– डॉ. रोहिणी कुळकर्णी
‘डीएनए’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणूची ओळख पहिल्यांदा १८६०च्या दशकात जोहान फ्रेडरिक मिशर नावाच्या स्विस रसायनशास्त्रज्ञाने करून दिली होती. पांढऱ्या रक्तपेशी कशापासून निर्माण होतात; हे अधिक समजून घेण्यासाठी केलेल्या संशोधनात त्याला सापडलेल्या रहस्यमय धाग्याला त्याने ‘न्यूक्लिन’ असे नाव दिले. १८८१मध्ये अल्ब्रेक्ट कोसेलने न्यूक्लिनला ‘न्यूक्लिक अॅसिड’ म्हणून ओळखले आणि त्याचे सध्याचे रासायनिक नाव ‘डीऑक्सिरिबोन्यूक्लिक अॅसिड’ (डीएनए) दिले. त्यांनी डीएनए आणि आरएनएचे बिल्डिंग ब्लॉक असलेले पाच न्यूक्लियोटाइड बेसदेखील वेगळे केले: एडेनिन (ए), सायटोसिन (सी), ग्वानिन (जी), थायमिन (टी) आणि युरेसिल (यू). १९१० साली ते नोबेल परितोषिकाचे मानकरी ठरले. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात, जर्मनीतील शरीरशास्त्रज्ञ वॉल्थर फ्लेमिंग यांनी पेशींच्या केंद्रकात एक तंतुमय रचना शोधून काढली. त्यांनी या रचनेला ‘क्रोमॅटिन’ असे नाव दिले.
आता प्रश्न होता तो या तंतुमय रचनेचा. या संबंधात अमेरिकन आण्विक शास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ आनुवंशशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ जेम्स लुई वॉटसन आणि आण्विक जीवशास्त्रज्ञ, जैवभौतिकशास्त्रज्ञ आणि चेताविज्ञानशास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक हे केंब्रिज येथील ‘कॅव्हेन्डिश’ प्रयोगशाळेत या तंतूच्या रचनेचा शोध घेत होते. रोझालिंड फ्रँकलिन यांच्या एक्स-रे डीफ्रॅक्शनच्या संशोधनातील ‘फोटो- ५१’ आणि इटलीमधील एका संशोधन परिषदेत एक्स-रे डीफ्रॅक्शनबद्दल मॉरिस विल्किन्सन यांची मते या आधारे वॉटसन आणि क्रिक यांनी डीएनएच्या आकाराची कल्पना साकारली. या दोघांनी १९५३ मध्ये डीएनएच्या दुहेरी सर्पिल आकाराच्या अक्षाभोवती गुंडाळलेल्या रचनेचा प्रस्ताव मांडणारा संशोधनपर लेख नेचर या संशोधन पत्रिकेत लिहिला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण कार्याबद्दल वॉटसन, क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांना न्यूक्लिक अॅसिडच्या रचनेबद्दल आणि सजीवांच्या शरीरामध्ये असलेल्या जनुकांतील माहितीच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत होणाऱ्या संक्रमणाच्या अभ्यासामध्ये असलेले त्याचे महत्त्व यासंबंधीच्या शोधासाठी १९६२ चे शरीर विज्ञान किंवा वैद्याक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
रोझालिंड फ्रँकलिन यांचे निधन झाले आणि त्या या परितोषिकापासून वंचित राहिल्या. जेम्स वॉटसन यांनी ‘मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ द जीन’ आणि ‘डबल हेलिक्स’ ही पुस्तके लिहिली. १९८८ ते १९९२ या दरम्यान वॉटसन त्यांनी मानवी जीनोम प्रकल्प स्थापन करण्यास मदत केली. हा प्रकल्प २००३ मध्ये पूर्ण झाला. ते सध्या ९७ वर्षांचे आहेत. फ्रांसिस क्रिक यांचे २८ जुलै २००४ या दिवशी निधन झाले.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org