डॉ. नीलिमा गुंडी

आदिम काळापासून लोकमानसात सभोवतालाविषयी- त्यातील गूढतेमुळे- काही दृढमूल समजुती होत्या. राक्षस, देव, पिशाच्च यांच्याविषयी काही धारणा होत्या. विविध भाषांमध्ये या संकल्पनांसाठी शब्द आहेत. साहजिकच यांच्याशी संबंधित वाक्प्रचार मराठीतही रूढ आहेत.

बारा पिंपळावरचा मुंजा, हा वाक्प्रचार अशाच प्रकारचा आहे. पूर्वी पिंपळाची मुंज करीत असत. पिंपळावर मुंजा राहतो, अशी समजूत असे. बारा पिंपळांवर एकच मुंजा असेल, तर तो नेहमी एकाच झाडावर बसणार नाही. तो या झाडावरून त्या झाडावर फिरत राहील! यावरून या वाक्प्रचाराचा सूचितार्थ आहे : अपरात्री हिंडणारा, एका ठिकाणी न राहणारा.

देव पावणे, या वाक्प्रचाराचा वाच्यार्थ आहे, देव प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण होणे. हा वाक्प्रचार आपण ‘मनाजोगी गोष्ट घडणे’ या अर्थाने वापरतो. तसेच देव्हारे माजवणे, हा वाक्प्रचारही रूढ आहे. देव्हारा म्हणजे देव ठेवण्याची जागा. देवामुळे देव्हारा महत्त्वाचा ठरत असतो. त्यामुळे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो, प्रस्थ माजवणे, स्तोम माजवणे. देवाप्रमाणे दानव ही संकल्पनाही आढळते. याचे एक उदाहरण पाहू. राहू-केतू मागे लागणे, हा वाक्प्रचार रूढ आहे. फलज्योतिष राहूला आठवा ग्रह मानत असले तरी तो इतर ग्रहांप्रमाणे प्रत्यक्ष दिसणारा ग्रह नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका पुराणकथेनुसार राहू हा दानव होता व त्याच्या एका अपराधामुळे त्याचे शिर विष्णूने धडावेगळे केले होते. त्याचे डोके म्हणजे राहू व धड म्हणजे केतू. त्यांच्यामुळे सूर्यचंद्र यांना ग्रहण लागते, अशी समजूत होती. त्यामुळे राहू-केतू मागे लागणे म्हणजे एखाद्याला सतावणे, एखाद्याच्या खनपटीस बसणे. विज्ञानाच्या आधारे ग्रहणामागची शास्त्रीय कारणे स्पष्ट झाली, तरीही हा वाक्प्रचार लक्ष्यार्थामुळे टिकून राहिलेला दिसतो. भूत म्हणता भूत लागणे, या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, एखाद्या गोष्टीचा सारखा ध्यास लागला, की ती गोष्ट मुळात नसली, तरी तिचा भास होऊ लागतो. कालांतराने यामागच्या समजुती समाजप्रबोधन होऊन कालबाह्य ठरल्या; तरीही असे वाक्प्रचार लक्ष्यार्थामुळे टिकून राहिलेले दिसतात.