डॉक्टर जेव्हा आरोग्याचा विचार करून मीठ न खायचा सल्ला देतात, तेव्हा त्या व्यक्तीला सगळं जेवण बेचव लागतं. स्वत:ची चव खारट असतानासुद्धा दुसऱ्या पदार्थाना चविष्ट करणारं मीठ एक महत्त्वपूर्ण पदार्थ आहे. पण याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात कच्चा माल म्हणून मिठाचा वापर यापेक्षाही अधिक आहे. धुण्याचा सोडा, क्लोरिन, कॉस्टिक सोडा, सोडिअम धातू, सोडिअम सल्फेट, कॅल्शिअम क्लोराइड, सोडिअम नायट्रेट, सोडिअम सल्फाइट, सोडिअम हायपोक्लोरेट इत्यादी  रसायनांच्या निर्मितीत मिठाचा वापर केला जातो.
एके काळी हायड्रोक्लोरिक आम्ल करण्यासाठीही मिठाचा कच्चा माल म्हणून वापर होई. पण आता मिठाच्या द्रावणाचं विद्युतविघटन प्रक्रियेनं कॉस्टिक सोडा आणि क्लोरिन ही औद्योगिक रसायनं मोठय़ा प्रमाणावर तयार होऊ लागली असल्यानं, या सहजी उपलब्ध असलेल्या क्लोरिन वायूपासूनच हायड्रोक्लोरिक आम्ल बनवलं जातं. मिठापासून तयार झालेली वा मिठाच्या संस्कारानंतर तयार झालेली रसायनं इतर अनेक रसायनांच्या निर्मितीत वापरली जातात. अमेरिकेसारख्या देशात मिठाच्या उत्पादनाचा फार मोठा जास्त भाग एकटय़ा रासायनिक उद्योगात वापरला जातो. आपल्याकडे हे प्रमाण त्यामानाने कमी आहे. आपल्या मिठाच्या उत्पादनापकी साधारणत: ५० टक्के भागच आपण रासायनिक उद्योगात वापरतो, काही परदेशी निर्यात करतो, तर साधारण ३० टक्के मीठ आपण ‘घरगुती’ कामांसाठी वापरतो.
भारताला लाभलेला मोठा समुद्रकिनारा आणि इथलं उष्ण आणि कोरडं हवामान, यामुळे भारतात तयार होणाऱ्या मिठापकी ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त मीठ समुद्राच्या पाण्यापासून बनतं, उरलेलं देशातल्या अंतर्भागात असलेली खाऱ्या पाण्याची सरोवरं आणि पंजाब, हिमाचल या राज्यातल्या खाणींमधून मिळतं. हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी खाऱ्या पाण्याची जिवंत झरेही आढळली आहेत. या खारट पाण्यापासून केवळ सूर्यप्रकाशाच्या साह्य़ानं भारतात मीठ बनवलं जातं.
मीठ म्हणजे केवळ जेवायच्या ताटात प्रथम वाढायचा पदार्थ नसून त्याचं औद्योगिक अधिराज्य लक्षणीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा: रुग्णाशी संवाद करायला लावणारे पुस्तक
हिंदी चित्रपटातील ‘अशोककुमार’ या अभिनेत्याचं राहून राहून कौतुक वाटतं, कारण चित्रपट बोलू लागल्यावर ‘अछूत कन्या’मधील नायकापासून ते नायक-नायिकांचा मोठा भाऊ, वडील आणि आजोबापर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी यथार्थपणे सादर केल्या. बदलत्या काळानुसार स्वत:च्या शरीरयष्टीतील बदल सामावून घेत प्रेक्षकांच्या नाडीवर बोट ठेवून स्वत:ची प्रतिमा ते बदलत गेले. केवळ प्रतिमा नाही, तर त्या सिनेमातल्या त्यांच्या भूमिकेचा हेतू समजून घेत त्यांनी स्वत:च्या अभिनयात परिवर्तन घडवलं.
