निसर्ग म्हणजे सहा ऋतूंचे सहा सोहळे. पाऊस नेहमीच पडतो, पण गारांचा पाऊस मात्र कधी तरी पडतो. पावसाचे थेंब जेव्हा अतिशय थंड हवेमधून खाली भूपृष्ठाकडे येतात तेव्हा ते गोठून त्यांचा बर्फ तयार होतो. यालाच आपण गारा म्हणतो. थोडक्यात गोठलेले पावसाचे थेंब म्हणजेच गारा! या गारा सूक्ष्म, साबुदाण्याच्या आकारापासून बोरे, आवळे, लिंबाएवढय़ा आकाराच्याही असू शकतात. घराच्या पत्र्यावर पडताना त्यांच्या तडतड आवाजाने मजा वाटते, मात्र जेव्हा मोठमोठय़ा आवळे, लिंबाएवढय़ा गारा वेगाने पडू लागतात तेव्हा भीतीदायक वातावरण तयार होते. अशा गारांच्या माऱ्यामध्ये घरांचे, शेतीचे, वाहनांचे, पशुधनाचे मोठे नुकसान होते.

गारा पडणे ही जरी नैसर्गिक घटना असली तरी तिच्या वेगवेगळय़ा आकारांमागील कारणांचा विज्ञानाने वेध घेतला आहे. अतिथंड वातावरणामधून येणारा पाऊस त्यांच्या थेंबांमधून गारेमध्ये रूपांतरित होतो अर्थात हे शक्य असते जेव्हा वारा शांत असतो. काही वेळा पावसाचे थेंब जमिनीवर येऊन पडण्यापूर्वीच वरच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याकडून आकाशाच्या दिशेने उधळले जातात. हे उधळलेले पावसाचे थेंब वरच्या थंडगार हवेने गोठून त्यांचे बर्फाच्या कणांत रूपांतर होते. नंतर हे कण जमिनीच्या दिशेने खाली उतरू लागताच त्यांच्याभोवती जास्त पाणी जमा होते. वरच्या दिशेने वाहणारे वारे त्यांना पुन्हा वर फेकतात आणि ते अधिक थंड होऊन गोठतात आणि जुन्या हिमकणांवर साचत जातात. ही क्रिया वारंवार घडून गारेचे वजन व आकार मोठा होत जातो. एका मोठय़ा गारेचा आडवा छेद घेऊन तो भिंगाखाली पाहिल्यास तो आडवा कापलेल्या कांद्याप्रमाणे दिसेल. या आतील भागावरील वर्तुळे सहज मोजता येतात. या वर्तुळांच्या संख्येवरून भूपृष्ठाकडे येणाऱ्या गारेने खालून वर जाणाऱ्या वाऱ्याबरोबर किती वेळा प्रवास केला हे आपल्या लक्षात येते. यात एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे- वरच्या दिशेने वाहणारा वारा जितका जोरदार तेवढय़ा तयार होणाऱ्या गाराही आकाराने मोठय़ा आणि वजनदार असतात. मोठय़ा वजनदार गारा तयार होण्यासाठी वाऱ्याचा वेग ताशी अडीचशे कि.मी.पर्यंत असावा लागतो. काही वेळा ढगामधील पाण्याची वाफ एवढी थंड होते की ती पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात एकत्र होण्याऐवजी गोठते आणि तिचे बर्फाचे पापुद्रे बनून गार तयार होते. अशा गारा आकाराने लहानसर असतात आणि त्यांच्यामध्ये वर्तुळे आढळत नाहीत.

गारेचा आडवा छेद (‘विकिपीडिया’वरून)

– नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : http://www.mavipa.org