scorecardresearch

भाषासूत्र : भाषा प्रवाही असते

सन १२०० पासून मराठीचा ग्रंथित काळ विचारात घेतला तर या बदलांच्या टप्प्यांचे पाच कालखंड सांगतात- यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन.

भाषासूत्र : भाषा प्रवाही असते

वैशाली पेंडसे-कार्लेकर

भाषापरिवर्तन ही प्रत्येक भाषेच्या दृष्टीने एक अपरिहार्य प्रक्रिया आहे. सन १२०० पासून मराठीचा ग्रंथित काळ विचारात घेतला तर या बदलांच्या टप्प्यांचे पाच कालखंड सांगतात- यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन.

‘माझा मऱ्हाटाची बोलू कवतिके, परि अमृतातें हीं पैजेसीं जींके’ ही १२९० मधली ज्ञानेश्वरीतली मराठीचा महिमा सांगणारी ओवी यादवकाळातली. यादवकालीन किंवा ज्ञानेश्वरकालीन मराठीत आढळणारी डोलेया, देयावा, लोकाचेया, तेया, तेयातें अशी रूपं पुढे एकनाथांच्या काळात डोळय़ा, द्यावा, लोकांचिया, तया, तयाते अशी वापरली जाऊ लागली. याच काळात फारसीचा भाषा, व्याकरणाबरोबर मराठीतल्या उच्चारांवरही प्रभाव पडला. पुढेही फारसी, कधी संस्कृत आणि कधी इंग्रजी यांच्या प्रभावाने मराठीत नवीन शब्द येत राहिले. वर्ण, लिपी, विभक्तिप्रत्यय, विरामचिन्हं, सामान्यरूपं, वाक्यरचनेची पद्धत अशा व्याकरणिक घटकांमध्येही थोडेथोडे बदल होत गेले. बदलांच्या या चक्राचा सध्या सहावा कालखंड सुरू आहे, असं म्हणता येईल. एकूणच भाषेमध्ये बदल होणं हेच तिच्या जिवंतपणाचं आणि प्रगतीचं लक्षण आहे. त्यामुळेच मराठीसारख्या जिवंत भाषेत बदल घडत राहणार आहेतच. कदाचित आज ‘चुकीच्या’ मानल्या जाणाऱ्या वाक्यरचना किंवा शब्द काही काळाने ‘बरोबर’ मानले जातील. लिपीतले ‘श’ आणि ‘ल’ सारखे वाद विरून जातील. पण आज आणि भविष्यातही या सर्वाहून जास्त महत्त्वाचा प्रश्न हाच असेल की मराठी एक भाषा म्हणून सशक्त आणि प्रगल्भ असेल का? ती मराठी भाषकांच्या सर्व गरजा पूर्ण करणारं साधन ठरेल का?

ज्येष्ठ भाषावैज्ञानिक अशोक केळकर यांच्या मते, ‘‘इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा प्रगल्भ आहे, याचा खरा अर्थ इंग्रजीभाषक मराठी भाषकांपेक्षा प्रगल्भ झालेले आहेत. जर आपण स्वत:च्या हिमतीवर मराठीतून प्रगल्भ विचार करायचं विसरून गेलो, तर मराठी भाषेला सुतराम भविष्य नाही.’’ अशा वेळी भाषेच्या दृष्टीने क्षुल्लक प्रश्नांसाठी बुद्धी खर्चण्यापेक्षा नवीन पिढीला मराठीपासून दूर जाण्यापासून थांबवणं आणि एक प्रगल्भ मराठी समाज घडवण्यासाठी हातभार लावणं हेच कोणत्याही मराठीप्रेमीचं कर्तव्य असेल ना?

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या