राज्यक्रांती, धर्मक्रांती, समाजक्रांती, विचारक्रांती अशा क्रांतीच्या विविध प्रकारांमुळे भाषेत क्रांती घडून आली, बदल घडले असे इतिहास सांगतो. इंग्रजीच्या प्रभावाच्या संदर्भात सद्यकाळात त्यात ‘माध्यम’क्रांती या कारणाची भर पडली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

भाषेतील बदल हा आधी बोलण्याच्या भाषेत आणि नवीन पिढीच्या भाषेत दिसतो. आज बाल किंवा तरुण पिढीच्या शिक्षणाचे माध्यम, त्यांची विविध भाषक मित्रमंडळी, समाज माध्यमांमधील लघुरूपे किंवा भावचिन्हे वापरून झालेली मुक्त-वैश्विक भाषा आणि या पिढीचे जगभरात होणारे स्थलांतर, असे घटक त्यांच्या भाषेवर परिणाम करत आहेत. त्या तुलनेत आज चाळिशी गाठलेल्या आणि त्यापुढच्या वयातल्या मराठी माणसांची भाषा बहुतांश स्थिर आहे. आणखी २५-३० वर्षांनंतर आजच्या नवीन पिढीची भाषा हीच तेव्हाची ‘जिवंत’ समाजभाषा असणार, आहे हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.

आज विविध कारणांमुळे हिंदी, गुजराती अशा प्रादेशिक भाषक शेजाऱ्यांबरोबरच मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी अशा विविध बोलींचे भाषकही आधीपेक्षा एकमेकांच्या जास्त संपर्कात येत आहेत. ते एकमेकांच्या बोली, त्यातले साहित्य समजून घेत आहेत. मराठीत मोठय़ा प्रमाणावर अनुवादित साहित्य येत आहे आणि त्याला वाचकांकडून भरपूर मागणी आहे. त्यामुळे ही ललित, वैचारिक भाषांतरे, वृत्तपत्रीय भाषांतरित बातम्या या सर्वाची काहीशी मूळ भाषेशी साम्य असलेली वाक्यरचना यांचाही अप्रत्यक्ष परिणाम भाषेवर होत आहे. उदा. ‘कराल का?’ ऐवजी ‘करू शकाल का?’ ‘..ने सांगितलं.’ ऐवजी ‘..कडून सांगण्यात आलं.’

भाषेच्या बाह्य़ व आंतर स्वरूपांत सातत्याने फरक पडणे हा भाषेचा स्वभाव आहे, असे ज्येष्ठ भाषा अभ्यासक कृ. पां. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. भाषेत फरक पडणे ही नवीन वा चिंतेची बाब नाही. मात्र, भाषेतील आजच्या झंझावाती बदलांची मराठी भाषकांनी आणि अभ्यासकांनी नोंद घेतली आहे का आणि ते बदल पचवून भाषेचे तारू अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी ते तयार आहेत का?

– वैशाली पेंडसे-कार्लेकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vaishali.karlekar1@gmail.com