बंगाली साडी हा साडय़ांमधील एक लोकप्रिय प्रकार आहे आणि त्याला एक समृद्ध असा इतिहास आहे. बंगाली साडी म्हटली की, त्यामध्ये बालुचारी साडी आणि टान्ट साडी या दोन साडय़ांचा जास्त बोलबाला आहे. बालुचारी साडी हे नाव बंगालमधील बालुचारी या गावावरून पडले. तसेच अठराव्या शतकात बंगालच्या तत्कालीन नवाबाने ही कला ढाक्याहून इथे आणली.
बालुचारी साडय़ा समृद्ध भारतीय संस्कृतीच्या प्रतीक आहेत. भारतातच नव्हे तर जगभरात त्या प्रसिद्ध आहेत. बालुचारी साडय़ांनी पौराणिक कथांमधून प्रेरणा घेतली आहे. इतकेच नाही तर या साडीच्या पदरावर पौराणिक प्रसंग चितारलेले असतात. बालुचारी साडय़ा मुख्यत: मुíशदाबादमध्ये विणल्या जातात. ह्य़ा साडय़ा बालुचारी रेशमापासून किंवा सुतापासून तयार केल्या जातात. यांचे रंग आणि डिझाइन आकर्षक असते.
काळानुरूप या साडय़ांच्या उत्पादन पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. जर तुम्ही बालुचारी साडीच्या उत्पादन प्रक्रियेकडे बारकाईने बघितलेत तर तुमच्या असे लक्षात येईल की, जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही पद्धतीचा वापर या उत्पादन प्रक्रियेमध्ये केला जात आहे. बालुचारी साडी उत्पादनात आधी वापरलेले धागे पुन्हा वापरतात. तसेच सेंद्रिय रंगांचा वापर केला जातो. या साडय़ांनी पारंपरिक मूल्ये जपत आधुनिकताही आत्मसात केली आहे.
बालुचारी साडीला समाजात एक उच्च स्थान प्राप्त झालेले आहे. एक साडी विणण्याकरिता पूर्ण आठवडा लागतो. पण अशी तयार झालेली साडी रुबाबदार आणि मोहक दिसते. यासाठी मात्र उत्पादनाच्या सर्व स्तरांवर काळजी घेतली जाते. बालुचारी साडय़ा बहुतांश रेशमाने विणलेल्या असतात. त्यामुळे त्या वर्षभर वापरता येतात. परंतु त्यांची धुलाई काळजीपूर्वकच करावी लागते, जशी इतर रेशमी साडय़ांची धुलाई केली जाते तशीच. बालुचारी साडी पाच मीटर लांब आणि एक मीटर रुंद (उंच) असते. भडक लाल आणि जांभळा हे रंग बालुचारीमध्ये आवडते रंग आहेत. या साडीला ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र’ मिळालेले आहे. त्यामुळे या साडीची ओळख टिकून आहे. विष्णुपूरमध्ये या साडी उत्पादनाचे पुनर्जीवन झाले. तिथे जकार्डचा वापर करून एका वेळी दोन कारागीर काम करतात.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थानांची बखर – औंधचा प्रजासत्ताक-प्रयोग
१९३८ साली औंध संस्थानात औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी, महात्मा गांधी आणि मॉरीस फ्राइडमन (गांधीभक्त पोलिश इंजिनिअर) या तिघांनी मिळून एक अभिनव प्रयोग केला. संस्थानाची सत्ता राजाकडून नागरिकांकडे देण्यात आली आणि १९३९ मध्ये औंधच्या स्वराज राज्यघटनेत तसा कायदा केला गेला. ब्रिटिश राजवटीने प्रत्येक संस्थानाशी वेगवेगळे करार करून, संस्थानिकांना अंतर्गत कारभाराविषयी काही प्रमाणात स्वायत्तता दिली होती. राज्याचा कारभार लोकप्रतिनिधींकडे सोपविण्याची कल्पना प्रथम फ्राइडमनने पंतप्रतिनिधींना सुचविली. भवानराव स्वत भारतीय स्वातंत्र्याचे पुरस्कत्रे होते. त्यांना ही कल्पना पसंत पडली. हा लोकशाहीवादी प्रयोग महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे दोघांनी ठरविले. वर्धा येथील आश्रमात महात्मा गांधींबरोबर फ्राइडमन व राजे यांच्यात अनेक बठका होऊन औंधसाठी नवीन राज्यघटना तयार केली गेली. या छोटय़ा संस्थानातील प्रयोगामुळे भारतीय स्वातंत्र्यवाद्यांना मोठे उत्तेजन मिळणार असल्याने गांधींनी याबाबतीत पुढाकार घेतला. नवीन राज्यघटनेची सर्व कागदपत्रे, दस्तऐवज तयार झाल्यावर गांधींनी ती २१ जानेवारी १९३९ रोजी स्टेट अ‍ॅसेंब्लीकडे मंजुरीसाठी पाठविली. पाच लोकप्रतिनिधींची समिती निवडण्यासाठी राज्यातल्या सर्व मतदारांचे गुप्त मतदान घेण्यात आले. या पाच निर्वाचित प्रतिनिधींच्या पंचायतीकडे राजांच्या सल्ल्याने कारभाराचे हस्तांतर करण्यात आले. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी प्रत्येक खेडय़ातून पाच निर्वाचित सदस्यांची पंचायत समिती व तिचा अध्यक्ष निवडला जाई. प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती अध्यक्षांमधून तालुका सल्लागार मंडळासाठी प्रतिनिधी निवडला जाई. राज्याच्या मध्यवर्ती कायदेमंडळात हे तालुका प्रतिनिधी राजाच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेत. १९३९ ते १९४६ या काळात औंधच्या या विधिमंडळाने २७ प्राथमिक शाळा आणि १४ माध्यमिक शाळा निर्माण केल्या.
औंधातील हा स्थानिक स्वराज्यसंस्थेचा प्रयोग, संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत यशस्वीपणे राबविला गेला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baluchari saree
First published on: 17-09-2015 at 05:48 IST