रेशीम किडय़ांच्या विविध जाती आहेत. खाद्यासाठी त्या वेगवेगळ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. त्यांनी निर्माण केलेल्या रेशीमच्या धाग्यांमध्ये फरक आढळतो. त्यानुसार रेशीमचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात.           १. मलबेरी सिल्क २. नॉन मलबेरी सिल्क.
  तुती म्हणजेच मलबेरी हे खाद्य म्हणून वापरून रेशीम किडे जे रेशीम तयार करतात, त्याला मलबेरी सिल्क म्हणतात. हे रेशीम उच्च दर्जाचे मानले जाते. जगामध्ये तयार होणाऱ्या रेशीमपकी ९० टक्के रेशीम हे मलबेरी सिल्क असते.
  नॉन मलबेरी सिल्कला ‘वन्य सिल्क’ असेही म्हणतात. हे मुख्यत्वे चार प्रकारचे असते. ‘ट्रॉपिकल टसर’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे असान आणि अर्जुन या वृक्षांच्या पानांवर जगतात. ‘ओक टसर’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे ओक वृक्षाच्या पानांवर जगतात. ‘इरी सिल्क’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे एरंडच्या पानांवर जगतात. तर ‘मुगा सिल्क’ हे रेशीम तयार करणारे किडे सॉर्न आणि सुएलु या सुगंधी वनस्पतींच्या पानांवर जगतात.
मलबेरी सिल्क खालोखाल मुगा सिल्कला मागणी असून त्याचे धागे सोनेरी रंगाचे असतात. रेशीम कोषांपासून ‘रॉ सिल्क’ तयार करताना म्हणजेच रीिलग करताना प्रथम कोष उकळत्या पाण्यात टाकले जातात. त्यामुळे आतील ‘प्यूपा’ या अवस्थेत असणारा रेशीम किडा मरतो. म्हणजेच असंख्य रेशीम किडय़ांची हत्या करून रेशीम तयार केले जाते. त्यामुळे अिहसावादी लोक हे रेशीम वापरत नाहीत. यातूनच ‘पीस सिल्क’ या संकल्पनेचा उदय झाला. हे रेशीम दक्षिण भारतातच तयार होते. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे रीलिंग यंत्र तयार केले आहे.
 रेशीम कापडाचा पोत, चकाकी, देखणेपण यांमुळे त्यांस ‘वस्त्रांची राणी’ असे संबोधतात. रेशीम उत्पादनात जगात चीन पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत दुसऱ्या क्रमांकावर. भारत एकमेव देश आहे जिथे पाचही प्रकारची रेशीम शेती होते. रेशीम वस्त्रांची लोकप्रियता, विविध उद्योगांतील रेशीमची मागणी, सर्व प्रकारच्या रेशीम शेतीस अनुकूल वातावरण, रोजगारनिर्मिती क्षमता, कमी भांडवल गुंतवणूक लक्षात घेता भारतामध्ये अजूनही रेशीम शेती विस्तारास वाव आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..  लढा – अंक दुसरा-भाग ३ (प्रशासन)
शरद काळे या अगदीच अनोळखी आयुक्तांच्या भेटीनंतर मी संभ्रमातच होतो. हा माणूस काय करेल याचा थांग लागेना. मग माझ्या गुप्तहेरांच्या बातम्या येऊ लागल्या. या प्रकरणाची छाननी झाली आणि मग एक फर्मान निघाले. त्यात हिंदुजांना असे कळवण्यात आले की ‘जवळ जवळ दीड- दोन वर्षे हा भूखंड उद्यान म्हणून विकसित करण्यात आपल्याकडून काहीच कारवाई न झाल्याने हा भूखंड आता महानगरपालिका तुमच्याकडून परत घेत आहे.’ नोकरशहाने कसे वागावे आणि त्यामागचे कारण कसे सयुक्तिक असावे याचे ते उत्तम उदाहरण होते. अर्थात या फर्मानाला कोर्टात आव्हान देण्यात आले. मी मनात म्हटले ‘थोडा तरी सुटलो.’ पण कोर्टात काय चालते याचे दर्शन लवकरच घडायचे होते. त्या काळचा माझा एक जवळचा सहकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला ‘हा मामला कोर्टात महानगरपालिकेकडून लढवला जाईलच याची मला शाश्वती नाही. आपण महानगरपालिकेच्या वकिलाकडे जाऊया. वकिलांना प्रेरित करावे लागते. काही वकील काही मामले लढवतच नाहीत.’ ही माहिती मला अगदीच नवी होती. तेव्हा मी एका रविवारी या वकिलाच्या पार्शी कॉलनीमधल्या घरी गेलो आणि एक चमत्कार घडला.
