१८व्या शतकापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये धर्माचा मोठा प्रभाव होता. एका बाजूला परंपरागत धर्माची शिकवण आणि ऐहिक सुखांचा तिरस्कार करणाऱ्या पाप-पुण्याच्या टोकाच्या कल्पना, तर दुसऱ्या बाजूला बुद्धिमत्ता, तर्कसंगत विचार आणि अंगभूत प्रतिभेच्या जोरावर जगाकडे पाहण्याचा अत्याधुनिक दृष्टिकोन अशा पेचात अनेक वैज्ञानिक सापडले होते. त्यापकीच एक होते, ब्लेझ पास्कल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लेझ पास्कल या फ्रेंच संशोधकाचा जन्म १९ जून १६२३ रोजी झाला. चार वर्षांचे असतानाच त्याची आई वारली. त्यामुळे ब्लेझचा सांभाळ त्याचे वडील आणि गिल्बर्ट व जॅकेलिन या त्याच्या दोन थोरल्या बहिणींनी केला.

कर संकलन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या आपल्या वडिलांना ब्लेझने खूप मेहनत घेऊन गिअर्स आणि चाकं यांच्या सहाय्याने आकडेमोड करणारं यंत्र तयार करून दिलं. अठराव्या वर्षी पास्कलने तयार केलेलं हे बेरीज-वजाबाकी करू शकणारं यंत्र पुढील काळातील कॅलक्युलेटरची नांदी ठरलं.

इव्हानगेलिस्टा टॉरिसेली यांनी तयार केलेलं वायुभारमापक यंत्र घेऊन पास्कल १२०० मीटर उंचीच्या ‘प्यू डे डोम’ या शिखरावर गेला. जसजसं उंच जावं तसतसा हवेचा दाब कमी होत जात असल्याचं निरीक्षण त्याने नोंदवलं. या निरीक्षणावरून वातावरणाच्या बाहेर निर्वात पोकळी असली पाहिजे. असा निष्कर्ष त्याने काढला.

हवेच्या दाबासंदर्भात केलेल्या या संशोधनातूनच पास्कल यांनी द्रव आणि वायूंच्या संदर्भातला मूलभूत नियम मांडला. बंदिस्त द्रव किंवा वायू पदार्थावर दाब दिला असता हा दाब पदार्थाच्या सर्व िबदूवर समान पारेषित होतो, हा नियम ‘पास्कलचा नियम’ म्हणून प्रसिद्ध झाला. या नियमाचा उपयोग आजही ‘हायड्रॉलिक्स’ तंत्रावर चालणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये केला जातो.

पियेर फरमॅट यांच्याबरोबर झालेल्या पत्रव्यवहारातून पास्कल यांनी ‘संभाव्यता सिद्धांत’ (प्रोबॅबिलिटी थीअरी) विकसित केला. पास्कल यांच्या द्विपदीमधल्या क्रमाने येणाऱ्या घातांकाचे सहगुणक शोधण्याची पद्धती तसेच ‘प्रक्षेप्य भूमिती’ (प्रोजेक्टिव्ह जॉमेट्री)  प्रसिद्ध आहेत.

जन्मापासूनच अत्यंत नाजूक प्रकृती असलेल्या पास्कलना वयाच्या १७व्या वर्षांपासून पोटदुखीचा प्रचंड त्रास व्हायला लागला. पोटदुखीच्या असह्य़ वेदनांमुळे अनेक रात्री त्यांनी जागून काढल्या. यातूनच पुढे त्यांना निद्रानाशाचा विकार जडला. शेवटी वयाच्या ३९व्या वर्षी त्यांचा अकाली मृत्यू झाला.

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

विश्वनाथ सत्यनारायण- काव्यसंपदा

विश्वनाथ यांनी वयाच्या अकराव्या वर्षीच काव्यलेखनास सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या कविता ‘विश्वेश्वर शतकम्’ (१९१७) व ‘आंध्रपौरुषम्’ तसेच नंतरच्या ‘विश्वनाथ मध्याक्करलु’ (१९५५), ‘विश्वनाथ पंचशलि’ (१९५८) आणि ‘रामायण कल्पवृक्षमु’ या साऱ्या रचना ईशभक्तीपर आहेत.तारुण्यात त्यांचे ‘गिरिकुमारुनि प्रणय गीतालु’ (१९२४-२८), ‘शृंगारविथि’ (राधा-कृष्ण प्रीतीची गीते) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले. आपल्या इष्टदेवतेला संबोधित करून त्यांनी ‘मा स्वामी’ या काव्याची रचना केली. या भक्तीपर काव्यानंतर त्यांनी ‘किन्नेररसानि पाटलु’ ही एक प्रेम आणि सौंदर्य या विशेषांनी युक्त अशा वैशिष्टय़पूर्ण गीतकाव्याची रचना केली. किन्नेरा ही आंध्र प्रदेशातील एक छोटीशी नदी, पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. या नदीच्या रूपात कवीला एका तरुण गृहिणीची करुण कथा दिसली. एका प्रेमिकेच्या मनातील भावभावनांची तीव्रता जाणवली आणि त्यांनी या गीतात्मक काव्यात शब्दबद्ध केली. ‘ऋतुसंहारमु’ (१९३३)- या अद्भुत प्रतिभाशाली काव्यात तेलुगू प्रदेशाचे रसरशीत चित्रण केले आहे. आंध्र-तेलंगणातील ऋतुचक्राची सहजरम्य चित्रे रेखाटली आहेत. ‘मेघदूता’च्या धर्तीवर त्यांनी ‘शशिदूतम्’ लिहिले ; त्यात त्यांच्या परंपरानिष्ठेची ओढ लक्षात येते. ‘आंध्रपौरुषम्’ आणि ‘आंध्रप्रशस्ती’ ही त्यांची काव्ये अनेकांना स्फूर्तिदायक वाटतात.

ऐन तारुण्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर कविमनाची सुखदु:खे भावपूर्ण भाषेत त्यांनी ‘स्मृतिशतक’, ‘कर्मशतक’ व ‘नीतिशतक’ या विलापिकांतून व्यक्त केली. विश्वनाथ सत्यनारायण यांच्या भक्तिभावनेचे बीज दिसते ते त्यांच्या ‘रामायण कल्पवृक्षमु’ या महाकाव्यामध्ये. त्यांच्या एकूण सर्वच काव्यनिर्मितीत पंडिती वळणाचा आविष्कार अधिक आहे. आधुनिकतेपेक्षा, परंपरेचे सातत्य त्यांना अधिक भावल्याचे त्यांच्या अनेक साहित्यकृतींतून जाणवते. भारतीय भाषांतील साहित्यावर दिसून येणारा पश्चिमी प्रभाव, त्यांच्या प्रवृत्तीला मान्य नव्हता. साहजिकच नव्या काव्यरचनेबद्दल त्यांनी नाराजीच व्यक्त केली आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blaise pascal
First published on: 17-02-2017 at 02:33 IST