भारतीय द्वीपकल्पातील फार मोठय़ा क्षेत्रात ज्वालामुखीजन्य काळा कातळ आढळतो. महाराष्ट्राचेही जवळजवळ ८० टक्के क्षेत्र काळय़ा कातळानेच व्यापले आहे. काळय़ा कातळाचे भूविज्ञानाच्या परिभाषेतले नाव आहे ‘बेसॉल्ट’, तर काळय़ा कातळांनी बनलेल्या पाषाणसमूहासाठी ‘दक्खनचे सोपानप्रस्तर’ अशी पारिभाषिक संज्ञा आहे. विदर्भातला गाविलगड, मराठवाडय़ातला देवगिरीचा किल्ला, किंवा सह्यद्रीमधल्या हरिश्चंद्र-गडाजवळचा कोकणकडा अशा कोणत्याही ठिकाणी काळय़ा कातळाच्या क्षितिजसमांतर (आडव्या) थरांची चळतच्या चळत पाहायला मिळते.

जिथे ज्वालामुखीजन्य पाषाणांच्या चळतीमधले प्रस्तर क्षितिजसमांतर असतात, तिथल्या डोंगरांचे उतार जिन्याच्या पायऱ्यांप्रमाणे दिसतात. या प्रकारच्या भूरूपासाठी मूळ इंग्रजी पारिभाषिक संज्ञा आहे ट्रॅप. ‘त्राप्पा’ या स्कँडिनेव्हिअन् शब्दावरून ही संज्ञा आली आहे. त्यासाठी मराठी प्रतिशब्द आहे ‘सोपानप्रस्तर’.

भूविज्ञानात कोणत्याही पाषाणसमूहाला नाव देताना त्याला भौगोलिक संज्ञा जोडण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मिळून या काळय़ा कातळाने दक्खनच्या पठाराचे फार मोठे, म्हणजे पाच लाख चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. म्हणून या पाषाणसमूहाला दक्खनचे सोपानप्रस्तर (डेक्कन ट्रॅप) असे नामाभिधान मिळाले आहे. गंमत म्हणजे ही संज्ञा कुणा भूवैज्ञानिकाने सुचवलेली नाही. लष्करी अधिकारी असूनही निसर्गविज्ञानाची प्रचंड आवड असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेतील कर्नल साइक्स या लष्करी अधिकाऱ्याने १८३३ या वर्षी ही संज्ञा सुचवली होती.

महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमध्येही दक्खनचे सोपानप्रस्तर आढळतात. राजस्थानच्या आग्नेय भागात अगदी एका लहानशा क्षेत्रात, तर कच्छ आणि काठेवाड धरून गुजरातच्या बऱ्याच मोठय़ा भागात काळा कातळ आढळतो. मध्य प्रदेशच्या तर विस्तृत भागात तो दिसून येतो. छत्तीसगडमधल्या अगदी छोटय़ा पट्टय़ात, उत्तर कर्नाटकाच्या काही भागांत आणि उत्तर तेलंगणाच्याही काही भागात काळा कातळ आढळतो.

या ज्वालामुखीजन्य खडकांची निर्मिती ६.६ कोटी वर्षांपूर्वी झाली. पाषाणांच्या या भल्या मोठय़ा चळतीची जाडी सुमारे ३,००० मीटर (१०,००० फूट) आहे. हे कातळ अस्तित्वात आले तेव्हा त्यांनी व्यापलेले क्षेत्र पंधरा लाख चौरस किलोमीटर होते. तथापि, काळाच्या ओघात त्यातल्या बऱ्याच मोठय़ा क्षेत्रातल्या खडकांची झीज झाली. तरीही या पाषाणांनी व्यापलेले क्षेत्र अजूनही पाच लाख चौरस किमी आहे.

काळय़ा कातळाची गणती भक्कम पाषाणात होत असल्यामुळे ऐतिहासिक काळापासून आपल्याकडे तो बांधकामासाठी वापरला जातो. महाराष्ट्रातल्या गडांची तटबंदी, कित्येक जुने वाडे, गावोगावची देवळे यांच्या बांधकामामध्ये काळय़ा कातळाचा उपयोग विपुल प्रमाणात झाला आहे.

अ‍ॅड्. अंजली देसाई

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.