आपल्याला डिक्शनरी माहीत असते, पण शब्दकोश माहीत नसतात. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा झाला तर त्या त्या भाषेचे शब्दकोश असतात आणि तिथे वर्णानुक्रमे आपण शब्द शोधू शकतो. वर्णानुक्रमालाच कोणी ‘अकारविल्हे’ असेही म्हणतात. अनेकांना अल्फाबेटिकल ऑर्डर माहीत असते, पण ‘अकारविल्हे’ माहीत नसतात. गंमत म्हणून विचारून पाहा बरं, किती जणांना हा शब्द माहीत आहे आणि त्यांनी तो वापरलेला आहे. नसेल माहीत तर आज माहीत करून द्या. ‘अकार’ म्हणजे ‘अ’ हा वर्ण आणि ‘विल्हा’ किंवा ‘विल्हे’ हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ- वर्ग; भाग, प्रकार; खाते. संस्कृतमध्ये याला ‘आनुपूर्वी’ असे नाव आहे. अनु पूर्व ई = एकापुढे एक अशा क्रमाने मांडलेली किंवा रचलेली. मराठीत या शब्दाला अनेक प्रतिशब्द वापरले जातात, जसे की वर्णक्रम, वर्णक्रमी, वर्णानुक्रम, अक्षरानुक्रम, अक्षररचना, अकारानुक्रम, अकारविल्हे इत्यादी. आता यातील कोणता शब्द आपण निवडायचा हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ठरवता येईल. वर्णानुक्रम हा त्या त्या भाषांच्या रूढ वर्णमालेतील वर्णाच्या क्रमाला अनुसरून ठेवलेला असतो. मराठीने हिंदी, नेपाळी व संस्कृत भाषेप्रमाणे, ब्राह्मीतून उत्क्रांत झालेली देवनागरी लिपी अंगीकारली असल्यामुळे मराठी वर्णमालेचे संस्कृत वर्णमालेशीही साम्य बघता येते. संस्कृतातील काही वर्ण मराठीमध्ये नाहीत. उदा. दीर्घ ‘ऋ’, तसेच प्राकृतातून किंवा देशज भाषास्रोतातून आलेला मराठीतील ‘ळ’ हा वर्ण संस्कृतात नाही. आता वर्णमालेत इंग्रजी वा काही अन्य भाषांतील शब्दांच्या उच्चारांमध्ये आढळणारे ‘अॅ’ आणि ‘ऑ’ हे वर्ण समाविष्ट झाले आहेत. इंग्रजी भाषेच्या परिचयामुळे या भाषेतील अनेक शब्द मराठीत आले आणि आत्मसात झाले आहेत. बॅट, बॉल, कॉलेज, कॉफी हे उच्चार पूर्वी ‘या’ आणि ‘आ’ अक्षरांनी दाखवले जात. जसे की क्याटलाग, कालेज, ब्याट. आता हे उच्चार दाखवण्यासाठी आपण त्यात या अक्षरांवर अर्धचंद्र काढून दाखवतो. हे परकीय ध्वनी आता स्वरमालेत समाविष्ट झाले आहेत. भाषेला काळानुसार बदलावे लागतेच. इंग्रजी भाषेनेही कित्येक भारतीय शब्द आपलेसे केले आहेत. मात्र उठता-बसता आपण इंग्रजीचा वापर करतो तसा इंग्रजी भाषक इतर भाषेतील शब्दांचा करतात का, याचे उत्तर जाणकारच देऊ शकेल. (शीर्षक संदर्भ: अरुण कोलटकर यांची ‘तक्ता’ कविता)
– डॉ. निधी पटवर्धन
nidheepatwardhan@gmail.com