कुतूहल : अवलिया संगणकगणिती

काळाच्या पुढे असणाऱ्या दायेस्त्रा यांनी त्यांच्या लग्नाच्या नोंदणी अर्जावर प्रोग्रामर हा व्यवसाय लिहिला.

संगणक क्षेत्राचा पाया भक्कम करणारे  ई. डब्ल्यू. दायेस्त्रा (जन्म : ११ मे १९३०) हे डच गणिती होते. त्यांनी १९५९ साली ‘कम्युनिकेशन विथ अ‍ॅन ऑटोमेटिक कॉम्प्युटर’ या प्रबंधावर पीएच.डी. पदवी मिळवली. त्यात त्यांनी हॉलंडमध्ये निर्मित प्रथम संगणकासाठी ‘असेम्ब्ली’ भाषा विकसित केली. शैक्षणिक क्षेत्रात संगणकाच्या भविष्याबद्दल त्या काळी प्रश्नचिन्ह असतानादेखील दायेस्त्रा यांनी अ‍ॅमस्टरडॅम येथील गणिती केंद्रात पहिले प्रोग्रामर म्हणून पद स्वीकारले. काळाच्या पुढे असणाऱ्या दायेस्त्रा यांनी त्यांच्या लग्नाच्या नोंदणी अर्जावर प्रोग्रामर हा व्यवसाय लिहिला. तेव्हा असा व्यवसाय अस्तित्वात नाही हा शेरा मारून त्यांचा अर्ज अमान्य झाला!

अछॅडछ ६० या संगणक भाषेचा विकास, मल्टी-प्रोग्रामिंग सिस्टीम, डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम्स, सिक्वेन्शिअल तसेच कॉन्करंट प्रोग्रामिंग अशा अनेक मूलभूत संकल्पनांचे दायेस्त्रा जनक होते. त्यांच्या मते आज्ञावली अर्थात प्रोग्राम हा संगणकाला सूचना देणारा नसून संगणकाचे काम हे आपण लिहिलेला प्रोग्राम कार्यान्वित करणे, असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. म्हणजेच प्रोग्राम हा गणिती सूत्रासमान लिहून औपचारिक पद्धतीने तपासावा. थोडक्यात, प्रोग्रामच्या सत्यतेची आणि अचूकतेची सिद्धता दिली जाणे, प्रोग्राम सरळ तसेच प्रभावी असणे या तत्त्वांची कास त्यांनी त्यांच्या कार्यात सतत धरली.

प्रोग्रामिंग ही उपयोजित गणिताची शाखा मानली जावी असा त्यांचा प्रयत्न राहिला. दायेस्त्रा यांच्या मूलभूत वैचारिक योगदानामुळे संगणकशास्त्राला ‘विज्ञान’ अशी मान्यता मिळाली असे अनेकांचे मत आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणजे १९७२ साली त्यांना संगणक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मानले जाणारे ‘एसीएम टय़ुरिंग प्राइझ’ देण्यात आले. मात्र जगाला त्यांची ओळख आधीच झाली होती, त्याला कारण म्हणजे १९५९ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा शोधलेख. त्यात दायेस्त्रा यांनी प्रतलावर दिलेल्या रस्त्यांच्या जाळ्यातून कुठल्याही दोन स्थानांना जोडणारा इष्टतम मार्ग शोधण्याची ‘दायेस्त्रा पद्धत’ (अ‍ॅल्गोरिथम) दिली होती, जी आजही शिकवली जाते. ते त्याला २० मिनिटांचा चमत्कार म्हणत. कारण उपाहारगृहात बसून तेवढय़ा वेळात ती पद्धत त्यांनी तेथील नॅपकिनवर लिहिली होती!

अनेक पुस्तके आणि शोधलेखांशिवाय दायेस्त्रा यांनी गणित, संगणक आणि इतर विषयांवर एक हजार ३१८ लघुलेख लिहिले. हे लेख ते त्यांच्या वर्तुळातील लोकांना पाठवत. त्यातील बहुतांश लेख सुवाच्य अक्षरात हाताने लिहिले होते. (http://www.cs.utexas.edu/users/EWD/)  हे लेख वेगळाच आनंद देतात.  नवल म्हणजे जागतिक कीर्तीची जर्नल्सदेखील अपवाद करून दायेस्त्रा यांचे हस्तलिखित लेख प्रकाशनासाठी विचारात घेत. प्रगणन क्षेत्रात प्रेरणादायी आणि पथदर्शी कार्य केलेल्या या विलक्षण संगणकगणितीचे ६ ऑगस्ट २००२ रोजी कर्करोगाने देहावसान झाले.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dutch computer scientist edsger wybe dijkstra zws

Next Story
मनमोराचा पिसारा.. या फुलांच्या गंधकोशी
ताज्या बातम्या