‘द डॉक्टर्स कम्युनिकेशन हॅण्डबुक’ वाचताना त्यांची आठवण आली, कारण या पुस्तकाचा मूळ हेतू डॉक्टरांची बदललेली प्रतिमा. भूमिका आणि कार्य यांच्यामध्ये कालानुरूप कसा बदल झाला? त्या बदलाला समर्थपणे सामोरं जाण्यासाठी, रुग्णाशी, त्याच्या हितचिंतक-नातेवाईकांशी संवाद करण्यासाठी कशाप्रकारे मानसिक तयारी करावी? कोणती संवादकौशल्ये अजमावावी यावर विचार करायला लावणारं, मार्गदर्शन करणारं आणि काही महत्त्वाच्या ‘टिप्स’ देणारं हे हॅण्डबुक आहे.
हे पाठय़पुस्तक नाही तर संवाद कौशल्याचे बारकावे आणि खुब्या समजावणारं एका इंग्लिश फॅमिली डॉक्टरनं लिहिलेलं पुस्तक आहे. त्यातले काही संदर्भ म्हणजे रिफरल प्रॅक्टिस आणि दस्तावेजाची मांडणी कशी करावी याची माहिती ‘आपली’ वाटणार नाही. पण ते दुर्लक्षणीय आहे.
पूर्वीच्या डॉक्टरांकडे (फॅमिली फिजिशिअन) इतरांना ठाऊक नसलेलं ज्ञान,सहज उपलब्ध नसणारी माहिती असे. डॉक्टर हा फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर होता. इंटरनेटच्या सुकाळानंतर मेडिकल निदान, माहिती आणि रोगांच्या प्रकाराचे स्वरूप, इतर रुग्णांचे अनुभव या गोष्टी खुलेआम उपलब्ध झाल्या. त्यामुळे घसा दुखतोय असं गुगललं तरी हजारो साइटवरून योग्य अयोग्य माहिती बदाबदा अंगावर पडते. ती गाठीशी घेऊन किंवा त्याचे प्रिंट घेऊन आज निम्नमध्यमवर्गीय रुग्ण डॉक्टरसमोर उभा राहतो. ‘मला काय झालंय? बरा होईन ना?’ असं घाबऱ्याघुबऱ्या आवाजात विचारत नाही. एखाद्या औषधाचं प्रिस्क्रिप्शन लिहिलं तर त्याची माहिती तिथल्या तिथे मोबाइलवर उद्धृत करून शंका (कुशंका अधिक) विचारतो.
ही बदललेली वस्तुस्थिती आहे. ‘तुमच्यापेक्षा मला जास्त ठाऊक आहे!’ अशा आवेशात डॉक्टरांशी बोलणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच आहे. एका अर्थानं, डॉक्टरी पेशातल्या लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन करायच्या भ्रष्टाचाराला याने आळा बसेल. पण अशा रुग्णांशी बोलायचं कसं? हा मोठा प्रश्न डॉक्टरना पडतो. एकूणच रुग्णांच्या या बदललेल्या माहिती पातळीप्रमाणे त्यांच्याशी कसा संवाद करावा? याचं मार्गदर्शन हे पुस्तक करतं. ज्या डॉक्टरांना हे जमलं ते ‘अशोककुमार’ ठरतात. डॉक्टरशी होणारा संवाद हा केवळ शंकाचं निराकरण करणारा नसतो, तर रुग्णाशी मानवी नाते-संबंध जोडणारा सेतू असतो.
डॉक्टरकडे येणारा रुग्ण केवळ शारीरिक अडचणी आणि तक्रारीकरिता येत नसतो. त्याला आपलं दु:ख हलकं करण्यासाठी अवकाश हवा असतो. अनेकदा, रुग्ण स्पेशालिस्टकडे अगदी न सांगता येण्यासारख्या तक्रारी घेऊन येतो. अशा वेळी संवादामार्फत रुग्णाची अडचण अचूकपणे शोधणं महत्त्वाचं असतं. ‘गेले द्यायचे राहून’ याच्या तालावर डॉक्टर आणि रुग्णामधील संवाद ‘गेले सांगायचे राहून’ किंवा ‘गेले विचारायचे राहून’ असं होऊ शकतं. कदाचित निदानाच्या दृष्टीने रुग्णाला गौण वाटणारा मुद्दा अशा सखोल संवादातून स्पष्ट होतो आणि उपचार अचूकपणे करता येतात. हे कौशल्याचं काम असतं.
