भारतामध्ये प्राचीन काळापासून वन्यजीवांच्या संरक्षणाला महत्त्व दिले गेले आहे. मौर्य साम्राज्यात नैसर्गिक संसाधनांना संरक्षण देऊन त्यांचा वापर आणि हाताळणी यांवर कडक निर्बंध लादले होते आणि त्यासाठी खास सक्षम अधिकाऱ्यांची निवड केली जात असे. याच परंपरेतील सम्राट अशोकाच्या काळापासून (इ.स.पू. तिसरे शतक) वन्यजीव रक्षणाची जाणीव होती. यासंदर्भात अतिशय स्पष्टपणे विविध प्रकारचे चतुष्पाद प्राणी, वटवाघळे, माकड, गेंडे, साळिंदर, खारोटय़ा, विविध प्रकारचे पक्षी, आदींची हत्या करू नये, या प्राण्यांचे अधिवास असलेली झाडेझुडपे तोडू नयेत, जंगलात वणवे लावू नयेत, असे अनेक कडक नियम केले होते. हे सर्व नियम सम्राट अशोकाच्या प्रसिद्ध ३० दगडी स्तंभांपैकी पाचव्या स्तंभावर कोरलेले आढळतात. यानंतर अनेक राजे-महाराजांनी आपापल्या परीने वन्यजीवांची काळजी घेण्यासंदर्भात कायदे केल्याची उदाहरणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील यासंदर्भात कठोर शिक्षेची तरतूद केल्याचा इतिहास तर तुलनेने अलीकडचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकंदरीत मानव आणि वन्यजीव शतकानुशतके पृथ्वीतलावर गुण्यागोविंदाने नांदत होते. परंतु गेल्या दोन-तीन शतकांत माणसाने वन्यजीवांची प्रमाणाबाहेर हत्या केली. अन्नासाठी आणि अगदी त्यांचे नैसर्गिक अधिवास बळकावण्यासाठी माणूस त्यांच्याशी स्पर्धा करू लागला. अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून अवैध मार्गानी शिकारी करणे, तस्करी करणे, त्याचप्रमाणे हवा, पाणी व जमीन या नैसर्गिक घटकांचे कमालीचे प्रदूषण हेदेखील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वन्यजीवांच्या नाशास कारणीभूत ठरत आहे. शिवाय महापूर, दीर्घकाळ आगीत धुमसत राहणारी वने, चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना दरवर्षी लाखो वन्यजीव बळी पडत आहेत. अशा रीतीने एकंदरीतच वन्यजीवांना जीवनसंघर्षांत टिकून राहणे अवघड होत आहे. कारण त्यांच्यापुढील या अडचणींवर त्यांना मात करता येणे शक्य नाही. परिणामी पुष्कळ जीवजाती नष्ट किंवा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हजारो प्रजाती कायमच्या लुप्त झाल्या आहेत.

त्यामुळे वन्यजीव व्यवस्थापनशास्त्राकडे अलीकडच्या काळात गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. आदर्श वन्यजीव व्यवस्थापन हे केवळ शास्त्र नसून ती एक कलादेखील आहे. या दोन्हींमध्ये समन्वय असणे हे महत्त्वाचे आहे. यामध्ये केवळ वन्यपशूंचाच विचार न करता, त्या परिसंस्थेतील जमीन, वनस्पती, झाडेझुडपे या व अशा सजीव घटकांचादेखील विचार करावा लागतो.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on wildlife management abn
First published on: 09-10-2020 at 00:06 IST