scorecardresearch

भाषासूत्र : दहशत आणि हप्ता

काही शब्द चांगल्या तसेच वाईट अर्थानेही वापरले जातात. त्याची ही दोन उदाहरणे. दहशत शब्दाचे मूळ ‘दहशत्’ या अरबी शब्दात आहे.

marathi language

काही शब्द चांगल्या तसेच वाईट अर्थानेही वापरले जातात. त्याची ही दोन उदाहरणे. दहशत शब्दाचे मूळ ‘दहशत्’ या अरबी शब्दात आहे. भीती किंवा धाक हा त्याचा एक अर्थ. जसे की, दहशत निर्माण करणे म्हणजे ‘भीती निर्माण करणे’. याच अर्थाने तो शब्द फारसी, उर्दू व हिंदीतही स्थिरावला. त्याच शब्दापासून मराठीत ‘धास्ती’ हा शब्दही आला व तोही रूढ झाला. जसे की, ‘मला त्याची धास्ती वाटते.’ पण ‘दरारा’ हीदेखील ‘दहशत’ शब्दाचीच एक अर्थच्छटा. मात्र चांगल्या अर्थाने वापरली जाणारी. उदाहरणार्थ, ‘‘गावात पोलिसांचा खूप दरारा होता; सगळे गुंड अगदी वचकून असायचे.’’ पण याच ‘दहशत’ शब्दापासून अलीकडच्या काळात मराठीत ‘दहशतवाद’ किंवा ‘दहशतवादी’, म्हणजे इंग्रजीतील ‘टेररीझम’ किंवा ‘टेररिस्ट’ या भीतीदायक अर्थाचे, शब्द तयार झाले. अरबी, फारसी किंवा उर्दूत हे दोन्ही शब्द नाहीत. हिंदीत ते कधीकधी वापरले जातात, पण त्यासाठी हिंदीत ‘आतंकवाद’ किंवा ‘आतंकवादी’ हे शब्द अधिक रूढ आहेत.

‘दहशत’ शब्दाशी नाते साधणारा एक शब्द म्हणजे ‘हप्ता’; म्हणजे नियमितपणे दिली जाणारी रक्कम. त्याचा वाईट अर्थ म्हणजे संरक्षण मिळावे म्हणून नियमितपणे दिली जाणारी लाच. जसे की, ‘‘काही दुकानदार पुढारी, पोलीस आणि स्थानिक गुंड यांना हप्ता देतात व म्हणूनच त्यांचे अवैध धंदे निर्विघ्न सुरू राहतात.’’ हा हप्ता अर्थातच ज्याच्यापासून आपल्याला धोका उद्भवू शकतो अशाच व्यक्तीला दिला जातो; सर्वसामान्य निरुपद्रवी नागरिकाला हप्ता द्यायची कोणाला गरजच नसते! एकेकाळी मांडलिक राजे सम्राटाला दरसाल जी रक्कम देत तो एका अर्थाने हप्ताच होता, पण त्यासाठी ‘खंडणी’ हा अस्सल मराठमोळा शब्द वापरला जाई. ‘हप्ता’ शब्दाचे मूळ फारसी भाषेतील ‘हप्ताह्’ हे आहे व त्याचा एक अर्थ आहे आठवडा.

आठवडय़ाचे दिवस खरेतर सात असतात, पण ग्रामीण भागात आजही आठवडय़ाचे दिवस मोजताना सुरुवातीचा दिवसदेखील शेवटी पुन्हा धरतात व म्हणून आठवडय़ाचे आठ दिवस मोजले जातात. म्हणून शेतकऱ्यांचा ‘आठवडी’ बाजार. ‘हप्ताह्’ शब्दाचा मूळ फारसीत अर्थ आहे ‘ठरावीक मुदतीनंतर द्यायचा भाग’. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना ठरावीक कालावधीनंतर दिली जाणारी रक्कम या चांगल्या अर्थानेही ‘हप्ता’ शब्द वापरला जातो.

– भानू काळे

bhanukale@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhashasutra panic installment good bad sense fear ysh

ताज्या बातम्या