वैशाली पेंडसे-कार्लेकर

‘मी तुम्हाला कालच ईमेल पाठवली.’ ‘हो? मला नाही मिळाला.’ ‘असं कसं, मिळाली असेल बघा.’ ‘नाही मिळाला अजून.’ अशा एखाद्या ईमेल किंवा ईपत्राच्या देवघेव संवादात समोरच्या व्यक्तीला ते ईपत्र नंतर मिळालं असेलही. पण यात ‘तो’ ईमेल की ‘ती’ ईमेल म्हणायचं, की मराठीतल्या ‘पत्र’ या शब्दाच्या लिंगाप्रमाणे ‘ते’ ईमेल म्हणायचं?

मो. वि. भाटवडेकर यांच्या ‘राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोशा’मध्ये हा शब्द पत्राच्या संदर्भाने नपुंसकलिंगी दिला आहे. आज मात्र त्याचं स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी रूपच रूढ झाल्यामुळे हा शब्द बाग, ढेकर याप्रमाणे उभयिलगी मानायला हरकत नाही.

मराठी पडदा आठवून ‘तो’ स्क्रीन म्हणायला जावं, तर नवीन पिढी ‘ती’ स्क्रीन असं ऐकवून आपल्याला सुधारते. ‘तो’ साईज की ‘ती’ साईज? ‘ते’ गिफ्ट की ‘ती’ गिफ्ट? ‘ती’ वीज असली तरी लाईट मात्र ‘तो’ की ‘ती’? मराठीत वापरल्या जाणाऱ्या अशा अनेक इंग्रजी शब्दांच्या व्याकरणिक लिंगाबाबत वैविध्य आढळतं. मुळातच निर्जीव वस्तूंच्या नामांचं लिंग ठरवणं, ही गोष्ट आजवर मराठीत रूढीच्या आधारावर चालत आली आहे. शक्यतो त्याच अर्थाच्या मराठी शब्दानुसार नवीन शब्दाचं लिंग ठरवायचं, अशी पद्धत असली तरी त्यालाही खूप अपवाद आहेतच. त्यामुळे प्रत्यक्ष वापर कसा होतो यावरच लिंग ठरवणं हा मार्ग उरतो.

लिंगाप्रमाणेच भाषेत आलेल्या इंग्रजी शब्दांची अनेकवचनी रूपं कोणती, याबाबतही प्रश्न पडतो. पूर्वी मराठीत आलेल्या इंग्रजी शब्दांची बँक- बँका, बॅग- बॅगा, गॅलरी- गॅलऱ्या अशी इंग्रजीपेक्षा स्वतंत्र अशी अनेकवचनं आपण केली आहेत. मात्र, आजच्या बोलीभाषेत इंग्रजी शब्दांची अशी अनेकवचनं करण्याऐवजी त्यासाठी एकवचनी रूप किंवा मूळ भाषेतलं अनेकवचन तसंच वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. उदा. तिथे दिवसभरात अनेक मॅच/ मॅचेस खेळल्या गेल्या. मॅच हा शब्द स्त्रीलिंगी मानल्यास माळ- माळा किंवा भिंत- भिंती यानुसार ‘मॅचा’ किंवा ‘मॅची’ असं त्याचं अनेकवचन होईल. पण अर्थातच हे नियमानुसार घडवलेलं रूप प्रचलित होण्याची शक्यता कमी आहे. मराठीतल्या इंग्रजी शब्दांच्या लिंग, वचन, विभक्ती, सामान्यरूप अशा व्याकरणिक माहितीच्या नोंदी असलेल्या काही कोशांबद्दल वाचू पुढच्या लेखात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vaishali.karlekar1@gmail.com