हा वकील माझा जूना  विलिंग्डन कॉलेजमधला मित्र निघाला. मला पाहताच तो म्हणाला अरे, रविन तू या मॅटरध्ये आहेस हे मला माहीतच नव्हते. मला वाटले होते केवळ  Routine appearance आहे. मग त्याने कागद काढले. त्यात लक्ष घातले आणि म्हणाला ‘तू बिनधास्त रहा. मी बघून घेतो’ आणि तो मामला त्याने महानगरपालिकेच्या बाजूने जिंकला. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तिथे हिंदुजांनी हा भूखंड महानगरपालिकेच्या दुसऱ्या कोणाला तरी (म्हणजे मला) द्यायचा आहे असा आरोप केला. मग या प्रकरणाला शेवटचे  निर्णायक वळण लागले. ज्या हिंदुजांच्या धर्मादाय संस्थेमार्फत हे उद्यान विकसित केले जाणार होते त्या धर्मादाय संस्थेच्या संविधानात उद्याने विकसित करणे हे उद्दिष्टच अंतर्भूत नाही ,हे तोवर शरद काळे या पुणेरी चाणाक्ष चाणक्याने शोधून काढले होते. तसे न्यायालयात सांगण्यात आले आणि न्यायालयाचे काम सोपे झाले.  युद्ध नावाची गोष्ट नेहमी तर नाहीच, पण क्वचितच हिंसात्मक असते आणि बहुतांशी युद्धे ही तलवारीने नव्हे, डोक्याने जिंकली जातात याच हे एक उत्तम उदाहरण होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची मेख पुढेच मारली गेली. शरद काळे यांनी असे प्रतिज्ञापत्र सादर केले की ‘हा भूखंड महानगरपालिकाच विकसित करेल, कोणालाही विकसित करण्यास देणार नाही.’ या प्रतिज्ञापत्रावरून पुढे आणखी महाभारत होणार होते. त्याबद्दल लवकरच.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस    हृद्रोग : भाग ६
एकदा एक उंच गृहस्थ अनेक ‘हार्टब्लॉक’ आहेतच, अशा तक्रारी घेऊन आले. ‘मला अमेरिकेत मुलाकडे जायचे आहे, पण सगळे हार्टब्लॉक सुधारल्याशिवाय येऊ नका, असा त्याचा निरोप आहे. तुम्ही हे ब्लॉक घालवू शकाल म्हणून आलो.’ थोडा विचार केला. खूप उंच म्हणजे अस्थिसार. अस्थिसार उंच माणसाच्या शरीरातील रक्ताभिसरणाला काही जादा उंच जागा मिळते असा माझा कॉमनसेन्सचा विश्वासूदावा!
 या गृहस्थांकरिता अमेरिकेतून चॉकलेटचे बारच्या बार यायचे व हे गृहस्थ प्रमाणाबाहेर चॉकलेट खायचे. हे सर्व  रक्तवाहिन्यात ब्लॉक करून बसले. माझी नेहमीची रक्तातील चरबीची औषधे आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ, चंद्रप्रभा, अम्लपित्तवटी, रसायनपूर्ण सोबत अर्जुनारिष्ट सुरू केले.  
सहा महिन्यात सर्व हार्टब्लॉक दूर झाले. ते गृहस्थ नंतर अमेरिकेत जाऊन आले. ही सर्व अर्जुनसाल व अन्य औषधांची कृपा. आपण निमित्त मात्र!
अर्जुनवापराचा स्वानुभव सांगण्याचा मोह मला आवरत नाही. पस्तीस वर्षांपूर्वी मी सायंकाळी एका र्अजट कामाकरिता जायला निघालो. सायकलवर जायचे होते. एकदम छातीत दुखू लागले. त्यावेळेस आमची रुग्णालयाची इमारत तयार व्हायची होती. कारखान्याच्या शेजारील रिकाम्या प्लॉटवरील दगडावर बसलो. माझे गुरुजी वैद्य पराडकरांना अर्जुनारिष्टाची लहान बाटली आणावयास सांगितली. पाणी न मिसळता अर्धी बाटली १०० मि.ली. चार चमच्यांऐवजी अठ्ठावीस चमचे तोंडाला लावली. दहा मिनिटात छातीत डाव्या बाजूचा दुखावा थांबला. पाच मिनिटांनंतर मी माझ्या कामाकरिता सायकलवर स्वार झालो. पुन्हा कधीच छातीत दुखले नाही.
काही दिवसांनी अधिक ज्ञानी, डॉक्टरबंधूंनी ई.सी.जी. सारख्या तपासण्यांचा सल्ला दिला. तपासणीविना अजून हृदय सुरक्षित आहे. ही सर्व अर्जुनारिष्टची कृपा!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १३ जुलै
१९०३> कवयित्री, अनुवादक विमल पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्म. साहित्यिक पु. य. देशपांडे यांच्या पत्नी. या दोघांचा एकत्रित काव्यसंग्रह ‘निर्माल्यमाला’. ‘घर-आंगण’ हा त्यांचा सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील स्फूट लेखांचा संग्रह. जे. कृष्णमूर्ती यांच्या पुस्तकाचा ‘जीवनभाष्ये’ या नावाने अनुवाद
२०००> कवयित्री, कथाकार, ललित लेखिका इंदिरा नारायण संत यांचे निधन. माहेरचे आडनाव दीक्षित. पतीच्या सहभागाने ‘सहवास’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध. त्यानंतर श्यामली, कदली, चैतू इ. कथासंग्रह प्रकाशित. तथापि, ‘शेला’ या काव्यसंग्रहापासून ‘इंदिरा’ हे नाव मराठी साहित्य विश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ठरले. विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री असा नावलौकिक. याशिवाय रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इ. काव्यसंग्रह. ‘गर्भरेशीम’ला साहित्य अकादमीचे पारितोषिक.
२००३> कवी, कादंबरीकार आणि विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखक विद्याधर गंगाराम भागवत यांचे निधन. ‘सागरवेला’ हे काव्य, ‘सागर तू अद्युक्त आहेस’, ‘योगी’ आणि बालकवींच्या चरित्रावर ‘ऐल तटावर पैल तटावर’ या कादंबऱ्या, तसेच  ललित निबंधाचे संकलन प्रसिद्ध.
संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity quality of silk
First published on: 13-07-2013 at 12:05 IST