डॉ. यश वेलणकर
सतत खूप महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात अशा उच्चपदस्थ व्यक्तींना मानसिक तणावाचा त्रास अधिक असतो.याचे कारण जे निर्णय घ्यायचे आहेत असे डोक्यात असते,तेवढय़ा फाइल मेंदूत काम करीत राहतात. स्मार्टफोनमधील ओपन फाइल्स वाढल्या की तो हँग होतो.असेच माणसाच्या मेंदूचेही होते. स्मार्टफोनचा शोध लागण्यापूर्वीच मेंदूतील अनेक ओपन फाइल्स त्रासदायक ठरतात हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले होते. १९८०मध्ये जॉन स्वेलर यांनी ‘कॉग्निटिव्ह लोड थिअरी’ या नावाने हा सिध्दांत मांडला. त्यानुसार एकावेळी मेंदू विचार करण्याचे किती काम करू शकतो याला मर्यादा आहेत. हा लोड वाढत गेला तर त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. ते टाळायचे तर, मेंदूतील निर्णय घेण्याच्या फाइल्स वाढवता नयेत. जे निर्णय काही काळाने घ्यायचे असतील, आणखी माहिती मिळवायची असेल तर आत्ता या विषयाचा निर्णय घ्यायचा नाही असा तरी निर्णय घ्यायला हवा. स्पेशालिस्ट डॉक्टर एका दिवशी अनेक रुग्ण तपासून त्यांना औषधे सुचवतात, त्या प्रत्येक वेळी ते निर्णय घेत असतात. पण तो निर्णय घेऊन झाला की त्याची नोंद केसपेपर मध्ये होते आणि मेंदूतील ती फाइल बंद होते. माणूस एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत मेंदूत ती फाइल काम करीत राहते.. त्याचमुळे त्यावर अचानक वेगळे उत्तर सुचू शकते आणि आर्किमिडीजला आला तसा युरेका असा अनुभव येतो. मात्र आर्किमिडीजला वा अनेक शास्त्रज्ञांना आंघोळ करताना/ चालताना/ झोपेत/ स्वप्नात अशी उत्तरे सुचतात याचे एक कारण त्यांच्या मेंदूत त्या ठराविक फाइल्सच ओपन राहिलेल्या असतात. कॉग्निटिव्ह लोड ही संकल्पना मांडली जाण्यापूर्वीच त्यांनी अनुभवाने हे जाणले होते. आता ही संकल्पना समजल्याने बरेच नेते छोटे निर्णय घेण्यासाठी मेंदूची शक्ती वाया घालवीत नाहीत. त्यांचे सूट एकाच रंगाचे असतात, ते स्वत: ड्रायव्हिंग करीत नाहीत, पर्सनल असिस्टंट ठेवतात. सामान्य माणसाच्या मेंदूवर देखील असा लोड असतोच. या या गोष्टी करायच्या आहेत हे तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेवढा हा लोड वाढतो. त्याचसाठी अशा गोष्टींची यादी लिहून ठेवणे, ज्या गोष्टी लगेच करणे शक्य आहे त्या करून टाकणे असे उपाय करता येतात.त्याच्या जोडीला सजगतेच्या नियमित सरावाने मेंदूतील अनावश्यक फाइल्स बंद करण्याचे कौशल्य विकसित करता येते.
yashwel@gmail.com