डॉ. श्रुती पानसे

आपल्याला एकमेकांशी गप्पा मारायला आवडतं. मात्र इतरांशी जाणीवपूर्वक आणि योग्य पद्धतीने संवाद साधता येणं ही एक बुद्धिमत्ता आहे. डॉ. गार्डनर यांनी अशा लोकांमध्ये ‘आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता’ असते असं सांगितलं आहे.

इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद साधण्याच्या क्षमता ज्या ज्या लोकांमध्ये असते, त्यांच्यात ही बुद्धिमत्ता असते. इतर माणसांच्या सान्निध्यात असणं त्यांना आवडतं. कोणाला एखादी समस्या भेडसावत असेल तर ते लोकपण यांच्यापाशी मन मोकळं करतात. अडचणी सांगतात. त्यांची बाजू पूर्णपणे ऐकून घेऊन, सर्व बाजू विचारात घेऊन सल्ला देणं, इतरांना मदत करणं हे या व्यक्ती करतात.

लहानपणापासून इतरांशी संवाद साधतच आपण आपली कामं करतो. मात्र मोठं झाल्यावर, नोकरी-व्यवसाय करायला लागल्यावर व्यवहारात ही बुद्धिमत्ता जास्त नेमकेपणाने आणि सतत वापरावी लागते. ज्यांच्यात ही बुद्धिमत्ता असते अशा व्यक्ती कायम लोकांच्या घोळक्यात असतात. इतरांशी चांगले संबंध ठेवतात.

त्याचबरोबर वेळप्रसंगी इतरांची मदत घ्यायला कायम तयार असणं. टीम तयार करून, सर्वानी मिळून वेगवेगळे उपक्रम करायला तयार असणं ही एक वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. असे उपक्रम सुचून त्यासाठी पुढाकार घेणं, योजना अमलात आणणं हे यांना चांगलं जमतं. वेगवेगळ्या वयोगटाच्या, विचारधारेच्या माणसांसोबत काम करणं यात यांना आव्हान वाटतं. हे आव्हान ते चांगल्या प्रकारे पार पडतात.

लहान मुलांमध्येही ही बुद्धिमत्ता दिसून येते. अशा मुलां-मुलींकडे एखाद्या गटाची किंवा वर्गाची लीडरशिप येते. तेव्हा पालकांनी हे गुण विशेषत्वाने लक्षात घ्यावेत. अशी मुलं मोठी झाल्यावर  नेते होतात; ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात; शिक्षक-प्राध्यापक असतात; समुपदेशन, सल्लागाराचं काम करतात. पुढारी, कंपनीतले मॅनेजर्स वा सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ही बुद्धिमत्ता निश्चितपणे असावी लागते. या प्रकाराची बुद्धिमत्ता प्रत्येकात असते आणि ती वापरावीही लागते. ही बुद्धिमत्ता एखाद्या कलाकारात, शास्त्रज्ञात, खेळाडूतही असते. परंतु आपापल्या क्षेत्रात काम करून काही माणसं हौशी कार्यकत्रे असतात असं आपण म्हणतो, ती अशा बुद्धिमत्तेची असतात. जी माणसं बोलायला, आपले विचार व्यक्त करायला आणि गोतावळ्यात असतात ती या बुद्धिमत्तेची असतात.

contact@shrutipanse.com