सुनीत पोतनीस

पोर्तुगीजांनी अंगोलातल्या आपल्या वाढत्या व्यापाराचा आवाका पाहून १५७५ साली शेसव्वाशे पोर्तुगीज कुटुंबे व त्यांच्या रक्षणार्थ ४०० सैनिकांची तुकडी अंगोलात स्थायिक होण्यासाठी आणली. या छोटय़ा पोर्तुगीज वस्तीला त्यांनी ‘साओ पावलो डि लुआंडा’ हे नाव दिले. या वस्तीचे पुढे शहरात रूपांतर होऊन, सध्याचे लुआंडा हे अंगोलाच्या राजधानीचे शहर बनले आहे. सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत पोर्तुगीजांनी अंगोलाच्या किनारपट्टीवर मोक्याच्या अनेक ठिकाणी त्यांची व्यापारी ठाणी, किल्ले आणि लहान लहान वस्त्या वसवल्या.

या काळात इतर युरोपीय व्यापारी कंपन्याही अंगोलाचा व्यापारी लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होत्याच. १६४१ साली- नेदरलँड्स साम्राज्याची व्यापारी कंपनी असलेल्या- डच वेस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी अंगोलाच्या आदिवासी टोळ्यांच्या मदतीने पोर्तुगीजांच्या लुआंडा वसाहतीवर हल्ला करून तिच्यावर कब्जा केला. परंतु पुढे लवकरच पोर्तुगाल साम्राज्याच्या नौदलाचा डच सैनिकांशी सामना झाला. या युद्धात पराभूत डचांकडून पोर्तुगीजांनी आपला गेलेला प्रदेश आणि व्यापारी ठाणी परत मिळवली.

पोर्तुगीजांनी या प्रदेशात व्यापारी बस्तान बसवल्यावर आपला रोमन कॅथलिक ख्रिस्ती धर्म रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रभावाने तिथल्या तत्कालीन आदिवासी राजाने स्वत: ख्रिस्ती धर्म स्वीकारून बहुतांश पश्चिम आफ्रिकेत या धर्माचा प्रसार केला.

पोर्तुगीजांच्या अंगोलातल्या वाढत्या गुलाम व्यापाराबरोबरच तिथल्या गुलामांच्या दलालीचा व्यवसायही वाढत गेला. हे दलालही मूळचे आफ्रिकीच होते. अंगोला आणि आसपासच्या आफ्रिकी प्रदेशांमधून धडधाकट मुलांना आणून गुलाम म्हणून पोर्तुगीज व्यापाऱ्यांना विकण्याचा या दलालांचा व्यवसाय मोठा किफायतशीर चालला होता. हे गुलाम प्रथम पोर्तुगालमध्ये नेऊन पुढे इतर युरोपीय देश आणि अमेरिकेत विकले जात किंवा ब्राझीलच्या पोर्तुगीज वसाहतीत नेले जात. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात अंगोलातील गुलाम-विक्रीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावला होता. एकटय़ा ब्राझीलमध्ये १५८० ते १६८० या शतकभरात अंगोलातून दहा लाखांहून अधिक गुलामांची निर्यात झाली! पुढे १८३६ साली पोर्तुगाल साम्राज्याने त्यांच्या सर्व वसाहतींतील गुलाम-विक्री कायद्याने बंद केली.

sunitpotnis94@gmail.com