सुनीत पोतनीस
कोरियाची फाळणी होऊन एका स्वतंत्र, स्वायत्त राष्ट्राचा.. दक्षिण कोरियाचा उदय झाला. १५ ऑगस्ट १९४८ हा दक्षिण कोरियाचा स्वातंत्र्य दिन. १९४८ साली दक्षिण कोरियात अमेरिकेच्या पाठिंब्यावरचे भांडवलशाही पद्धतीचे कोरियन प्रजासत्ताक म्हणजे ‘रिपब्लिक ऑफ कोरिया’ सरकारची स्थापना झाली. कोरियन प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष म्हणून कम्युनिस्टविरोधी विचारांचे स्यींग्मन ऱ्ही यांची नियुक्ती झाली. दक्षिण कोरियाच्या लष्कर प्रमुखपदीही तेच विराजमान झाले.
१९६० पर्यंत, म्हणजे १२ वर्षांच्या कारकीर्दीत स्यींग्मन ऱ्ही यांचे प्रशासन काहीसे हुकूमशाहीकडे झुकलेले असूनही, अमेरिकी गोटातील अन्य देशांप्रमाणे पहिल्या तीन-चार वर्षांतच या नवजात देशाची अभूतपूर्व आर्थिक उन्नती झाली. स्यींग्मन ऱ्ही यांनी औद्योगिक क्षेत्रात केलेले आधुनिकीकरण व नियोजन यामुळे १९५० सालापर्यंत अर्थव्यवस्थेत मागास राष्ट्रांत मोडणारा हा चिमुकला दक्षिण कोरिया जगातल्या प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसला! स्यींग्मन यांच्यानंतर अध्यक्षपदी आलेल्यांनीही दक्षिण कोरियाची ही औद्योगिक, आर्थिक घोडदौड कायम राखून राष्ट्रीय विकासदर प्रतिवर्षी सहा टक्क्यांच्या आसपास ठेवला. आशियातल्या चौथ्या, तर जगातील १२ व्या क्रमांकाचा श्रीमंत देश असलेल्या द. कोरियाची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून असून ती मोटार वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रसामग्री यांच्या उत्पादनांमुळे आघाडीवर राहिली. सॅमसंग, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, हुंडाई मोटर्स, किया मोटर्स, जीएस कॅलटेक्स या दक्षिण कोरियाच्या उद्योग कंपन्यांनी देशाची अर्थव्यवस्था प्रगत करण्यात हातभार लावला आहे. जगातल्या अणुशक्ती उत्पादकांमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेला दक्षिण कोरिया संयुक्त राष्टे तसेच जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य आहे.
या चिमुकल्या देशाची लोकसंख्या आहे सुमारे पाच कोटी. या पाच कोटी लोकसंख्येपैकी राजधानी सेऊलमध्ये निम्मे, म्हणजे अडीच कोटी लोक राहतात! दक्षिण कोरियाच्या एकसदनीय संसदेचे २९९ सदस्य असून सध्याचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष मून जे-इन हे ‘डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ कोरिया’ या पक्षाचे असून २०१७ पासून राष्ट्राध्यक्षपदी कार्यरत आहेत.
sunitpotnis94@gmail.com
