दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. आम्ही काही मैत्रिणींनी या निमित्ताने कर्नाळा किल्ल्यावर खास महिलांसाठीची दुर्गभ्रमंतीची कल्पना मांडली. पाल्र्यातील ‘जनसेवा समिती’ने आमच्या या कल्पनेला मूर्त रूप देत पुढाकार घेतला आणि आम्ही कर्नाळा मोहिमेची घोषणा केली. पाहता पाहता नोंदणी होऊ लागली आणि २ ऑगस्टच्या त्या मैत्रिदिनी आम्ही ३० मैत्रिणी कर्नाळा मोहिमेवर निघालो.आमच्या या गटात अगदी १४ वर्षांच्या मुलीपासून ते ५५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेपर्यंत साऱ्या जणी होत्या. यातील काहींच्या आयुष्यात या ट्रेकिंगची पावले पडली होती, तर काहींच्या बाबतीत ‘दुरून डोंगर साजरे’ असेच आजवर होते. पण उत्साह आणि नव्या ऊर्मीने आम्ही ‘मिळून साऱ्याजणी’ या गडाच्या पायथ्याशी दाखल झालो.चढाईस सुरुवात केली. तीव्र चढावाने सगळय़ांचीच दमछाक होत होती. पण एकमेकींना धीर देत, आम्ही गडाचा माथा गाठला. कर्णाईदेवीचे दर्शन घेऊन उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात आम्ही प्रवेश केला. शिवस्पर्शाने पावन झालेल्या त्या ऐतिहासिक गडपुरुषाच्या दर्शनाने आमचे सगळय़ांचेच मन उचंबळून आले. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही गडदर्शनाला सुरुवात केली. गडाचे भौगोलिक स्थान, त्याचे शिवकाळातील ऐतिहासिक महत्त्व, नंतरच्या काळात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आलेला संबंध असा सारा इतिहास आम्ही समजून घेतला. गडाचे दरवाजे, बुरुज, माच्या, पाण्याची टाकी असे अवशेष पाहिले. गडदर्शनानंतर आम्ही सर्वानी सहभोजन केले आणि कर्नाळय़ाच्या सुळक्याच्या पोटातील खोदीव टाक्यातले थंडगार अमृत पिऊन उतरायला सुरुवात केली. संध्याकाळची उन्हे अभयारण्यावर आता हळूहळू गडद होत होती. कर्नाळय़ाचा सुळका मात्र त्याच्या जागी ताठ मानेने उभा होता. आम्हाला, त्याच्या लेकींना, सह्याद्रीच्या कन्यांना पुन:पुन्हा गडदर्शनाचे निमंत्रण देत खुणावत होता! आम्ही त्याचा जड अंत:कारणाने निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughter of sahyadri
First published on: 03-09-2015 at 03:28 IST