भाषासूत्र: अध्र्याच अक्षरातून अ(न)र्थ! | Bhashasutra Loksatta Bhashasutra Marathi Language Learning amy 95 | Loksatta

भाषासूत्र: अध्र्याच अक्षरातून अ(न)र्थ!

पुढील वाक्य वाचा- ‘तुम्ही त्याच्यावर कोर्टात जे आरोप केले आहेत, त्या आरोपांच्या पुष्टर्थ आवश्यक ते पुरावे, कागदपत्रे तुम्हांला कोर्टासमोर सादर करणे आवश्यक आहे.

भाषासूत्र: अध्र्याच अक्षरातून अ(न)र्थ!
( संग्रहित छायचित्र )

यास्मिन शेख

पुढील वाक्य वाचा- ‘तुम्ही त्याच्यावर कोर्टात जे आरोप केले आहेत, त्या आरोपांच्या पुष्टर्थ आवश्यक ते पुरावे, कागदपत्रे तुम्हांला कोर्टासमोर सादर करणे आवश्यक आहे.’आता ‘पुष्टर्थ’ या शब्दाचे नेमके स्वरूप काय आहे, ते पाहू या. या शब्दाची फोड अशी होईल- पुष्ट+र्थ? पुष्ट (संस्कृत विशेषण) अर्थ आहे- पोसलेला, जाडा, भरभक्कम. ‘र्थ’ला काहीच अर्थ नाही! ‘र्थ’ असे अव्यय अस्तित्वातच नाही त्यामुळे हा शब्दच संस्कृतात वा मराठीत उपलब्धच नाही. पोसलेला (पुष्ट) हा शब्दही वरील वाक्यात चुकीचाच आहे, अर्थशून्य आहे. योग्य शब्द आहे- पुष्टय़र्थ- पुष्टि अर्थ, पुष्टि हे संस्कृत नाम आहे. या शब्दाचा अर्थ आहे- दुजोरा. या शब्दाला अर्थ हे अव्यय जोडलेले आहे. या शब्दयोगी अव्ययाचा अर्थ आहे- करिता. पुष्टि अर्थ पुष्टय़र्थ- या शब्दाचा अर्थ आहे- दुजोरा देण्याकरिता, सिद्ध करण्यासाठी. त्यामुळे पुष्टर्थ हा निर्थक शब्द टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

वरील वाक्य असे हवे- ‘तुम्ही त्याच्यावर कोर्टात जे आरोप केले आहेत, त्या आरोपांच्या पुष्टय़र्थ आवश्यक ते पुरावे, कागदपत्रे तुम्हांला कोर्टासमोर सादर करणे आवश्यक आहे.’ आणखी एका शब्दाची चूक मराठी माणसे लेखनात वारंवार करतात. ‘अनावृत’ या शब्दाऐवजी ‘अनावृत्त’.या दोन्ही शब्दांची फोड करून अर्थ पाहू या.

अनावृत (विशेषण) अन्+आवृत. हा शब्द संस्कृतातील मराठीने स्वीकारलेला तत्सम शब्द आहे. अर्थ आहे- झाकण नसलेले, उघडे. अनावृत्त (वि) अन्+आवृत्त अर्थ आहे- ज्याची पुन: आवृत्ती होणार नाही किंवा जे पुन्हा घडणार नाही ते.अनावृत पत्र- जाहीररीत्या लिहिलेले, उघड पत्र (कोणीही वाचावे असे) जेव्हा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीतील दोष, चुका किंवा त्या व्यक्तीने केलेले अन्याय किंवा निर्थक आरोप इ. उघड करणारे पत्र जाहीरपणे वृत्तपत्रात, साप्ताहिकात किंवा अन्यत्र आपण छापून आणतो, त्या पत्राच्या शेवटी ‘अनावृत पत्र’ असे लिहिणेच योग्य आहे. अनावृत्त (आवृत्ती नसलेले, पुन: न घडणारे) अशा अर्थी चुकीचा शब्द योजू नये.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-11-2022 at 01:02 IST
Next Story
कुतूहल: जागतिक मत्स्यव्यवसाय दिन