डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतभेद होणं ही गोष्ट अतिशय स्वाभाविक असते. दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या धारणा वेगळ्या असू शकतात. एकाला एक गोष्ट संपूर्ण खरी आणि तीच गोष्ट दुसऱ्याला संपूर्ण खोटी वाटू शकते. त्या त्या वेळी, आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी दुसऱ्याची टिंगलटवाळी, काही प्रमाणात आक्रमकता, संपूर्णपणे निर्बुद्ध मुद्दे जोरजोरात मांडणं हे सर्व घडू शकतं; पण ज्या वेळेला या वादाचा भर ओसरतो. मतभेद संपतात किंवा तात्पुरते संपल्यासारखे वाटतात, त्यानंतर काय?

त्यानंतर त्या निर्बुद्ध मुद्दय़ांबद्दल, ते मुद्दे मांडण्यासाठी केलेल्या आग्रहाचं काय होतं? दोन लहान मुलांचं भांडण होतं, हमरीतुमरीवर येतात; पण भांडण मिटल्यावर, ‘आपण काय बोललो? कसे बोललो, हे बोलायला हवं होतं का?’ आपण जे मुद्दे मांडले त्यात एक टक्का तरी तथ्य होतं का? की मुद्दय़ासाठी मुद्दा होता? यावर  घरातली, समाजातली मोठी माणसंसुद्धा विचार करत नाहीत, स्वत:च्या वागण्याचं मूल्यमापन करत नाहीत. तर लहान मुलं करतील का? त्यांना तशी सवय लागेल का?

एकमेकांच्या विरोधातले मुद्दे खूपच असतात. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप असो, घरात कामाच्या विभागणीचा मुद्दा असो, कोणाला मत द्यायचं हा विषय असो. समाजात आधीपासून असलेले विविध प्रकारचे भेद असोत, निसर्गाची कधीही भरून न येणारी हानी ढळढळीत समोर दिसत असूनही त्याविरोधातलं तावातावानं बोलणं असो. या मतभेदांमध्ये मुद्दे कसे मांडले गेले, त्याबद्दल अत्यंत सुमार विनोद कसे केले गेले, मतभेदांच्या मूळ मुद्दय़ांना कशी कशी बगल दिली गेली. या सगळ्यात आपण बोथट कसे होत गेलो- हा सगळा प्रवास एक व्यक्ती म्हणून आपल्याला काय शिकवून गेला, हे तपासलं गेलं पाहिजे. तसं झालं नाही तर आजपेक्षा उद्या माणूस म्हणून, समाज म्हणून- संवेदना असूनही अधिकाधिक असंवेदनशील असू. बुद्धी असूनही निर्बुद्धतेकडे वाटचाल करणारे असू.

भावनांचं केंद्र असलेली लिंबिक सिस्टम अतिशय प्रगत अवस्थेत माणसाकडेच आहे. तसंच बुद्धीचा विविधांगांनी आणि फार सुंदर प्रकारे उपयोग माणूसच करू जाणतो. कारण त्याच्याकडे निओ कॉर्टेक्ससारखा प्रगल्भ अवयव आहे. याचं वरदान लाभूनही मतभेद आणि त्यानंतर- याची बौद्धिक जाणीव माणसाला होत नसेल, तर मानवजातीचं केवळ अवघडच असू शकतं.

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain act differences and after that zws
First published on: 16-10-2019 at 01:26 IST