इमारतींच्या भिंती किंवा सपाट छपरे जलरोधक बनविण्यासाठी त्यावर प्रथम जलरोधक पदार्थाच्या विद्रावाचे पाच-सहा लेप देतात व त्यावर आवश्यक तेथे फेल्टचे कापड पसरून त्यावर एक ते तीन सेंमी जाडीचा सिमेंट-वाळूच्या मिश्रणाचा थर देतात. सिमेंट जलरोधक करण्याकरिता तुरटी व कॉस्टिक सोडय़ाचे मिश्रण त्यात मिसळतात.
शिवाय इमारतीमध्ये काँक्रीट हे अनेकदा सच्छिद्र असते. या सच्छिद्रतेमुळे ते पूर्णत: जलरोधक राहत नाही. म्हणून त्यात पॉलिमर मिसळून ते जलरोधक केले जाते. त्यामध्ये बिटूमिन, सिलिकेट, पीव्हीसी आणि एचडीपीई असे पदार्थ वापरले जातात. गेल्या दोन दशकापासून बांधकाम क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यात जलरोधक पदार्थ आणि मेमब्रेन यांचाही वापर केला जात आहे. जलरोधक क्षमता हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक या दोन प्रकारात मोडते. हायड्रोफिलिक पद्धतीत क्रस्टलायझेशन तंत्रज्ञानाद्वारे काँक्रीटमधील पाणी काढून टाकले जाते. परिणामी, त्यातील पाणी निघून गेल्याने ते गळू शकत नाही.
हायड्रोफोबिक पद्धतीत फॅटी आम्ल हे काँक्रीटमधील बारीक चिरा, छिद्रे बुजवण्याचे कार्य करतात. त्यामुळे त्यातून पाणी झिरपू शकत नाही. अक्रॅलिक कोपॉलीमर इमल्शन हे सिमेंटमध्ये पूरक (अ‍ॅडेटिव्ह) म्हणून मिसळतात. त्याने काँक्रीटची जलरोधक क्षमता, गंजरोधक क्षमता आणि ताकदही वाढते. हे रसायन छत, पाण्याची टाकी, पोहण्याच्या तलावाचा पृष्ठभाग यासाठी वापरतात. स्टायरीन ब्युटाडाईन कोपॉलीमर इमल्शन हे काँक्रीटमध्ये मिसळल्याने ते जलरोधक, रसायनरोधक आणि ओरखडा प्रतिकारक (अ‍ॅब्रेशनरोधक) म्हणून कार्य करते. त्याचप्रमाणे चुना, सिमेंट, रंग यांचाही वापर केला जातो. लॅटेक्स रंग हे बाथरूम बेसमेंट, भिंती गळू नये म्हणून वापरतात. बाथरूममध्ये आद्र्रतेचे प्रमाण अधिक असल्याने भिंतीत पाणी जाऊन त्याचे आयुष्य कमी होते. या रंगामुळे भिंतीचे आयुष्य वाढते. तसेच एपॉक्सी रंग हे अधिक उच्च प्रतीचे असल्याने ते जहाज, पाण्याची टाकी यामध्ये वापरतात. या रंगामध्ये रसायनाचा बंध घट्ट असल्याने त्यातून पाणी गळू शकत नाही. जलरोधक म्हणून इमारतीत मोनोमर आणि पॉलीमर याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.
प्रा. शामकुमार देशमुख (सोलापूर)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई – office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा – शॉक आणि रॉक
विनोद वाचून अथवा पाहून खुदकन हसणं वा खळखळून हसणं यासारखा उत्तम स्ट्रेस बस्टर नाही. उत्तम विरंगुळा आणि प्रसन्न मनोवृत्ती निर्माण करण्यासाठी विनोद आणि वृत्तीमध्ये ‘सेन्स ऑफ ह्य़ूमर’ याची सांगड घातली की ‘जिंदगी एक सफर है सुहाना’चा एहसास होतो.
पण मित्रा, एखाद्याला विनोद समजावून सांगण्यासारखी कठीण गोष्ट ‘शिरसि मा लिख, मा लिख मा लिख!’ हे खरंय.
ही नौबत स्वीकारून ‘पंच’ या जुन्या ब्रिटिश साप्ताहिकातले काही मनोविकार-मानस विश्लेषण तज्ज्ञांवरचे विनोद सांगतोय. गंमत म्हणजे, या विनोदामधल्या नायकाचं (मनोविकारतज्ज्ञ) मस्तपैकी कॅरिकेचर झालंय. उंच कपाळ, दाढी, चष्मा आणि चेहऱ्यावर ‘चिंता करतो विश्वाची’ असे भाव!
चित्र क्रमांक (१) मधला सायको अ‍ॅनालिस्टच्या काऊचवर पडलेल्या रुग्णाचं म्हणणं ऐकणारा तज्ज्ञ नोटस् काढतोय, अतिशय गंभीर आणि चिंताग्रस्त होऊन. तर रुग्ण मात्र खुशीत आहे. बिनधास्तपणे तिथे पहुडलाय. आणि अगदी सहजपणे अ‍ॅनालिस्टला म्हणतोय..
