– डॉ. रंजन गर्गे

पर्यावरणातील जिवंत सूक्ष्मजीवांचे विशेषत: जिवाणू आणि बुरशी यांचे संकलन आणि मोजणी करताना सांख्यिकीय आणि गुणवत्तापूर्ण मोजमाप केले जाते. अत्यंत संवेदनशील अशा जैवतंत्रज्ञान उद्याोगात अंतर्गत तसेच सभोवतालच्या परिसराची, विविध उंचीवरील सूक्ष्मजीवांची तपासणी करतात. प्रसंगी संकलनासाठी ड्रोन्सचाही वापर करतात. याशिवाय त्या पर्यावरणातील घन व द्रव नमुन्यांची तपासणी केली जाते. उदाहरणार्थ माती, पाणी, खाद्यापदार्थ, पेय, औद्याोगिक कच्चा माल, इत्यादी.

मातीत वास्तव्य करणाऱ्या जिवाणूंची संख्या मोजण्यासाठी प्रथम १ ग्रॅम मातीचा नमुना नऊ मिलीलिटर निर्जंतुक सलाइनमध्ये घेतात. म्हणजे त्याची विरलता ०.१ ग्रॅम प्रति मिलीलिटर झाली. त्यातील १ मिलीलिटर नमुना ९ मिलीलिटर सलाइनमध्ये टाकून तो १० पटीने विरल करून घेतात. अशा प्रकारे त्याची क्रमाक्रमाने विरलता शंभर, हजार, दहा हजार आणि एक लाख पट करून घेतात.

पोअर प्लेट तंत्र : प्रथम पाच पेट्रीप्लेट्समध्ये प्रत्येक विरलतेचा ०.१ मिलीलिटर नमुना निर्जंतुक पद्धतीने टाकून घेतात. नंतर १० मिलीलिटर द्रवरूप आणि निर्जंतुक घन पोषणमाध्यम त्या पाच पेट्रीप्लेट्समध्ये ओततात. पेट्रीप्लेट्सना झाकण लावून त्या सपाट पृष्ठभागावर ३७ अंश सेल्सियस तापमानाला २४ तास ठेवतात.

स्प्रेड प्लेट तंत्र : यात पेट्रीप्लेट्समध्ये ओतलेले माध्यम घट्ट होऊ देतात. नंतर पाच पेट्रीप्लेट्समध्ये प्रत्येक विरलतेचा १ मिलीलिटर नमुना निर्जंतुक पद्धतीने टाकून घेतात. त्रिकोणी काचकांडीच्या साहाय्याने तो नमुना आगार पोषणमाध्यमावर पसरवतात. या प्लेट्स ३७ अंश सेल्सियस तापमानाला २४ तास ठेवतात.

पोअर प्लेट तंत्रात ठेवलेल्या प्लेट्सपैकी, वसाहती स्वतंत्रपणे मोजता येतील अशी प्लेट निवडतात. पेट्रीप्लेटवर साधारण ३०० पर्यंत जिवाणूंच्या स्वतंत्र वसाहती मोजता येतात. समजा, एकास दहा हजार विरलतेचा ०.१ मिलीलिटर नमुना प्लेटवर घेतला आणि त्यावर ९८ वसाहती स्पष्ट मोजता आल्या, तर यावरून आपण १ ग्रॅम मातीत किती जिवाणू (कॉलनी फॉर्मिंग युनिट्स) आहेत, हे सोबत दिलेल्या सूत्रानुसार मोजू शकतो. याचा अर्थ घेतलेल्या एक ग्रॅम मातीत ९८ लाख जिवाणूंचे वास्तव्य आहे. स्प्रेड प्लेट तंत्रात हेच सूत्र वापरून १ ग्रॅम मातीत वास्तव्य करणाऱ्या जिवाणूंची संख्या मोजतात.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org