डॉ. श्रुती पानसे

माणूस आपल्याला हवं असलेलं ज्ञान स्वत: मिळवतो. हे लहानपणापासूनच चालू असतं. ज्ञानरचनावादाचा सिद्धांत हेच सांगतो की, पूर्वज्ञानावर आधारित नव्या माहितीची रचना आपला मेंदू करत असतो. याच पद्धतीने आपण कोणतीही गोष्ट, कोणतीही कला शिकत असतो. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाला सहजपणे काही माहिती मिळालेली असते. हे असतं आपलं पूर्वज्ञान. या पूर्वज्ञानाच्या आधारावर नवे अनुभव रचून – त्यासाठी नवे कष्ट घेऊन पुढचं शिक्षण घडणार असतं. ही प्रक्रिया प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याच्या बाबतीत आतापर्यंत घडलेली असते –  पुढच्या प्रत्येक वेळेस घडणार असते. कारण स्वत:ला बदलत नेत शिकणं हे जन्मापासून सुरू असतं ते सुरू राहणार असतं. शिकण्याला पूर्णविराम असा कधी नसतोच.

विनोबा म्हणतात, आपलं पूर्ण शिक्षण हे पूर्णाकडून पूर्णाकडे असंच असतं. एका पूर्ण अवस्थेकडून दुसऱ्या पूर्ण अवस्थेकडे. कोणत्याही वयाचं मूल ही देखील एक पूर्ण व्यक्ती असते. पूर्ण व्यक्तिमत्त्व असतं. ‘मूल’ या शब्दाची जी व्याख्या कॉन्रेल विद्यापीठाने केलेली आहे त्यानुसार लहान मूल म्हणजे उपव्यक्ती किंवा सब-पर्सन नव्हे. सहा महिन्याचं मूल असलं तरी ते सहा महिन्याचं पूर्ण व्यक्तिमत्त्व असतं. वीस, चाळीस किंवा नव्वद वर्षांची व्यक्ती ही देखील पूर्ण व्यक्ती आहे. एक विशिष्ट वय आलं की तिथे माणूस पूर्ण झाला, असं कोणत्याही वयात म्हणता येत नाही. दर दिवशी माणसाच्या पेशी बदलत जातात. त्याचं वय वाढत जातं. त्यानुसार त्याच्यात शारीरिक बदल होत राहतात, ते अगदी त्याच्या अंतापर्यंत. त्यामुळेच माणसाला कधीही पूर्णत्व येत नाही. प्रौढ वयात माणसाची- स्त्री किंवा पुरुषाची पूर्ण वाढ झाली असं आपण म्हणतो. मात्र तेव्हाही ती वाढ पूर्ण नसते. त्यानंतरसुद्धा अनेक बदल त्याच्या शरीररचनेत होत राहतात. विशीत असलेली व्यक्ती चाळिशीत वेगळी दिसते आणि ऐंशीव्या वर्षी केवढी बदललेली दिसते. यातले काही बदल दृश्य असतील तर काही अदृश्य. पण बदल होणं थांबत नाही. म्हणूनच त्याची प्रत्येक अवस्था ही पूर्णावस्था असते, हे मानलं पाहिजे.

contact@shrutipanse.com