माझं तसं ठिकाय आणि चिंतेचं तर तुम्हाला काही कारण नाही. त्यामुळे मी निघतो आता गुरुग्रहावर!
इथे पेशंट रॉक्स
नि डॉक्टर शॉक्ड!!
चित्र क्रमांक (२)मध्ये मानसोपचार या विषयाला मार्केटची कशी बाधा झालीय, हे अधोरेखित होतं.
इथे रुग्ण डॉक्टरच्या प्रश्नामुळे भांबावलाय. डॉक्टर बिनधास्त आहे.
आपला कोणी तरी पाठलाग करीत असल्याचा संशय संशयरोगाने पछाडलेले रुग्ण बोलून दाखवतात. कधी कधी संशय इतका बळावलेला असतो की डॉक्टरकडेही संशय व्यक्त करीत नाहीत. (कारण पाठलाग करणारे चोरून ऐकत असले तर?) अशा वेळी डॉक्टर स्वत:हून संशयाबद्दल विचारणा करतो.
अशा प्रसंगाची इथे खिल्ली उडवली आहे.
तुझा पाठलाग करीत कोणी इथवर आलेलं नाही ना? असल्यास सांग, या आठवडय़ात संशयी रुग्णांना स्पेशल डिस्काऊंट चालू आहे!!
.. इथे मात्र पेशंट शॉक्ड,
डॉक्टर रॉक्स!!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – समर्थाचा कंठशोष
‘‘‘..आधी प्रपंच करावा नेटका मग पहावे परमार्थविवेका’ या धोरणी तत्त्वाची अंमलबजावणी मुसलमानांनीच केली. ‘मराठा तितुका मेळवावा, आपला महाराष्ट्र-धर्म वाढवावा’’ ही समर्थाची शिकवण मराठय़ांनी दासबोधांतच गुंडाळून ठेवली.. रानोमाळ भटकणाऱ्या रानटी धनगरांना इस्लामाने राज्यपदास कसे चढविले, हजारों वर्षांच्या अंध:कारातून त्यांना बाहेर कसे आणले आणि धर्म व राजकारण यांच्या जोडगोळीने त्यांना सारे जग पादाक्रांत करण्याचे सामथ्र्य कसे दिले, याचा इतिहास नीट पाहिला की समर्थ रामदासांनी कंठशोष करकरून आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा असा हा टाहो महाराष्ट्राच्या कानीकपाळी फोडला, त्याचा रहस्यार्थ अधिक विशद करून सांगण्याची आवश्यकता राहणार नाही.. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही शब्दयोजना समर्थानी का केली, याचे खरे रहस्य हिंदुधर्माचा इतर धर्माशी आलेल्या संबंधाचा तुलनात्मक अभ्यास केल्याने खचित उमगण्यासारखे आहे.’’  रामदासांच्या शिकवणीविषयी प्रबोधनकार ठाकरे लिहितात –  ‘‘खुषीने किंवा नाखुषीने, सद्धर्म किवा आपद्धर्म म्हणून, लोभाने किंवा शुद्ध मूर्खपणाने धर्मातर केलेल्या व्यक्तींना परधर्मात मोक्षाचा खरा वा खोटा मार्ग सापडो वा न सापडो, मूळधर्मापेक्षा एकाच कोलांटी उडीत जगदीश्वराचे सगुण किंवा निर्गुण सिंहासन पटकविता येणे शक्य असो वा नसो, त्यामुळे हिंदु धर्मीयांच्या संघशक्तीचा ऱ्हास होऊन, त्यांच्या राष्ट्रीय प्रपंचावरही असहनीय वज्राघात होत आहे, हा हृदयभेदी देखावा पाहून समर्थासारख्या महा राष्ट्रपुरुषाचे अंत:करण कळवळल्यामुळेच त्यांनी आपल्या अंतस्थ वेदनांच्या संवेदना मात्र दासबोधात ठिकठिकाणी मोठय़ा उमाळ्याने व्यक्त करून ठेवल्या आहेत.. अहो, सामोपचाराच्या गोष्टी गांडूनी सांगाव्या. मर्दाचं ते काम नाही. समर्थ रामदास म्हणतात, ‘मारिता मारिता मरावे। मरोनि अवघ्यास मारावे।’ महाराष्ट्र हा काही लेच्यापेच्यांचा देश नाहीये. ही वाघाची अवलाद आहे;  या वाघाला कोणी डिवचलं तर त्याचा परिणाम काय होईल, याचे इतिहासामध्ये दाखले आहेत. भविष्यकाळात पहायचे असतील तर पहायला मिळतील!’’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemicals to make waterproof
First published on: 10-06-2014 at 12:18 IST