विविध भारतीय भाषांत केवळ धर्मप्रसारासाठी साहित्य निर्मिती करून न थांबता येथील बहुतेक भाषांची आरंभीची व्याकरणे आणि कोश यांची निर्मितीही या परकीय – युरोपीय-  लोकांनीच केली असे दिसते! भारतीय भाषांची नियमबद्धता, शास्त्रीय स्वरूप यांना पुस्तकरूप देण्याचे पहिले प्रयत्न मिशनऱ्यांनीच केले. हिंदुस्तानात ख्रिस्ती मिशनरी म्हणून आलेल्या सुरुवातीच्या धर्मोपदेशांपैकी फादर स्टिफन्स, नोबीली, कॅरे वगरेंनी स्थानिक भाषांमध्ये लिखाण करून साहित्य निर्मिती केली.

फादर थॉमस स्टिफन्स यांनी केलेल्या ‘ख्रिस्तपुराण’ या मराठी ग्रंथरचनेमुळे त्यांचे नाव अजरामर झाले! थॉमस हा इंग्लंडमधील विल्टशायर परगाण्यातल्या बूस्टन येथील एका व्यापाऱ्याचा मुलगा, जन्म १५४९ साली ऑक्सफर्ड मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर रोम येथे जाऊन १५७५ मध्ये जेसुईट या ख्रिश्चन धर्मपंथाच्या प्रसारासाठी मिशनरी कार्य करावे अशा इच्छेने कॅथलीक धर्मपीठाच्या परवानगीने स्टिफन्स लिस्बनहून भारतीय उपखंडाकडे येण्यासाठी निघाला. २४ ऑक्टोबर १५७९ रोजी तो गोव्यात पोहोचला. फादर थॉमस स्टिफन्स हा भारतभूमीवर पाय ठेवलेला पहिला इंग्रज! स्टिफन्सला विविध भाषा शिकण्याची आवड उपजतच होती. धर्मप्रसाराचे धोरण ठरवण्यासाठी इ.स. १५८५ मध्ये भरलेल्या  बिशपांच्या प्रांतिक सभेत प्रचाराच्या भाषा माध्यमाविषयी एक ठरावही मंजूर केला गेला. या ठरावानुसार गोव्यातल्या मिशनऱ्यांनी मराठी व कोकणी आत्मसात करून त्या भाषांमधून धर्मप्रसाराचे कार्य करावे असे आवाहन केले होते.  स्टिफन्सने मराठी आणि कोकणी यांच्या ग्रांथिक व बोली भाषांचा अभ्यास करून लोकांशी या भाषांमध्येच संभाषण व लेखन सुरू केले. मराठी, कोकणीशिवाय फादर स्टिफन्सने संस्कृत भाषाही आत्मसात केली. त्यांनी  लिहिलेल्या ग्रंथांपैकी ‘ख्रिस्तपुराण’, ‘दौत्रिना क्रिस्तां’ आणि ‘कानारी (कोंकणी) भाषेचे व्याकरण’ हे ग्रंथ विशेष महत्त्वाचे समजले जातात. फा.थॉमस स्टिफन्स गोव्यात सालसेट येथे १६१९ साली मृत्यू पावले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com