डॉ. श्रुती पानसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठय़ा कुटुंबाकडून लहान कुटुंब आणि तिथपासून एकटय़ा माणसाचं कुटुंब इथपर्यंत आपली वाटचाल झाली आहे. एकटेपणा म्हणजे काही तरी वेगळं किंवा चुकीचं असं समजायचे दिवस कधीच गेले. दिवसभर काम, लेखन, छंद, फिरणं यात गुंतलेल्यांना एकटेपण जाणवत नाही. एकटेपणातही अशीच माणसं मजेने राहू शकतात, ज्यांच्या मनात एकाकी भाव नसतो.

वास्तविक मोठय़ा कुटुंबात राहणाऱ्या माणसांच्या मनातही एकाकी भाव असू शकतो. एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा माणसांच्या गर्दीत असलं, तरी आपल्याला एकटं वाटू शकतं. आसपास खूप जण आहेत; पण कोणालाच मोकळा वेळ नाही, कोणीच कोणाशी बोलत नाही, अशी परिस्थिती असते. आपण एकटं राहत असू किंवा माणसांत; एकाकी वाटण्याचं प्रमाण वाढलं आहे, वाढतं आहे.

आपल्या मनातलं सगळं ज्यांच्याशी बोलता येईल, अशी माणसं प्रत्येकाला हवी असतात. अशी माणसं दुर्मीळ का झाली आहेत? या एकाकी भावनेमुळे बऱ्याच समस्या निर्माण होऊ  शकतात. एकटेपणाच्या या भावनेला गांभीर्यानं घ्यायची गरज आहे, कारण यातून अनेक मानसिक-शारीरिक आजार होऊ  शकतात. झोप कमी होते. माणूस विविध व्यसनांच्या आहारी जाऊ  शकतो. स्वत:ला त्रास करून घ्यायची वृत्ती निर्माण होते. नैराश्य उद्भवू शकतं.

एकाकी भावनेचा कुटुंबाशी संबंध दर वेळी लावता येतोच असं नाही; पण दूरदूर असलेले ठिपके जोडण्याचं काम अनेक जण करतात आणि जोडलं जाणं आनंददायी करतात. पूर्वी आपल्याकडे कुटुंबाचा एक ठरावीक साचा असायचा. पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगी तिच्या सासरी राहायची. ठरावीक नाती एकत्र राहायची; पण आता नात्यांमधली किंवा नाती नसलेली माणसंही एकत्र राहतात. उदाहरणार्थ, मित्र किंवा मैत्रिणी एकमेकांची सोय बघत एकत्र राहतात; ते त्यांचं कुटुंब असतं. लग्न झालेल्या मुलीचे आई-बाबा तिच्या कुटुंबासह अतिशय आनंदात एकत्र एका घरात राहतात आणि एक मोठं कुटुंब तयार होतं. सासर-माहेर एकत्र होतं. वेगवेगळ्या घरांत राहणाऱ्या आजी-आजोबांचा समूह एकत्र येतो. एकमेकांना सांभाळत एक छानसं घर बनतं. समाजशील माणसांनी कुटुंबव्यवस्थांना ही नवी आणि चांगली वळणं लावली आहेत, असंच म्हणावं लागेल!

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on new family equations abn
First published on: 28-10-2019 at 00:09 IST