scorecardresearch

मनोवेध : पंचकोश

 ‘मी’चा भाव पाच पातळींवर असतो, असे तैत्तिरीय उपनिषदात सांगितले आहे. तेथे ‘पंचकोशां’चा पहिला उल्लेख आहे.

(संग्रहित छायाचित्र)

– डॉ. यश वेलणकर

‘मी’चा भाव पाच पातळींवर असतो, असे तैत्तिरीय उपनिषदात सांगितले आहे. तेथे ‘पंचकोशां’चा पहिला उल्लेख आहे. ‘स्व’कडे साक्षीभाव ठेवून पाहात राहिल्याने तैत्तिरीय ऋषींना आलेला तो अनुभव आहे. साक्षीभावाची साधना करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हा अनुभव येऊ शकतो. ‘अन्नमय कोश’ म्हणजे डोळ्यांना दिसणारे शरीर- ‘हे शरीर म्हणजेच मी’, असे वाटत असल्याने मी उंच, कुरूप, सावळा असे माणूस स्वत:चे वर्णन करतो. खरे म्हणजे हे वर्णन अन्नमय कोशाचे असते. पण माणूस त्याच्याशी एकरूप झालेला असल्याने शरीरातील वेदना त्याला दु:खी करतात. या कोशाकडे साक्षीभाव ठेवून पाहायचे म्हणजे शरीराची स्थिती कशी आहे याकडे लक्ष द्यायचे. दुसरा ‘प्राणमय कोश’; शरीरात प्राण असतो तोपर्यंत श्वास चालू असतो. त्या श्वासाकडेही तटस्थपणे पाहायचे. प्राणशक्तीमुळेच शरीरात काय होत आहे ते समजते, त्याचा साक्षीभाव ठेवून स्वीकार करायचा. ‘मनोमय कोश’ हा तिसरा कोश, त्याच्याशीही माणूस एकात्म झालेला असतो. मनात येणाऱ्या विचारांच्या प्रवाहात वाहत असतो. मन उदास झाले की ‘मी उदास आहे’ असे म्हणतो. या कोशाकडे त्यापासून अलग होऊन पाहायचे, म्हणजे मनात येणाऱ्या विचार आणि भावना यांनादेखील प्रतिक्रिया करायची नाही. ‘आत्ता मन उदास आहे’ अशी नोंद करायची. यानंतरचा कोश अधिक सूक्ष्म असतो; त्याला ‘विज्ञानमय कोश’ म्हणतात. मनोमय कोशात जे काही येते त्याचे मूळ विज्ञानमय कोशात असते. स्वत:ची मानसिक प्रतिमा म्हणजे ‘मी लेखक, मी मराठी’ असे बरेच काही ‘मी’शी जोडलेले असते. यातील काही ‘मी’ गर्व वाढवणारे, तर काही ‘मी’ दुखरे, लाज वाटते असे असतात. काही ‘मी’ भविष्यातीलदेखील असतात. म्हणजे ‘मी हे झाले पाहिजे’ अशी इच्छा असते.

या सर्व ‘मीं’पासून अलग होणे कठीण असले तरी सरावाने शक्य होते. शरीर, संवेदना, विचार आणि ‘मी’ची प्रतिमा या चारही कोशांकडे काही वेळ साक्षीभावाने पाहणे शक्य होते तेव्हा पाचव्या- ‘आनंदमय कोशा’चा अनुभव येतो. पण तोदेखील सतत राहात नाही. आनंदाची काही किरणे अनुभवायला मिळतात, पण ही स्थिती बदलली की पुन्हा दु:ख येते. या पाचही कोशांशी तादात्म्यता दु:ख निर्माण करते. या पाचही कोशांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे सर्व प्रकारच्या दु:खमुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते शक्य आहे.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on quintessence abn

ताज्या बातम्या