डॉ. नीलिमा गुंडी

काल हे जगण्याचे एक महत्त्वाचे परिमाण आहे. जीवनव्यवहारातील कालविषयक संवेदन वाक्प्रचारांतूनदेखील व्यक्त होते. पंच पंच उष:काली, असा वाक्प्रचार जुन्या साहित्यात आढळत असे. सूर्योदयाच्या पूर्वी पाच घटकांचा काळ असा त्याचा अर्थ आहे. घटका म्हणजे ६० पळांचा किंवा २४ मिनिटांचा काळ होय. ‘पंच पंच उष:काली रविचक्र निघो आले’, असा अरुणोदय त्यातून कळतो. तांबडे फुटणे हा वाक्प्रचार ‘फुटणे’ या क्रियापदाचा सर्जनशील अर्थ सुचवतो. सूर्योदयापूर्वी आकाश तांबडय़ा रंगाचे झालेले असते. या नैसर्गिक रूपाचे संवेदन यात आले आहे. तांबडे फुटणे म्हणजे उजाडणे.

कासराभर सूर्य वर येणे, या वाक्प्रचाराचा संबंध ग्रामीण जीवनाशी निगडित आहे. कासरा म्हणजे बैलांना बांधलेली लगामासारखी दोरी. कासराभर सूर्य वर येणे म्हणजे क्षितिजापासून कासऱ्याच्या लांबीइतका सूर्य वर येणे, साधारण सकाळी सात वाजण्याच्या सुमार. यातील कालमापन काटेकोर नाही. अष्टौप्रहर म्हणजे सतत, निरंतर. ‘आई अष्टौप्रहर काम करते’, असे शब्द कानी पडतात. प्रहर म्हणजे तीन तास. अष्टौप्रहर याचा शब्दश: अर्थ २४ तास असा आहे. वाक्प्रचारात लक्ष्यार्थ अभिप्रेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सटी सामाशी/ सठी षण्मासी असा वाक्प्रचार रूढ आहे. षष्ठ षण्मास अशी त्याची फोड करता येते. याचा अर्थ आहे, केव्हा तरी. पु. शि. रेगे यांनी ‘गंधरेखा’ या कवितेत काव्य-निर्मितीविषयी म्हटले आहे, ‘एक आहे झाड माझे, राठ ज्याच्या जीर्ण शाखा/ सठी षण्मासी परंतु/ लाख येती त्या शलाका’ बारा वाजणे, हा वाक्प्रचार उतरती कळा लागणे, विनाश जवळ येणे, या अर्थी वापरतात. सूर्य बारा वाजता आकाशाच्या मध्यावर येतो आणि पश्चिमेकडे उतरायला लागतो. या निसर्गनेमावरून हा अर्थ रूढ झाला आहे. उदा. पद्मजा फाटक, माधव नेरूरकर यांच्या ‘बाराला दहा कमी’ या शीर्षकाच्या पुस्तकात वैज्ञानिक प्रगतीच्या वाटेवरील धोक्याची कल्पना दिली आहे. काळाची गती पकडण्याचे काम वाक्प्रचार अशाप्रकारे समर्थपणे करतात.