ्या विचारांच्या प्रवाहात वाहून न जाता, त्यांना तटस्थपणे जाणता येणे हे माणसाचे वैशिष्टय़ आहे. विचारांचा विचार करणे सर्व प्रकारच्या मानसोपचारांत महत्त्वाचे असते. याला मानसशास्त्रात ‘मेटाकॉग्निशन’ म्हणतात. समुपदेशन प्रक्रियेमध्ये हे कौशल्य विकसित केले जाते. समुपदेशन हा विशेष प्रकारचा संवाद असतो. त्याला योग्य दिशा देणे हे समुपदेशकाचे कौशल्य असते. तो संवाद भरकटू लागला, की समुपदेशकाने प्रश्न विचारून संवाद उपयुक्त होईल याची दक्षता घ्यायची असते. हे प्रश्न समोरील व्यक्तीच्या मनातील भावना, विचार आणि वर्तन समजून घेण्यासाठी असावेत. माणूस जे काही करीत असतो ते का करतो, त्यामागे कोणत्या प्रेरणा आहेत, हे लक्षात घेणे हा समुपदेशनातील महत्त्वाचा भाग असतो. मानवकेंद्रित मानसशास्त्रात प्रेरणांचा खूप विचार झाला आहे. या विषयात अब्राहम मास्लो आणि व्हिक्टर फ्रांकल् यांनी १९५० च्या दशकात मांडलेले सिद्धांत आजदेखील व्यवस्थापन क्षेत्रात वापरले जातात. ते पुढील लेखात समजून घेऊ या.
– डॉ. यश वेलणकर
yashwel@gmail.com