शुभदा वक्टे
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्या ह्युमोनॉइड यंत्रमानव निर्मात्यांतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे ‘ब्रेट अॅडकॉक’. ब्रेट हे अमेरिकेतील तंत्रज्ञ उद्योजक असून त्यांचा जन्म ६ एप्रिल १९८६ रोजी इलिनोईस येथील मोवेक्वा या लहान शहरात झाला. ‘सेंट्रल एअँडएम हायस्कूल’मधून सर्वोच्च गुणांसह प्रथम श्रेणीतून वेलेडिक्टोरियन नैपुण्यासह ते पदवीधर झाले. फ्लोरिडा विद्यापीठातून सुरुवातीला अभियांत्रिकी व फायनान्समध्ये शिक्षण घेतले. ‘बॅचलर ऑफ सायन्स इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवीसुद्धा प्राप्त केली. १६ व्या वर्षापासून ते वेब कंपन्या सुरू करून त्यांचे काम करू लागले.

२०१२ साली अॅडम गोल्डस्टीनच्या मदतीने न्यूयॉर्कमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विशेष तांत्रिक कौशल्यधारित तज्ज्ञ पुरवणारे ‘वेटरी’ हे संकेतस्थळ त्यांनी सुरू केले. नोकरी शोधणारे आणि ज्यांना तांत्रिक कौशल्यधारित मनुष्यबळ हवे आहे अशांना सॉफ्टवेअर व मशीन लर्निंगद्वारे एका मंचावर आणले गेले, त्यामुळे अपेक्षित परिणाम साधला गेला. वापरकर्ते दिवसेंदिवस भराभर वाढत गेले. २०१८ मध्ये त्यांनी ही कंपनी अॅडेक्को ग्रुपला विकली. नंतर अॅडम गोल्डस्टीनच्या मदतीने ‘आर्चर एव्हिएशन’ कंपनी स्थापन केली आणि ‘इलेक्ट्रिक व्हीटीओएल’ विमानांची निर्मिती केली. यात हेलिकॉप्टरप्रमाणे ऊर्ध्वदिशेत विमानाचे उड्डाण केले जाते आणि जमिनीवर उतरवले जाते. त्यामुळे या विद्याुत विमानांना धावपट्टीची गरज भासत नाही.

हेही वाचा : कुतूहल : घरगुती कामांसाठी यंत्रमानव

काही वर्षांनंतर आर्चर कंपनी सोडून ब्रेट अॅडकॉक यांनी २०२२मध्ये ह्युमोनॉइड यंत्रमानव तयार करणारी ‘फिगर’ ही नवीन कंपनी स्थापन केली. या कंपनीचे ते संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असली तरी विशेष कौशल्याधारित व धोकादायक कामे करण्यासाठी कामगारांची कमतरता जाणवते. तसेच एकसुरी, कंटाळवाणी, निरस कामे करण्यासाठी यंत्रमानव तयार करून ते विकसित करण्याचे काम फिगर ही कंपनी करत आहे. ब्रेट अॅडकॉक यांच्या मते हे यंत्रमानव मानवाला मदतनीस म्हणून काम करण्यास सक्षम असतील. या कंपनीने १५२ सेंटीमीटर उंच, १५ सेंटीमीटर रुंद असा ६० किलोग्रॅम वजनाचा ‘०१ मानव’ नामधारित यंत्रमानव तयार केला. हा यंत्रमानव २० किलोग्रॅमपर्यंत वजन उचलू शकतो. एकदा चार्ज केला तर तो पाच तास काम करू शकतो. आयझॅक एसिमॉव्ह यांनी लिहिलेल्या यंत्रमानवावरील कथांचे ब्रेट अॅडकॉक चाहते असून त्यांच्यावर या कथांचा प्रभाव आहे. ब्रेट अॅडकॉक यांच्या मते भविष्यात प्रत्येकाकडे सफाई, धुलाई, स्वयंपाक करणे इत्यादी घरगुती आणि वैयक्तिक कामांसाठी एक तरी यंत्रमानव असेल.

शुभदा वक्टे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org