कोणत्याही मेडिकल कॉलेजात ‘कम्युनिकेशन’ हा विषय शिकवला जात नाही. त्या विषयाला फारसं महत्त्व दिलं जात नाही. रुग्ण हा गरजू आणि आपण ‘दाता’ अशा पदस्थळावरून संवाद केलेला दिसतो. नेमकी हीच ‘रिअ‍ॅलिटी’ बदलते आहे. हे गृहीत धरून डॉक्टरांनी स्वत:च्या स्टेथोस्कोपने रुग्णाचे ठोके ऐकण्याबरोबर मनीचे बोल कसे ऐकावे याची माहिती पुस्तकात मिळते. आणि गंमत म्हणजे डॉक्टरांबरोबर सर्वसामान्य वाचकालाही ते आवडेल.

प्रबोधन पर्व: लेखकांनी निष्ठा पाळल्या पाहिजेत
‘‘जनतेचे राजकीय मार्गदर्शन करण्याचे बाबतीत तिला स्फूर्ती देणे, तिला संघटित करून आशा देणे व दिशा दाखविणे, या बाबतीत संतांची कविता अपेशी ठरली. तरीही दलित जनतेला तिने वाचा फोडली. एक मोठी सामाजिक गरज पुरविली. समाजातील घोर मूलभूत अन्याय चव्हाटय़ावर आणले. तरीपण संतकवींनी जुलमी राज्यकर्त्यांना राजकीयदृष्टय़ा उलथून पाडायची मागणी कधीही मांडली नाही. मात्र अवताराच्या मागणीत ती फक्त सूचित केली. संतकवींनी जनतेला संघटित करून कार्यप्रवण केले नाही असा आरोप करायला वाव सापडतो तो याचमुळे.. पोवाडे वाङ्मय जुन्या समाजकंटकांचा उच्छेद व संतकवींनी मागणी केलेल्या नव्या सुधारणांची उभारणी दर्शविते. पोवाडे वाङ्मय हे अगोदरच्या संतवाङ्मयाची परंपरा तर्कशुद्धरीतीने पुढे चालविते. हे वाङ्मय निर्माण होऊ शकले याचे कारण या वाङ्मयाचे लेखक जनतेच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या वर्गातून निर्माण झालेले होते; हे लेखक जनतेचे जीवन जगत होते; जनतेबद्दल त्यांना जिव्हाळा वाटत होता; या लेखकांच्या भावना अत्यंत प्रखर होत्या; त्यांची अतिशय तीव्र राजकीय जाणीव अशा प्रकारचे स्फूर्तिदायक वाङ्मय निर्माण करायला त्यांना भाग पाडीत होती.’’
 कॉ. श्रीपाद अमृत डांगे संतवाङ्मयाची मर्यादा सांगत साहित्यिकांनी बदलत्या समाजाशी स्वत:ला जोडून घ्यायला पाहिजे हे सांगताना लिहितात-
 ‘‘जिथे जनतेचा लोंढा आहे, जिथे संघर्ष चालू आहे, त्याच्या आसपास तुम्ही (लेखकांनी) असायला पाहिजे. गंगेला पूर आला, आणि तुम्ही कन्याकुमारीला असलात तर त्याचं वर्णन कसं साधेल? आमचं म्हणणं एवढंच की हा क्रांतीचा ओघ वहात आहे त्याच्या जवळपास रहा, जमल्यास त्यात भाग घ्या. नवे वर्ग जन्माला आले आहेत ते समजून घ्या. म्हणजे तुमच्या हातून कला निर्माण होईल. संतवाङ्मय दिसतं धर्मनिष्ठ पण होतं समाजनिष्ठ. तसेच आजच्या युगात लेखकाने चार निष्ठा पाळल्या पाहिजेत. राष्ट्रनिष्ठा, जनतानिष्ठा, वस्तुनिष्ठा आणि आत्मनिष्ठा, या त्या निष्ठा होत.’’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity industrial use of salt
First published on: 12-07-2014 at 03:51 IST