पचन प्रक्रियेत विकरं खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अन्नाचा घास आपण तोंडात घेतो अगदी तेव्हापासून या विकरांचं काम सुरू होतं. अन्न जेव्हा चावलं जातं तेव्हा तोंडातली लाळ या अन्नपदार्थामध्ये मिसळते. लाळेमध्ये टायलिन किंवा अमायलेज नावाचं विकर असतं. हे विकर अन्नातल्या काही कबरेदकांचं रूपांतर शर्करेत घडवून आणतं. त्यामुळेच पोळी, भाकरी किंवा ब्रेड काहीही न लावता नुसतं चावत, चघळत राहिलं तर त्याची चव गोडसर लागते. यानंतर अन्न जेव्हा जठरात पोहोचतं तेव्हा त्यात जठरातून स्रवणारा जाठररस मिसळतो. या जाठररसामध्ये असणाऱ्या पेप्सिन नावाच्या विकराच्या मदतीने प्रथिनांचं पचन घडवून आणलं जातं.
पेप्सिनखेरीज जाठररसात आणखी एक महत्वाचं रसायन असतं, ते म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल! १.५ ते २.० इतका सामू असलेलं हे तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल पेप्सिनच्या क्रियेसाठी लागणारी आम्लता उपलब्ध करून देतं. इतकंच नाही तर अन्नाद्वारे शरीरात शिरू पाहणारे बरेचसे रोगजंतू या तीव्र आम्लामुळे नष्ट होतात. आपण जे तंतुमय अन्न खातो ते मऊ करून पचनाला सोपं करण्याचं काम हे आम्ल करतं. कधी कधी या आम्लाचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. यालाच आपण ‘आम्लपित्त’ किंवा ‘अ‍ॅसिडीटी’ म्हणतो.
लहान आतडय़ांमध्ये यकृतातला पित्तरस, स्वादुिपडातला स्वादुरस आणि लहान आतडय़ात स्रवणारी वेगवेगळी विकरं यांच्या एकत्रित परिणामाने अन्नातल्या वेगवेगळ्या घटकांचं पचन घडून येतं. पेप्सिनच्या क्रियेसाठी जशी आम्लता आवश्यक असते तशीच लहान आतडय़ात स्रवणारी आणि स्वादुरसातली सगळी विकरं अल्कली माध्यमातच अभिक्रिया घडवून आणू शकतात. यकृतातून स्रवणारा पित्तरस अन्नाला अल्कलियुक्त बनवतो आणि मोठय़ा मेदकणांचे लहान कणांमध्ये रूपांतर करतो. त्यामुळे विकरांची क्रिया जलद होते.        
आपल्या पचनेद्रियांच्या आतील भागावर एक श्लेष्मल आवरण असतं. हे आवरण जर नसतं तर शरीरात स्रवणाऱ्या तीव्र आम्लाचा आणि इतर विकरांचा परिणाम जसा खाल्लेल्या अन्नावर होऊन त्याचं पचन होतं त्याप्रमाणेच पचनेंद्रियांचही पचन झालं असतं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रबोधन पर्व: हुकूमशाहीच्या आरोपांची चिंता नको..
‘‘आपण सर्वजण संघटना करावयास निघालो आहोत, फूट पाडायला नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. आम्ही कधी फूट पडू देणार नाही. संघटनेचेच कार्य सतत सुरू राहील असा आपल्यातील प्रत्येकाने विचार करून आपल्या भोवताली जे आपले बांधव आहेत त्यांच्यातही हाच विचार रूजवावा. छोटय़ा छोटय़ा गोष्टीवरून कार्यकर्त्यांमध्ये आपापसात मतभेद होतात आणि त्यामुळे ते नाराजही असतात.. असे प्रसंग वारंवार येणार नाहीत या दृष्टीने आम्हाला विचार केला पाहिजे. लहान लहान बाबी आपल्या मनाला इतक्या का लागाव्यात हेच माझ्या लक्षात येत नाही. वास्तविक असे होऊ  देऊ  नये. आपसात थोडेदेखील मनोमालिन्य येऊ  देता कामा नये. प्रत्येक बाबतीत संघाचाच विचार असला पाहिजे. एखाद्या बाबतीत जर आपल्या सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आपल्यापुढे आला तर ‘हा निर्णय कसा काय घेतला गेला, असा निर्णय घेतला जाणार नाही असे आम्हाला वाटत होते’ – असा विचार कदापि मनात येऊ  देऊ  नये.’’
गोळवलकर गुरुजी रा. स्व. संघाविषयी (श्री गुरुजी समग्र दर्शन, खंड-दोन) म्हणतात – ‘‘विद्यार्थी, राजकारण, कामगार आदी निरनिराळ्या कार्यक्षेत्रांत आपले कार्यकर्ते काम करीत आहेत. या कार्याची रचना, घटना, नियम, व्यवहार वगैरे भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. तरीही आपला स्वयंसेवक तेथे आपल्या संघटनेची जी धारणा आहे त्या धारणेसह जातो आणि ती धारणा तेथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो.. असे करताना जर लोक असे म्हणतील की, ही मंडळी या ठिकाणीसुद्धा आपल्या संघाची हुकूमशाहीच चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.. जे लोक असे म्हणतात त्यांना हुकूमशाही ही काय चीज असते हे माहीत नाही. आपल्या कार्यात हुकूमशाहीचा लवलेशही नाही. येथे तर जास्तीत जास्त प्रमाणात सर्वाच्या सामूहिक इच्छेनेच कार्य होते, यालाच हुकूमशाही समजून लोक वाटेल त्या प्रकारचे आरोप करीत असतील तर ते त्यांना करू द्या. त्याची चिंता न करता राष्ट्रसंघटनेचे सूत्र आपल्या निरनिराळ्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील असले पाहिजे.’’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digestive system of human
First published on: 15-11-2014 at 12:33 IST