अ‍ॅसिटेट रेयॉन निर्मितीमध्ये सेल्युलोजचे सेल्युलोज अ‍ॅसिटेटमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुमारे ७ ते ८ तासांत पूर्ण होते. या टप्प्यात अ‍ॅसिटेटचे तीन रेणू सेल्युलोजमधील ग्लुकोज एका रेणूबरोबर जोडले जातात. याला ट्रायअ‍ॅसिटेट असे म्हणतात. हे ट्रायअ‍ॅसिटेटचे मिश्रण मोठय़ा भांडय़ांमध्ये काही काळासाठी साठवून त्यावर जलीय अपघटनाची प्रक्रिया (वॉटर हायड्रॉलिसिस) केली जाते. या अपघटनाच्या प्रक्रियेमुळे सेल्युलोज ट्रायअ‍ॅसिटेटमधील अ‍ॅसिटेटचे दोन रेणू बाजूला काढले जाऊन एकच रेणू उरतो. याला सेल्युलोज अ‍ॅसिटेट असे म्हणतात. अपघटनाच्या प्रक्रियेनंतर सेल्युलोज अ‍ॅसिटेट हे पांढऱ्या चकत्यांच्या किंवा खपल्यांच्या रूपात खाली बसतात.
या चकत्यांतून पाणी काढून टाकण्यासाठी त्यांचे केंद्रोत्सर्जन (सेंट्रीफ्युजिंग) केले जाते आणि नंतर या चकत्यांच्या स्वरूपातील सेल्युलोज अ‍ॅसिटेट पूर्णपणे वाळवले जाते. हे वाळवलेले सेल्युलोज अ‍ॅसिटेट अ‍ॅसिटोन या द्रावकात विरघळवण्यात येते. या द्रावणाला कताई द्रावण किंवा डोप असे म्हणतात. हे द्रावण त्यानंतर गाळून त्यामधील हवा काढून टाकली जाते. हे द्रावण नंतर सूक्ष्म छिद्रे असलेल्या तनित्रामधून तलम धारांच्या रूपात बाहेर सोडले जातात. या धारा बाहेर येताच त्यांच्यावर उष्ण हवेचे वाफारे सोडले जातात. ही उष्ण हवा तनित्रातून बाहेर पडणाऱ्या धारांच्या रूपातील द्रावणाला लागल्याबरोबर या द्रावणातील अ‍ॅसिटोन उडून जाते आणि सेल्युलोज अ‍ॅसिटेटचे तंतूंच्या रूपात घनीकरण होते. उष्ण हवेमुळे हे तंतू वाळतात आणि नंतर ते एका बॉबिनवर गुंडाळले जातात.
 या तंतूंची ताकद व्हिस्कोजपेक्षा थोडी कमी असते, परंतु पाण्याने ओले केले असता व्हिस्कोजची ताकद जितकी घटते तेवढी अ‍ॅसिटेट रेयॉन तंतूंची घटत नाही. हे तंतू व्हिस्कोजच्या तंतूंपेक्षा कमी आद्र्रताशोषक असतात, परंतु पाणी एका भागातून दुसऱ्या भागात वाहून नेण्याची त्यांची क्षमता मोठी असते. सूक्ष्म जंतू व कीटक यांच्या आक्रमणाचा हे तंतू यशस्वीरीतीने सामना करतात त्यामुळे अशा तंतूंचा या तंतूंपासून तयार केलेल्या कपडय़ांवर परिणाम होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थानांची बखर: इंदौर अखेर ब्रिटिशांकडे..
यशवंतराव होळकराने मोगल बादशाह शाह अलम द्वितीय याची ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि लढाईही केली. परंतु हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. पुढे शाह आलमने यशवंतरावाला ‘महाराजाधिराज राजराजेश्वर अलीजा बहादूर’ अशी पदवी देऊन त्याचा सन्मान केला. यशवंतरावाची प्रबळ इच्छाशक्ती, सनिकी शक्ती, संघटनकौशल्य यामुळे ब्रिटिश सेनाधिकारी काही प्रमाणात धास्तावलेले होते. काळ, वेळ ओळखून ब्रिटिशांनीच यशवंतरावाकडे युद्धबंदीच्या तहाचा प्रस्ताव ठेवला. १८०५ साली राजघाट येथे या दोन्ही सत्तांमध्ये शांतता तह होऊन ब्रिटिशांनी होळकरांचा घेतलेला सर्व प्रदेश यशवंतरावास परत करून जयपूर, कोटा, बुंदी आणि उदयपूर या राज्यांवरचे होळकरांचे स्वामित्व कबूल केले. १८११ साली यशवंतरावाचा मृत्यू झाला. यशवंतराव होळकर यांची कारकीर्द, त्यांचे हेतू, पेशव्यांशी त्यांचे संबंध याबाबत इतिहासकारांत अगदी विरोधी मतप्रवाह दिसून येतात.
डिसेंबर १८१७ मध्ये ब्रिटिश फौजेने इंदौरवर आक्रमण केले आणि महिदपूर येथे झालेल्या युद्धात होळकरांचा पराभव झाला. १८१८ साली होळकर आणि ब्रिटिशांमध्ये संरक्षण करार होऊन ब्रिटिशांची तनाती फौज इंदौर राज्यात राखली गेली. ब्रिटिशांनी महेश्वर येथील राजधानी इंदौर येथे हलविली. यापुढे इ.स. १८१८ ते १९४७ या काळात इंदौरचे राज्य ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली एक संस्थान बनून राहिले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity acetate rayon manufacturing
First published on: 12-03-2015 at 03:09 IST