श्रुती पानसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुद्धी म्हणजे नक्की काय? एखाद्याला बुद्धी आहे, हे कशामुळे सिद्ध होतं? ९०-९५ टक्क्यांच्या वर गुण असले तरच ते मूल बुद्धिमान? तसं असेल तरच या स्पर्धेच्या जगात टिकाव लागेल? सायन्स – इंजिनीअिरग  – मेडिकलला गेली तरच मुलं बुद्धिमान म्हणून गणली जातात. कारण चांगलं भविष्य घडवायचं असेल तर ते फक्त तिथेच आहे. अन्य क्षेत्र म्हणजे कुचकामाची आणि डाऊन मार्केट. इथे फक्त करिअरची दिशाच चुकत नाही तर बुद्धीची व्याख्या चुकीची समजली जाते. परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर  बुद्धी अवलंबून नसते. दहावीनंतर मुलांनी सायन्सला ‘नाही’ म्हटलं तर लगेच त्याच्या बुद्धीवर शंका घ्यायचं कारण नसतं. पण आपल्याकडे हे घडतं आहे.

वास्तविक बुद्धीला अनेक आयाम आहेत. ती ठरावीक शालेय विषयांच्या मर्यादेत, फक्त पुस्तकांमध्ये, प्रश्नोतरांमध्ये असते का? नक्कीच नाही! खरं तर बुद्धी सतत-सर्वत्र वापरावी लागते.  पण आजकाल या बुद्धिमत्तेला-मेंदूतल्या अमाप क्षमतांना परीक्षेभोवती केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. परीक्षा ही आजच्या काळात महत्त्वाची असते, असं मान्य केलं तरी ते एका मर्यादित अर्थानेच खरं आहे. शाळांनी, बोर्डानी घेतलेल्या परीक्षेत पास होणं एवढय़ाच संकुचित अर्थाने बुद्धिमत्तेकडे बघणं आणि मुलांकडून तेवढय़ाच अपेक्षा करणं म्हणजे मेंदूच्या क्षमतेला कमी लेखणं आहे. पालकांच्या अतिअपेक्षांमुळे मुलांचं बालपण हरवतं. प्रत्येकाला वाटतं, आपलं मूल हुशार व्हायला हवं. मुलं शाळेत असेपर्यंत अतिशय अपेक्षा केल्या जातात. कारण मूल पालकांचं निमूटपणे ऐकतं. बुद्धिबळ, क्रिकेटसारखा एखादा खेळ, चित्रकला, नृत्य, गाणं, वाद्यवादन, समर कॅम्प, सायन्स कॅम्प यातल्या जमतील तितक्या क्लासमध्ये मुलांना घातलं जातं. या सगळ्या गोंधळात एखादं मूल हरवून जात नसेल का? आपली बुद्धी नेमकी कोणत्या दिशेने धावते, याचा शोध स्वत:ला लागायला त्यांना पुरेसा वेळ आहे का? या सगळ्या क्लासेसचा ताण येतो आहे, हे मुलं सांगू शकत नाहीत. ते फक्त करत राहतात. जे आवडतं त्याचा ताण येत नाही. जे आवडत नाही तरीही करायला लागतं, त्याचा ताण येतो, समीकरण असं आहे. एखाद्या गायकाला हट्टाने वाद्य वाजवायला सांगितलं आणि गायनापासून वंचित ठेवलं तरी ताण येतो. कारण आवडी आणि नावडी या मेंदूत जन्मजात असलेल्या न्युरॉन्सशी संबंधित आहेत.

बुद्धीचा खरा अर्थ समजला तर त्यांच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, याकडे नीट लक्ष पुरवता येतं. त्यांच्यातल्या नैसर्गिक बुद्धिमत्ता ओळखून खतपाणी घालणं आवश्यक.

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on some problems in the brain
First published on: 03-04-2019 at 00:13 IST